Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

ठरलं तर मग! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री होणार आदेश बांदेकरांची सून… 

Ramayana :  ‘ओटीटी किंग’ साकारणार सुग्रीवाची भूमिका!

War 2 Or Coolie : बॉक्स ऑफिसवर कुणी मारली माजी?

‘रामायण’ चित्रपटात Amitabh Bachchan साकारणार ‘ही’ भूमिका!

Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर

“वरण-भात म्हणजे गरीबांचं जेवण”; Vivek Agnihotriच्या विधानावर मराठी कलाकारांचा संताप

Kamalistan Studio च्या खाणाखुणा मिटत चालल्यात…

Stree to Thama :  बॉलिवूडचं हॉरर-कॉमेडी युनिवर्स!

War 2 : ह्रतिक रोशन आणि ज्यु.एनटीआर यांच्या चित्रपटाची ३००

वरण-भात, कढीला ‘गरिबांचं जेवण’ म्हणणाऱ्या Vivek Agnihotri ला मराठी अभिनेत्रीने

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘शान’ला Sholay चा फटका बसला?; होय शंभर टक्के

 ‘शान’ला Sholay चा फटका बसला?; होय शंभर टक्के
कलाकृती विशेष

‘शान’ला Sholay चा फटका बसला?; होय शंभर टक्के

by दिलीप ठाकूर 19/08/2025

प्रत्येक चित्रपटाचे आपले एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असते हे बौद्धिक मास अपीलच्या गणितात चूक ठरते. उत्तम उदाहरण, ‘शान’ (Shaan) चित्रपट. ‘शोले’ (Sholay) च्या अफाट/ अचाट/ गडगडाटी/ चौफेर यशानंतरचा दिग्दर्शक रमेश सिप्पीचा पुढचा चित्रपट कोणता बरे असेल याची केवढी तरी विलक्षण उत्सुकता होती. चित्रपटसृष्टी, चित्रपट रसिक आणि त्या काळातील प्रसार माध्यमातून याच प्रश्नाचा जणू शोध घेतला जात होता. एक चित्रपट प्रचंड हिट ठरतो तेव्हा त्याच दिग्दर्शकाचा पुढचा चित्रपट कोणता याचे कुतूहल असण्याचे ते दिवस होते. १९७८ चे ते दिवस आणि अशातच एके दिवशी स्क्रीन साप्ताहिकात बातमी आली, जी. पी. सिप्पी निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शान’ चित्रपटाची घोषणा. (त्या काळात आपल्या नवीन चित्रपटाची स्क्रीन साप्ताहिकात पहिली बातमी येणे प्रतिष्ठेचे मानले जात असे). ‘शान’  नावच भारी वाटलं.

चित्रपटाची पटकथा व संवाद लेखन सलिम जावेद यांचे, चित्रपटात ‘शोले’ मधील धर्मेंद्र, हेमा मालिनी, संजीवकुमार व अमिताभ बच्चन हे पुन्हा ‘शान’ मध्ये. तसेच या चित्रपटात विनोद खन्ना, राखी, परवीन बाबी, जॉनी वॉकर व कुलभूषण खरबंदा. रमेश सिप्पीने एक वेगळाच सेटअप जुळवून आणलाय असे आम्हा चित्रपट रसिकांचे मत ठरले. माझे हे महाविद्यालयीन वय. गावदेवी गिरगावातील भवन्स काॅलेजमधील कॅन्टीनमध्ये आम्ही मित्र चकाट्या पिटत असताना वाद घालण्यासाठी आमचे हुकमी विषय असत, राजेश खन्ना श्रेष्ठ की अमिताभ बच्चन, ‘ शोले’ ची भन्नाट क्रेझ कितपत योग्य, सुनील गावसकरची शैलीदार फलंदाजी व कपिल देवची भेदक गोलंदाजी. आणि अशातच दोन कप चाय चार ग्लासात करुन येईपर्यंत ‘शान’ वर आम्ही बोलत असतानाच समजले.

