चाळीशीत… सिलसिला
अमिताभ बच्चन, जया बच्चन आणि रेखा यांच्या प्रेमाचा त्रिकोण असलेला सिलसिला चित्रपट चाळीशीचा होतोय. यश चोप्रा यांचा हा बीगबजेट चित्रपट अपेक्षेप्रमाणे बॉक्सऑफीसवर जादू करु शकला नाही. तरीही हा चित्रपट चर्चेत राहीला. एकतर त्याच्यातील अफलातून गाणी. जावेद अख्तर या नव्या गीतकारचा उदय आणि अमिताभ आणि रेखा या जोडीचा मोठ्या पडद्यावरील शेवटचा चित्रपट अशा अनेक गोष्टी सिलसिला चित्रपटाला जोडल्या गेल्या. बॉक्सऑफीसवर हा मल्टीस्टार चित्रपट का आपटला हे सुद्धा एक कोडचं होतं.
१४ ऑगस्ट १९८१ रोजी सिलसिला चित्रपट प्रदर्शित झाला. अमिताभ, जया, रेखा आणि संजीव कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाबद्दल आधी खूपच उत्सुकता होती. त्यात प्रमुख कारण म्हणजे अमिताभ आणि रेखा मधला एक हळवा कोपरा. १९७३ मध्ये अमिताभ आणि जया यांचा विवाह झाला. तरीही अमिताभ आणि रेखा यांच्यात प्रेमप्रकरण आहे, अशा स्वरुपाच्या बातम्या येत असत. त्यात सिलसिलामध्ये पहिल्यांदा परवीन बॉबी आणि स्मिता पाटील यांना घेण्यात आलं होतं. मात्र शुटींग सुरु होण्यापूर्वी काही दिवस आधी त्यांना बदलून रेखा आणि जया यांची निवड या भूमिकेसाठी करण्यात आली. यश चोप्रांना या दोघीच सिलसिलामध्ये हव्या होत्या. पण त्यांची ही भूमिका या चारही अभिनेत्रींपर्यंत पोहचवण्याचे काम अमिताभनं केलं होतं. साहजीकच यश चोप्रां सारख्या दिग्गज्जासमोर नाराजी व्यक्त न करता परवीन बॉबी आणि स्मिता पाटील यांनी सिलसिला सोडला. जयानं आपल्या नव-याचा हटट् पुरवला. रेखानं मात्र बरेच आढेवेढे घेत या भूमिकेचा स्विकार केला.
शेखर मल्होत्रा आणि अमित मल्होत्रा या भावंडाची कथा. त्यापैकी शेखर हा युद्धात मारला जातो. त्याची प्रेयसी, शोभा गर्भवती असते. अमित आपली प्रेयसी, चांदनीसोबत लग्न करणार असतो. पण भावाच्या मृत्यूनंतर भावाच्या प्रेयसीबरोबर तो लग्न करतो आणि त्याच्या मुलाची जबाबदारी घेतो. पुढे ते मुल अपघातानं जातं. या दोघांना एकत्र आणणारे कारणचं संपल्यावर अमित पुन्हा आपल्या प्रेयसीकडे जाऊ पहातो. आता तिचेही लग्न झालेले, नवरा डॉक्टर. एकूण चार प्रेमी जीवांची ताटातूट, मानसिक आणि भावनिक जवळीक, प्रेमाचा अर्थ… यश चोप्रांनी सिलसिला यशस्वी करण्यासाठी चोप्रा स्टाईल सर्व मसाला या चित्रपटात भरला. सर्वात महागडी स्टारकास्ट चित्रपटात होती. गाणीही तेवढ्याच तोडीची, पण तरीही हा चित्रपट पडला. चित्रपटाची जेवढी आधी चर्चा झाली, त्यामानानं चित्रपटाला यश मिळालं नाही. खुद्द यश चोप्राही सिलसिलाबाबत आश्चर्यचकीत झाले होते. त्यांना खूप मोठं नुकसान सहन करावं लागलं. शिवाय अमिताभ आणि त्यांच्यात या चित्रपटानंतर वाद झाल्याची चर्ची होती. परिणामी अमिताभ अनेक वर्ष यश चोप्रा यांच्या बॅनरमधून गायब होता. अमिताभला चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा होत्या, चित्रपट पडल्यावर त्यांनी याचा दोष चित्रपटाच्या कथेला दिला. सिलसिलामध्ये नायक आणि त्याची प्रेयसी एक झाली असती तर चित्रपट नक्की चालला असता, असं मत त्यांनी प्रेससमोर व्यक्त केलं. अर्थात यावरुनही खमंग चर्चा झाली. हे मत त्यांनी स्वतःबद्दल आणि रेखाबद्दल व्यक्त केलं, असाही अर्थ घेण्यात आला. एकमात्र झाले, यापूर्वी अनेक हीट चित्रपट देणारी अमिताभ-रेखा ही जोडी सिलसिलापासून कायमची वेगळी झाली.
