‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
जिम ट्रेनर ते मुख्य भूमिकेचा प्रवास.
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘दख्खनचा राजा ज्योतिबा माझा’ (Dakkhancha Raja Jyotiba) ही मालिका खूप लोकप्रिय झाली आहे. यात ‘ज्योतिबा’ या महाराष्ट्राच्या दैवताची भूमिका करणारा कलावंत म्हणजे विशाल निकम. (Vishal Nikam) त्याचा या क्षेत्रातला प्रवास जाणून घेणे महत्वाचे आहे.
विशालचे शालेय शिक्षण गावातच झाले. सांगली जिल्ह्यातील ‘देवीखिंडी’ गावात शेतकरी कुटुंबात तो लहानाचा मोठा झाला. आई वडिलांच्या संस्कारात जीवनविषयक मूल्यांची त्याची जडणघडण पक्की होत गेली. विशालला आर्मीत जायचं होतं. त्याने एन सी सी मध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व देखील केलं होतं. तिथल्या कडक शिस्तीने त्याला खूप काही शिकवलं.
त्याने फिजिक्स विषयात बी एस्सी केलं आणि मग एम एस्सी करण्यासाठी तो पुण्यातील महाविद्यालयात आला. तिथे एकदा कॉलेजमध्ये स्नेहसंमेलनात त्याने ‘जय मल्हार’ साकारला होता. त्याचे कौतुक अनेकांनी केले. आपणही अभिनयात करिअर करावं, असं हळूहळू त्याच्या मनात आलं. हे क्षेत्र त्याला खुणावू लागलं. पण या क्षेत्रात प्रवास कसा करायचा? त्याने ‘लक्ष्य थिएटर’ नावाच्या अभिनयाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रवेश घेतला.
विशालला पहिल्यापासून फिटनेसची आवड होती आणि गोल्ड जिम मध्ये अनेक सेलिब्रिटीज येतात, हे त्याने ऐकले होते. ‘लक्ष्य थिएटर’ची एक शाखा मुंबईत होती आणि गोल्ड जिमच्यासुद्धा मुंबईत शाखा होत्या. त्याने मुंबईला येण्याचं निश्चित केलं. त्याने गोल्ड जिमचा ट्रेनर म्हणून जो प्रशिक्षण अभ्यासक्रम असतो, तो पूर्ण केला. तो गोल्ड जिममध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत झाला. गोल्ड जिमसाठी त्याने एका मॅगझिनसाठीसुद्धा फोटोशूट केले होते. त्याला भूषण प्रधान आणि स्मिता शेवाळे या कलाकारांनी खूप महत्वाचे मार्गदर्शन केले.
पुढे मग त्याला ‘मिथुन’ नावाचा एक मराठी चित्रपट मिळाला आणि मग ‘धुमस’ नावाच्या चित्रपटात सुद्धा त्याने काम केले. ‘दि स्नायपर’ नामक एक सिरीज केली. स्टार प्रवाह वरील ‘साता जन्माच्या गाठी’ ही मालिका त्याला मिळाली. दरम्यान ‘दख्खनचा राजा ज्योतिबा माझा’चा टिझर प्रदर्शित झाला होता. आपल्याला या मालिकेत भूमिका मिळाली तर,असं त्याच्या मनात आलं होतं. पण हे स्वप्न पूर्ण व्हायला कालावधी गेला होता. लॉकडाऊन च्या काळात ऑडिशनसाठी विशालला फोन आला.
त्याने खूप तयारी केली आणि तो या भूमिकेसाठी शॉर्ट लिस्ट झाला होता. त्यावेळी त्याचे वजन बहात्तर किलो होते. ‘ज्योतिबा’ (jyotiba) ही भूमिका साकारण्यासाठी त्याला वजन वाढवायचे होते, पण मुळात विशालला जिम ट्रेनर असण्याचा अनुभव होता आणि त्यामुळे त्याने हे आव्हान स्वीकारले. त्याने भूमिकेला जेवढे वजन आवश्यक होते, तेवढे कमावले. मग ‘ज्योतिबा’ या शीर्षक भूमिकेसाठी त्याची निवड झाली.
विशाल म्हणतो, “स्टार प्रवाह, कोठारे व्हिजन, आमचे दिग्दर्शक, लेखक आणि संपूर्ण टीम यांचा मी खूप आभारी आहे. मला हॉर्स रायडींग शिकणे हे खूप गरजेचे होते. ते सुद्धा या मालिकेच्या निमित्ताने शिकता आले. शिवाय ज्योतिबाचा फेटा,अलंकार, कालखड्ग या सगळ्या गोष्टी, त्यांचे महत्व ही भूमिका साकारताना महत्वाच्या आहेत. मालिकेच्या टीमने छोट्या छोट्या गोष्टींवर खूप बारकाईने संशोधन केले आहे. या भूमिकेचा मला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.” विशाल सध्या लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावाला आला आहे. लवकरच शूटिंग चालू व्हावं, अशी तो प्रार्थना करत आहे.
=====
हे देखील वाचा: “दख्खनचा राजा ज्योतिबा माझा” मालिकेच्या शीर्षक गीताची गोष्ट…
=====