मुकेशने गायलेले गाणे पुन्हा रफीच्या आवाजात रेकॉर्ड केले!
साठच्या मध्यावर दिग्दर्शक राज खोसला यांनी एक अप्रतिम रोमँटिक मूव्ही दिग्दर्शित केली होती चित्रपट होता ‘दो बदन’(Do badan). यात मनोज कुमार, आशा पारेख, प्राण आणि सिमी गरेवाल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मनोज कुमार सुरुवातीपासूनच दिलीप कुमार यांना आपला आदर्श मानत होते आणि त्यांच्यासारखा अभिनय करायचा ते प्रयत्न करत. साठच्या दशकात त्यांनी दिलीप कुमार यांचा १९५१ साठी प्रदर्शित झालेला ‘दीदार’ हा चित्रपट बघितला आणि या चित्रपटाच्या ते प्रचंड प्रेमात पडले. हाच चित्रपट तेव्हा रिपीट रनला मुंबईत प्रदर्शित झाला होता.
दिग्दर्शक राज खोसला यांना घेऊन ते पुन्हा एकदा चित्रपट पाहायला घेऊन गेले आणि त्यांना म्हणाले, ”मला याच कथानकावर एक चित्रपट करायचा आहे जो तुम्ही दिग्दर्शित करावा.” राज खोसला खरंतर सस्पेन्स मुव्हीसाठी त्यावेळेला फेमस होते. काला पानी, वह कौन थी, मेरा साया हे त्यांचे चित्रपट त्यांच्या या जॉनर सिद्ध करणारे असे होते. असे असताना एक सॅड एंड असलेली रोमँटिक स्टोरी मनोज कुमारला त्यांच्याकडून दिग्दर्शित करून हवी होती. त्यावर काम सुरू झाले आणि एका अप्रतिम चित्रपटाची निर्मिती झाली. मनोज कुमार यांच्या अभिनयाचा खरा कस इथे लागला होता. आशा पारेख हिने सुद्धा तिच्या नेहमीच्या बबली चुलबुली इमेजपासून दूर जात एक गंभीर भूमिका यात केली होती. या चित्रपटाची गाणी शकील बदायुनी यांनी लिहिली होती तर संगीत रवि यांचे होते.
या चित्रपटातील एका गाण्याचा किस्सा खूप मजेशीर आहे. १९६१ साठी जेमिनी फिल्म चा ‘घुंघट’ हा रामानंद सागर चित्रपट आला होता. या चित्रपटाची गाणी शकील बदायुनी यांनी लिहिली होती तर संगीत रवि यांचे होते. या चित्रपटात एकूण ११ गाणी होती. त्यापैकी फक्त दहाच गाणी या चित्रपटात वापरली गेली. मुकेश यांनी गायलेले एक गाणं शिल्लक होतं. पण सिनेमाची लांबी वाढल्याने ते सिनेमात न घ्यायचे ठरले. त्या मुळे ‘घुंघट’च्या ध्वनी मुद्रीकेवर हे गाणे आलेच नाही.
१९६६ सालच्या ‘दो बदन’ (Do badan) चित्रपटाचे वेळी जेव्हा एका सॅड सॉंगची गरज पडली. त्यावेळेला ‘घुंघट’ या चित्रपटातील ड्रॉप केलेले गाणे आपल्याला वापरता येईल का याचा त्यांनी प्रयत्न केला. संगीतकार रवि यांनी सांगितले, ”भले हे गाणे आम्ही बनवले असले तरी हे गाणे आता जेमिनी फिल्मची प्रॉपर्टी आहे. त्यांच्या परवानगीशिवाय आपल्याला वापरता येत नाही.”
मनोज कुमार राज खोसला आणि संगीतकार रवि वासन साहेबांना भेटायला मद्रासला गेले आणि त्यांना गाण्याची रिक्वायरमेंट व रिक्वेस्ट केली. त्यांनी देखील मोठ्या मनाने हे गाणे त्यांना दिले. परंतु ‘दो बदन’ (Do badan) या चित्रपटासाठी हे गाणे वापरताना त्यांनी मुकेश ऐवजी रफीचा स्वर वापरायचे ठरवले आणि त्याच चालीमध्ये तेच गाणे मुकेशच्या ऐवजी रफीच्या स्वरात रेकॉर्ड झाले. गाणे होते ‘रहा गर्दीशो मी हरदम तेरे इश्क का सितारा’.
========
हे देखील वाचा : बॉलीवूडमध्ये हॉरर मूव्हीजची सुरुवात करणारा ‘महल’
========
सिनेमात आशा पारेख आणि प्राण यांचे लग्न होते आणि त्या लग्नाच्या वेळी दुःखी मनोज कुमार हे गाणं गातो असे गाणे वापरले अशा सिच्युएशनला हे गाणे वापरले गेले. ‘दो बदन’ (Do badan) या चित्रपटातील सर्वच गाणी अतिशय उत्तम बनली होती. यात रफीची तीन अप्रतिम सोलो गाणी होती. रहा गर्दीशो में हरदम, नसीब में जिसके जो लिखा था आणि भरी दुनिया मे आखिर दिल को समझाने कहा जाये…
लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये ‘लो आ गयी उनकी याद वो नही आये’ तर आशा भोसले यांच्या स्वरात दोन गाणी होती ‘जब चली ठंडी हवाजाब उठी काली घटा’ आणि ‘मत जईयो नोकरिया छोडके’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला बिजनेस केला. याच्या सोबतच प्रदर्शित झालेला ’गाईड’ला देखील त्याने काही शहरांमध्ये मात दिली होती. भारतीय प्रेक्षकांना त्याकाळी दुःखद शेवट असलेले चित्रपट खूप आवडते त्यामुळे हा चित्रपट त्या काळात सुपरहिट झाला!