चित्रपटाच्या पहिल्या गाण्याचेही रेकॉर्डिंग झाले. आनंद बक्षी यांच्या गीतांना राहुल देव बर्मनचे संगीत. त्या काळात अशा लहान मोठ्या गोष्टींच्या बातम्या होत होत चित्रपट आपल्यापर्यंत पोहचत असे. (आजच्यासारखे चित्रपट पडद्यावर येण्यास सज्ज झाल्यावर पूर्वप्रसिध्दी सुरु होत नसे.) अशातच बातमी आली, काही कारणास्तव धर्मेंद्र ‘शान’ मधून बाहेर आणि तो बाहेर म्हणून हेमा मालिनीनेही चित्रपट सोडला. का बरे? गॉसिप्स मॅगझिनमधून आले, रमेश सिप्पी आता अमिताभला महत्व देत आहेत. ‘शोले’ च्या मुहूर्तापर्यंत अमिताभच्या खात्यात फक्त ‘जंजीर’ (११ मे १९७३)चे यश होते. ‘शान’ची कास्टिंग होत असताना अमिताभची पब्लिकमध्ये जबरदस्त क्रेझ होती.

सलिम जावेद अमिताभचं व्यक्तिमत्व, त्याची अभिनय क्षमता, ॲन्ग्री यंग मॅनची त्यांनीच दिलेली इमेज व लोकप्रियता हे डोळ्यासमोर ठेवून काम करतात असा आरोप होत होताच. (तरी देश मुखर्जी दिग्दर्शित ‘इमान धरम’ पडद्यावर आला तोच फ्लॉप). तेवढ्यात बातमी आली, संजीवकुमारला ‘शान’ मधला शाकाल रंगवण्यात रस आहे. रमेश सिप्पीचा त्यावर नकार असल्यानेच संजीवकुमार चित्रपटातून बाहेर पडला. विनोद खन्ना अन्य चित्रपटात बिझी होता. चित्रपट सेटवर जाण्यापूर्वी अशा गोष्टी अनेकदा होतात.

रमेश सिप्पीनी हे कलाकार निवडीचे कोडे सोडवायला सुरुवात केली. संजीवकुमारच्या जागी सुनील दत्त आला. धर्मेंद्र व हेमा मालिनी या जोडीची भूमिका अमिताभ व परवीन बाबी यांना दिली. आणि मूळ यांच्या असलेल्या भूमिका शशी कपूर व बिंदीया गोस्वामी यांना दिल्या. विनोद खन्नाच्या जागी शत्रुघ्न सिन्हा आला. त्याचे सेटवर उशीरा येण्या जाण्यास रमेश सिप्पी कंटाळून गेल्याने त्याच्या जागी नसिरुद्दीन शाह येणार अशी एक आश्चर्यकारक बातमी होती. त्या काळात तो समांतर चित्रपटात जास्तच मुरला होता. एकदा अमिताभ बच्चनने कपिल शर्मा शोमध्ये शत्रुघ्न सिन्हाच्या समोरच सांगितले, आम्ही एकत्र काम करत असतानाच सकाळपासून दक्षिण मुंबईत एका चित्रपटाच्या सेटवर एकत्र काम करुन दुपारी आमच्याच आणखीन एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उपनगरातील स्टुडिओत जायला निघाल्यावर मी पोहचलो तरी शत्रूजी दोन तास उशीरा येत. असे का होत असे हे समजायचे नाही. शत्रुघ्न सिन्हाने त्याला दादही दिली.

१९८० साली अमिताभ व शत्रुघ्न सिन्हा जोडीचे शान व राज खोसला दिग्दर्शित ‘दोस्ताना’ हे दोन चित्रपट पडद्यावर आले. अन्य भूमिकेत हेलन, सुधीर, पद्मिनी कपिला, विजू खोटे आले. आणखीन एक नवीन नाव आले, मजहर खान. (तत्पूर्वी त्याने भूमिका साकारलेला ‘संपर्क’ नावाचा चित्रपट कधी येऊन गेला हे समजलेच नाही.) ‘शोले’त अमजद खान तसा ‘शान’ मध्ये मझहर खान असा आम्ही सर्वसामान्य चित्रपट रसिकांनी संबंध जोडला. ‘शोले’ चा पगडाच असा जबरदस्त होता. मिनर्व्हात शोले हाऊसफुल्ल गर्दीत विक्रमी वाटचाल करीत असतानाच ‘शान’ची निर्मिती आकार घेत होती.

