
म्हणून Divya Bharti अस्खलित मराठी बोलायच्या…
महाराष्ट्रात राहताना मराठी बोलता यायला हवे हे अगदी स्वाभाविक. आपल्या मराठी भाषेवरील प्रेमातून ते कौतुक असते. त्यातच चकाचक, स्पर्धात्मक हिंदी चित्रपटसृष्टीतील कोणी मराठी बोलतेय असे समजले की भारी कुतूहल आणि कौतुक ! दिव्या भारती (Divya Bharti) ला फारच उत्तम नसले तरी चांगले मराठी यायचे. हे अगदी तिच्या चित्रपटाच्या मुहूर्ताला अथवा सेटवर आम्हा मीडियाला अनुभवता येई. त्या काळात आम्हा सिनेपत्रकारांना चित्रपट स्टुडिओत व सेटवर सहज प्रवेश मिळे. त्यामुळे असे एक्स्युझिव्हज अनुभव अनेक.

त्यात ती अतिशय फटकळ आणि स्पष्टवक्ती, त्यामुळे तिचा मराठी बाणा झणझणीत ठरे. तिला मराठी भाषा यायचे कारण म्हणजे, तिची आई महाराष्ट्रीयन होती आणि वडील पंजाबी. आईचे माहेरचे आडनाव वाळिंबे. त्या काळात एखाद्या अभिनेत्रीसोबत तिची आईदेखील सिनेमाच्या वर्तुळात असणे वा दिसणे ही अगदी काॅमन गोष्ट होती. (हेमा मालिनीपासून शिल्पा शेट्टीपर्यंत अशी अनेक उदाहरणे चित्रपटसृष्टीतील भटकंतीत पहायला मिळाली.) अनेकदा तरी या आईशी संवाद साधला तरी ती स्टार अभिनेत्री मुलाखत अथवा फोटोसाठी सहकार्य करे. Divya Bharti ला मराठी बोलता यायचे तरी ती मराठी चित्रपटात भूमिका साकारेल का असा प्रश्न त्या काळात कधीच कोणाला पडला नाही. याचे कारण म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीत तिचा जबरदस्त झंझावात सुरु होता. (Bollywood tadka)
मला आठवतंय, तिची भूमिका असलेला राज कंवर दिग्दर्शित ‘दीवाना‘ (१९९२) च्या जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमधील मुहूर्ताला ती पारंपरिक साडीत आली होती. Shah Rukh Khan अतिशय आत्मविश्वासाने वावरत होता. दिल आशना है, शोला और शबनम, बलवान, क्षत्रिय, विश्वात्मा, दिल का क्या कसूर, जानसे प्यारा, दुश्मन दीवाना, दिल ही तो है असे तिचे बरेच चित्रपट येताना मराठी मीडियाला तिचे विशेष कौतुक होते. याचे कारण, ती शूटिंगमध्ये कितीही बिझी असली तरी त्यातूनही वेळ काढून सहकार्य करे. (त्या काळातील कलाकार व आम्ही सिनेपत्रकार यांच्यात कोणतीच भिंत नव्हती. थेट संवाद असे. अगदी सेक्रेटरीही लुडबुड करीत नसे. अथवा हे विचारु नकोस, तो विषय काढू नकोस अशा अटी वा शर्ती घालत नसे.)

त्या काळातील कलाकार अगदी खरंच शक्य नसेल तर दोन तीन दिवसात कुठे भेटता येईल हे खात्रीने सांगे आणि ते लक्षात ठेवून भेटे. अगदी एखाद्या फोटोग्राफरलाही ती (Divya Bharti) अगदी मराठीत सांगे, थोडे दिवस थांब, युरोपला शूटिंगला चाललीय, नवीन फॅशनचे कपडे आणते, त्यावर नक्की फोटो सेशन करुया. दिलेला शब्द ती हमखास पाळायची. तो काळच वेगळा होता. स्टार आणि मिडियात थेट संवाद असे. विश्वासाचे नाते असे. (Bollywood mix masala)