सिलसिला चित्रपट प्रेक्षकांना भावला नसला तरी त्याची गाणी मात्र लोकप्रिय झाली. यात एकूण सात गाणी आहेत. त्यात अमिताभच्या आवाजातील ‘नीला आसमाँ सो गया’ आणि ‘रंग बरसे चुनरवाली’ ही गाणी आघाडीवर होती. रंग बरसे तर अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंश राय बच्चन यांची रचना होती. गाण्यामध्येही काही खास होते. जावेद अख्तर यांनी या चित्रपटाची गाणी लिहीली आहेत. सिलसिलापूर्वी जावेदजी कविता लिहीयचे. यश चोप्रा यांच्या चित्रपटात गाणी साहिर लुधयानवी यांची असत. त्यांचे निधन झाल्यावर ही जबाबदारी यशजींनी जावेद अख्तर यांच्यावर सोपवली. सिलसिला हा जावेदजींचा पहिला चित्रपट. संतूर वादक शिव कुमार शर्मा आणि बासुंरी वादक हरिप्रसाद चौरसिया यांचाही संगित दिग्दर्शक म्हणून सिलसिला हा पहिलाच चित्रपट. यातील प्रत्येक गाण्यामागे एक गोष्ट आहे. निला आसमाँ हे अमिताभच्या आवाजातील गाणे, शम्मी कपूर यांच्या कल्पनेतून आलेले. १९७५ रोजी जमीर चित्रपटाच्या शुटींग दरम्यान अमिताभ आणि शम्मी कपूर एकत्र असायचे. अशावेळी रात्री गप्पा मारतांना शम्मी कपूर अनेक नवीन धून वाजवायचे आणि गाणी तयार करयाचे, सोबत गिटारही असायची. अशाच एका रात्री शम्मी यांनी नवा सूर आळवला. ते सूर अमिताभना एवढे आवडले की सिलसिलाची तयारी सुरु झाल्यावर त्यांनी शम्मी कपूर यांना ती धून नवीन चित्रपटात घेऊ का म्हणून विचारले. तेव्हा दिलदार शम्मी कपूर यांनी ते गाणं आणि ती धूनही तुझीच असं उत्तर दिलं होतं. तिथून निला आसमाँ सिलसिलामध्ये आलं. रंग बरसे या होळी गाण्याची कल्पनाही अमिताभचीच. सिलसिलानंतर प्रत्येक होळीला हे रंग बरसे गाणं वाजतच.
यश चोप्रांचा हा चित्रपट म्हणजे लोणच्यासारखा ठरला. चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा त्याचा बॉक्सऑफीसवर फारसा परिणाम झाला नाही. पण जसजसं अमिताभ-रेखा आणि जया यांच्या प्रेमाच्या त्रिकोणाची चर्चा व्हायला लागली. तसा हा चित्रपट लोकप्रिय ठरला. नंतर त्या चित्रपटाला मोठा प्रेक्षकवर्ग मिळाला. चित्रपटाच्या अपयशानंतर यश चोप्रा आणि अमिताभ यांच्या संबंधामध्येही दरी आली. यशजींनी नंतर आपल्या कुठल्याच चित्रपटात बीगबींना घेतलं नाही. त्यानंतर अमिताभ 2000 साली यशराजच्या बॅंनर खाली आले. तो चित्रपट म्हणजे मोहब्बते. अर्थात हा चित्रपट आदित्य चोप्रा यांनी दिग्दर्शित केला होता. अनेक हीट चित्रपट देणा-या अमिताभ बच्चन यांना मात्र अद्यापही सिलसिलाच्या अपयशाचे वाईट वाटते. काही वर्षापूर्वी त्यांनी आम्ही कुठेतरी कमी पडलो असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली होती.
– सई बने