शाळेची घंटा वाजणार ! ‘बॅक टू स्कूल’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
आपल्यातील पत्येकाचे आपल्या शाळेशी खास असे नाते जोडलेले असते. आपण किती ही मोठे झालो, कॉलेजला गेलो तरीही शाळेच्या आठवणी मनातून कधीच पुसल्या जात नाहीत. शाळेच्या पहिल्या दिवसापासून ते शाळेच्या शेवटच्या दिवसांपर्यंतच्या असंख्य आठवणी मनात कायमच कोरलेल्या असतात मग त्या चांगल्या असो वा कटू. आयुष्याच्या क्षणापर्यंत आपण आपल्या शाळेतील गमतीजमती, चांगले-वाईट अनुभव कधीच विसरत नाही. शाळेच्या याच अविस्मरणीय आठवणींना उजाळा देण्यासाठी सतिश महादु फुगे घेऊन आले आहेत ‘बॅक टू स्कूल’. रंगसंस्कार प्रॉडक्शन निर्मित ‘बॅक टू स्कूल’ या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर झळकले असून यात चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे.(Back to School Marathi movie)
येत्या २२ जून रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, श्वेता पगार, आधिश पायगुडे, विपीन बोराटे, चंद्रकांत कुऱ्हाडे, सोमनाथ रसाळ, नितीन बनसोडे, अमृत झांबरे, अभिजित पटणे यांच्यासह अनेक कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका असून सव्वाशे पेक्षा जास्त कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. शुभांगी सतिश फुगे, सतिश महादु फुगे या चित्रपटाचे निर्माते आहेत. पोस्टरवर एका पाटीवर दोन खडू ठेवलेले असून त्यावर शाळेचे चित्र रेखाटण्यात आले आहे.(Back to School Marathi movie)
शाळेची सफर घडवणाऱ्या या चित्रपटाचे पोस्टर अतिशय आकर्षक असून ते शाळेच्या भावविश्वात नेणारे आहे. सतिश महादु फुगे आणि अमित नंदकुमार बेंद्रे यांची कथा, पटकथा आणि संवाद असलेल्या ‘बॅक टू स्कूल’ च्या वितरणाची धुरा फिल्मास्त्र स्टुडिओने सांभाळली आहे.
=========================
(हे देखील वाचा: आले रे आले ‘पोश्टर बॉईज 2’ आले…धूमधडाक्यात झाले सिनेमाचे पोस्टर लाँच)
=========================
”शाळा म्हणजे आपले दुसरे घर, शाळेची गोष्टच निराळी आहे. आईनंतर शाळाच आपल्या सगळ्यांना जगायला शिकवते. अनेक आठवणी शाळा जपते आणि त्या आठवणी कायम आपल्या सोबत राहतात. याच आठवणी नव्याने जागवण्यासाठी ‘बॅक टू स्कूल’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांनी पाहावा असा आहे. प्रत्येकाच्या आयुष्याशी जवळचा असणारा हा सिनेमा आहे. अशी भावना चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सतिश फुगे यांनी व्यक्त केली. येत्या २२ जून रोजी आपल्याला या शाळेची सफर घडणार आहे.