दिव्या भारतीला सुरुवातीला हिंदी चित्रपटात संधी मिळत नव्हती. इकडे स्पर्धाही तगडी होती. श्रीदेवी व माधुरी दीक्षित टाॅपवर होत्या. मनिषा कोईराला, जुही चावला, रविना टंडन, करिश्मा कपूर, काजोल, उर्मिला मातोंडकर, सोनाली बेन्द्रे, शिल्पा शेट्टी, आयेशा जुल्का स्थिरावत होत्या. अशा परिस्थितीत तिने अजिबात निराश न होता साऊथच्या काही चित्रपटात भूमिका साकारत आपली वाटचाल सुरु ठेवली. Bobbili Raja (नायक व्यंकटेश) इत्यादी तेलगू, Nila Penne (नायक आनंद) इत्यादी तमिळ चित्रपटात तिने भूमिका साकारल्या. त्यातील काही चित्रपट सुपर हिटही झाले. हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक ‘नाॅनमहाराष्ट्रीयन कलाकारांना’ मराठी बोलता येते, याचे कारण म्हणजे त्यांच्या मित्रपरिवारात कोणी तरी महाराष्ट्रीयन असतो (उदा. वरुण धवन), काहीना अनेक वर्षे मुंबईत राहिल्याने मराठी बोलता येते (उदा. डिंपल कपाडिया) आणि काहींची आई महाराष्ट्रीय आहे (उदा. समीरा रेड्डी) आणि या मराठी बोलण्याचे मराठी मनाला विशेष कौतुकही आहेच. अर्थात, ते असायलाच हवे….
=============
हे देखील वाचा : ‘डॉन’ चित्रपटाच्या निर्मिती मागे मनोज कुमार यांचे कनेक्शन
=============
दिव्या भारती (Divya Bharti) चा झंझावात विलक्षण होता. चित्रपटाच्या जगात यश हेच चलणी नाणे ते “दीवाना” च्या यशाने साध्य झाले. तिने नवीन चित्रपट स्वीकारण्याचा झपाटाही लावला. अशातच तिने निर्माता साजिद नडियादवाला याच्याशी लग्न करणे आश्चर्यकारक होते. त्यांची ओळख झाली काय ? ते प्रेमात पडले काय? आणि त्यांनी झटपट लग्न केले काय? सगळेच अजब. कारकीर्द छान रुळत असतानाच तिने हा निर्णय घेतला हे चित्रपटसृष्टीत संस्कृतीपेक्षा वेगळेच. ऐन भरात असताना लग्न करणे टाळावे असाच खरं तर मामला (हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अभिनेत्रींनी वयाची तिशी ओलांडल्यावर लग्न केल्याचे दिसते. अर्थात हा त्यांचा व्यक्तीगत विषय.)

१९९३ हे वर्ष हिंदी चित्रपटसृष्टीसाठी अनेक बाबतीत अवघड. चित्रपटसृष्टी व अंडरवर्ल्ड यांच्या संबंधाच्या चर्चेच्या वादळात हे क्षेत्र भरडून निघाले. चित्रपट माध्यम व व्यवसाय यापासून दूर होत जणू भलत्यासलत्या वादविवादाचा विळखा पडला होता आणि अशातच ५ एप्रिल १९९३ च्या रात्री अतिशय धक्कादायक बातमी आली, दिव्या भारतीचे निधन… तो अपघात होता की ती आत्महत्या होती (ती हत्या तर नव्हती? हा मोठाच प्रश्न) असे अनेक प्रश्न निर्माण झाले. बरेच दिवस त्या प्रश्नांचा गुंता कायम होता. तो कधीच सुटला नाही… उत्तरे कधीच मिळाली नाहीत. (Untold stories)
निर्मितीवस्थेत असलेल्या काही चित्रपटांचे दिव्या भारती (Divya Bharti) वरील चित्रीकरण रद्द करुन त्याजागी अन्य अभिनेत्रीचा निवड करणे आवश्यक झाले. वास्तव स्वीकारणे जड असले तरी त्याला पर्याय नव्हताच. त्यानुसार “मोहरा” मध्ये रविना टंडन, “लाडला” मध्ये श्रीदेवी, “कर्तव्य” मध्ये जुही चावला यांची निवड झाली. तर “रंग” मधील एका गाण्यात लाॅन्ग शाॅटने शूटिंग करत दिव्या भारतीची कसर भरुन काढली. ते करावेच लागते.
खरं तर, दिव्या भारती (Divya Bharti) ची कसर कधीच भरुन येणारी नाही. गुणवत्ता, सौंदर्य, कामाचा झपाटा आणि सकारात्मक व्यावसायिक दृष्टिकोन अशी छान केमिस्ट्री तिच्यात होती… आजही दिव्या भारतीची आठवण येताच “दीवाना” मधील तिचा उस्फूर्त स्क्रीन प्रेझेन्स आठवतो, तिला पाहताक्षणीच शाहरुख खान अक्षरश: “दीवाना” झाला होता.