‘शान’ च्या चित्रीकरण काळात चित्रपटविषयक साप्ताहिकात प्रसिद्ध होत असलेले फोटो पाहताना त्यात शहरीकरण जास्त दिसत होते (‘शोले’ रामगढ या गावात घडणारी गोष्ट याच्याशी कळत नकळत तुलना होत होती.) ‘शान’ पूर्ण होत असतानाच त्याच्या गाण्याची ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाली. प्यार करनेवाले प्यार करते है शानसे हे खास आशा भोसले व आर. डी. बर्मन कॉम्बिनेशनचे पाश्चात्य ढंगाचे गाणे ऐकता ऐकताच लोकप्रिय झाले. शानची इतरही गाणी रेडिओपासून लाऊडस्पीकरपर्यंत व्हाया इराणी हॉटेलमधील ज्युक बॉक्स अशी सगळीकडेच ऐकू येऊ लागली. ‘शोले’च्या टीमचा चित्रपट असल्यानेच सगळे कसे आपोआपच जोरदार शोरदार झाले. खणखणीत यशाची ही जबरा पुण्याई.

‘शान’च्या दणकेबाज पूर्वप्रसिध्दीतील एक गोष्ट ठळकपणे आठवतेय. ‘सहा कोटीचा महामनोरंजक चित्रपट’ ही त्याची टॅगलाईन. त्या काळात सहा कोटी ही प्रचंड मोठी रक्कम. एवढा खर्च करण्यासारखे या चित्रपटात काय बरे असेल अशीही उत्सुकता ताणली गेली होती. पोस्टरभर मोठ्या स्टार्सचे चेहरे आणि उत्तम दर्जाचा कागद हे ठळक वैशिष्ट्य. शाकालचा अड्डा, मगरीसोबतची अमिताभची मारहाण, प्यार करनवाले गाण्याचा चकाचक सेट्स, पाश्चात्य ढंगाची जबरदस्त ॲक्शन दृश्य याची केवढी तरी चर्चा. यातून थोडा थोडा  चित्रपट दिसत होता. पण ‘शोले’ची सर येईल का अशी शंकाही मनात होती. आणि ‘ शोले’ पेक्षा काहीतरी सॉलिड पाहायला मिळावे अशी अपेक्षाही होती. आणि त्यात काही चुकही नव्हती.

================================

हे देखील वाचा : Sholay म्हणजेच मिनर्व्हा, मिनर्व्हा म्हणजेच शोले

=================================

अखेर ‘शान’ प्रदर्शित व्हायची तारीख जाहीर झाली, १२ डिसेंबर १९८०. मुंबईत मेन थिएटर मिनर्व्हा. पाच वर्षांचा मुक्काम करुन एव्हाना ‘शोले’ उतरला असला तरी त्याचा सामाजिक सांस्कृतिक प्रभाव विलक्षण होता. (आज पन्नास वर्षांनंतरही तो आहे. तर मग पाच वर्षांनंतर म्हणजेच १९८० साली किती जबरदस्त असेल, माझ्या पिढीने तो अनुभवलाय. चित्रपट संस्कृतीतील विविधतेबाबत माझी व माझ्या मागची पिढी अधिकच नशीबवान. त्या दोन तीन दशकात बरेच काही घडले..)

