Super Duper Marathi Movie Teaser: ३ एप्रिलला रंगणार कौटुंबिक जल्लोष;

Super Duper Marathi Movie Teaser: ३ एप्रिलला रंगणार कौटुंबिक जल्लोष; सुपर डुपर चा धम्माल टीजर लॉन्च !
झी स्टुडिओज प्रस्तुत ‘सुपर डुपर’ (Super Duper) या आगामी मराठी चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि क्षणात चर्चेचा विषय ठरला. पोस्टरनंतर वाढलेली उत्सुकता आता टीझरमुळे आणखीच उंचावली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंबासोबत एन्जॉय करता येईल असा हा बहुचर्चित मल्टिस्टारर सिनेमा ३ एप्रिलपासून थिएटरमध्ये दाखल होणार आहे. टीझरमध्ये दोन वेगळ्या कुटुंबांची रंगतदार झलक पाहायला मिळते. एका बाजूला परंपरांना जपणारी घराणी, तर दुसऱ्या बाजूला आधुनिक विचारांची तरुण पिढी आणि या दोघांमध्ये सुरू असलेली काहीतरी ‘गुप्त’ योजना. नेमका हा डाव कोणता? या विचारांच्या टकरीतून काय गमती-जमती घडणार? आणि शेवटी या संघर्षाला कोणतं वळण मिळणार? अशा अनेक प्रश्नांची उत्सुकता टीझर वाढवतो, मात्र उत्तरांसाठी चित्रपटगृहात जावंच लागणार आहे. (Super Duper Marathi Movie Teaser)

या कथानकाचा केंद्रबिंदू आहे, एकाच छताखाली राहणाऱ्या दोन भिन्न विचारसरणी. पिढ्यांमधील अंतर, जीवनशैलीतील बदल आणि नात्यांमधील गोडवा या सगळ्याचा संगम हलक्या-फुलक्या शैलीत मांडण्याचा प्रयत्न ‘सुपर डुपर’मध्ये दिसतो. विनोदासोबत भावनिक क्षणांचीही जोड असल्याची झलक यातून मिळते. नाईंटी नाईन प्रॉडक्शन्स आणि सिद्धिविनायक प्रॉडक्शन्स यांच्या बॅनरखाली साकारलेल्या या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन समीर आशा पाटील यांनी केले आहे. विजय शिंदे आणि नरेश बोर्डे निर्माते असून, उमेश कुमार बन्सल आणि बवेश जानवलेकर प्रस्तुतकर्ते आहेत. छायांकनाची धुरा संजय जाधव यांनी सांभाळली आहे.

कलाकारांची भलीमोठी फौज हा या चित्रपटाचा खास आकर्षणबिंदू आहे. निर्मिती सावंत, शशांक शेंडे, हृषिकेश जोशी, नम्रता संभेराव, कुशल बद्रिके, प्रतीक्षा कोते यांच्यासोबत ललित प्रभाकर आणि विदुला चौगुले प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. प्रत्येक कलाकाराची स्वतंत्र शैली आणि विनोदी टायमिंग चित्रपटाला वेगळीच रंगत देणार आहे. दिग्दर्शक समीर आशा पाटील यांच्या मते, हा केवळ विनोदी सिनेमा नसून नात्यांमधील ऊब, पिढ्यांतील दरी आणि ती मिटवण्याचा प्रवास यांची कहाणी आहे. प्रेक्षकांनी संपूर्ण कुटुंबासह थिएटरमध्ये येऊन हा अनुभव घ्यावा, अशी त्यांची अपेक्षा आहे. (Super Duper Marathi Movie Teaser)
=================================
=================================
झी स्टुडिओज् मराठीचे व्यवसाय प्रमुख बवेश जानवलेकर यांनीही ‘सुपर डुपर’ला वेगळ्या धाटणीची धमाल कौटुंबिक कथा असल्याचे सांगितले. दमदार कलाकार, मजबूत लेखन-दिग्दर्शन आणि उच्च निर्मितीमूल्ये यामुळे हा चित्रपट उन्हाळ्यातील परिपूर्ण मनोरंजन पॅकेज ठरेल, असा त्यांचा विश्वास आहे. एकूणच, विनोद, भावना आणि कौटुंबिक नात्यांचा सुंदर मिलाफ अनुभवायचा असेल, तर ‘सुपर डुपर’ हा चित्रपट ३ एप्रिलला नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी चिन्हे टीझरवरून स्पष्ट दिसत आहेत.