‘शोले’ प्रमाणेच ‘शान’ची वृत्तपत्रीय समिक्षा चित्रपट फारसा जमलेला नाही. सलिम जावेद यांची पटकथा विस्कळीत आहे. ‘शोले’ चा दर्जा गाठलेला नाही अशी होती. (दरम्यान त्या काळातील काही समिक्षकांना ‘शोले’च्या अफाट लोकप्रियतेने अचंबित केले होते. आणि आता लोकप्रियतेच्या दृष्टिकोनातून ‘शोले’ सरस चित्रपट वाटत होता. यश असा बदल घडवत असते. चित्रपटाचा खलनायक मझहर खान नसून कुलभूषण खरबंदा आहे हा म्हटलं तर धक्काच. मझहर खान अब्दुल्ला या व्यक्तिरेखेत होता.

शाकालच्या गॅगची निवड भारी होती. रुपेरी पडद्यावरील बदमाश वा कटकारस्थान करणारे असे सुजीतकुमार,  मॅकमोहन, सुधीर पांडे, दलिप ताहिल, माणिक इराणी, गोगा कपूर व शरद सक्सेना असे सातजण होते. कुलभूषण खरबंदाचा शाकाल अजिबात डेंजरस नव्हता. गब्बरसिंगचा धाक आजही जाणवतो. शाकाल आपल्या इलेक्ट्रॉनिक अड्ड्यात बसून लाल, पिवळी, हिरवी, निळी बटणे दाबतो यात फार थ्रील नव्हते. आणि हीच गोष्ट चित्रपटाच्या विरोधात गेली. कुलभूषण खरबंदा समांतर चित्रपटाकडून व्यावसायिक चित्रपटाकडे आलेला गुणी अभिनेता. पण ‘शान’ने सेटबॅक दिला. शोले जेवढा व जसा भारतीय चित्रपट तितकाच शान पाश्चात्य रंगढंगातील चित्रपट, हा बदल चित्रपट रसिकांना अजिबात रुचला नाही. ‘शोले’चा दिग्दर्शक आता काय दाखवतोय यासाठीच माझ्यासारख्याने ‘शान’ पाहिला. (‘सीता और गीता’ ते ‘जमाना दीवाना’ अशा रमेश सिप्पी दिग्दर्शित चित्रपटात माझे अतिशय आवडते चित्रपट शोले व सागर. केवढी तरी भिन्नता. पण त्यावर दिग्दर्शकाची विलक्षण पकड दिसते.)

================================

हे देखील वाचा: अगदी खरं खरं सांगा, Saiyaara पाहून रडलात की नाही?

=================================

‘शान’ ला फिल्म फेअरचा उत्कृष्ट छायाचित्रणकाराचा पुरस्कार एस. एम. अन्वर यांना प्राप्त झाला. सुरुवातीस व्दारका दिवेचा हेच या चित्रपटाचे छायाचित्रणकार होते. त्यांचे अचानक निधन झाल्यानंतर त्यांचे सहाय्यक एस. एम. अन्वर यांच्याकडे आलेली जबाबदारी त्यांची चोख बजावली. ‘शोले’चेच संकलक एम.एस शिंदे हेच ‘शान’ चेही संकलक होते. त्यांनीही चोख कामगिरी केली. पण पटकथाच ठिसूळ त्याला कोण काय करणार? ‘ शान’ हिट की फ्लॉप याचं उत्तर शोधेपर्यंत चित्रपटाने गल्ला पेटीवर चांगलीच मांड बसवली. ‘शोले’ची पुण्याई होतीच, मल्टी स्टार कास्ट चित्रपट होता,  गाणीदेखिल लोकप्रिय झाली (‘जानू मेरी जान मै तुझपे कुर्बान’, ‘यम्मा यम्मा क्या खुबसुरत समा’, ‘नाम अब्दुल है मेरा’ अशी सगळीच गाणी लोकप्रिय. चित्रपट पुन्हा पाहण्यासाठी ही मोठीच गोष्ट.) आणि मुंबईत मिनर्व्हातच ‘शान’ने रौप्य महोत्सवी यश संपादले. आणि आजही ‘शान’ म्हटला की हमखास ‘शोले’ आठवतोच…

दिलीप ठाकूर : कलाकृती विशेष

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Amitabh Bachchan Bollywood Bollywood Chitchat bollywood classic films Celebrity News Entertainment shaan sholay ramesh sippy
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.