संगीतकार रोशन यांना आत्मविश्वास दिला होता अनिल विश्वास यांनी!
‘या’अभिनेत्रीने पाकिस्तानी क्रिकेटपटूसोबत लग्न करून आपले करीअर संपवले!
सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील अभिनेत्री रीना रॉय (Reena Roy) यांनी अलीकडेच एका टीव्हीवरील शो मध्ये तिच्या सुरुवातीच्या कालखंडाबद्दल सांगितलं होतं. लहानपणापासूनच तिला सिनेमाचा भयंकर शौक! ७ जानेवारी १९५७ चा तिचा जन्म. शाळेत असताना ती राजेश खन्नाची प्रचंड मोठी फॅन होती. त्याचे सिनेमे पाहण्यासाठी ती चक्क आपल्या बहिणीच्या पर्समधून पैसे चोरून सिनेमाला जात असे. राजेश खन्ना वरील हे तिचे प्रेम तिला सिनेमात येण्यासाठी कारणीभूत ठरलं.
गंमत म्हणजे ज्याचे सिनेमा पाहून सिनेमात येण्याचा निर्णय घेतला त्याच्यासोबत काम करण्याची संधी मात्र तिला तब्बल दहा वर्षानंतर मिळाली! रीनाच्या (Reena Roy) लहानपणी तिच्या घरातील वातावरण फारसे बरे नव्हते. आई-वडिलांचे सतत भांडण. त्यातून बालपण करपून गेले होते. १९७१ साली वयाच्या चौदाव्या वर्षी बी आर इशारा यांनी तिला ‘नई दुनिया नये लोग’ या चित्रपटातून डॅनी डेंजोप्पा सोबत ब्रेक दिला. परंतु हा चित्रपट प्रचंड रखडला. त्यानंतर इशारा यांच्या ‘जरुरत’ मध्ये रीना राय पहिल्यांदा हिंदी सिनेमाच्या पडद्यावर झळकली. लख्ख गौर वर्ण, देखणं रूप, टप्पोरे डोळे, रुंद कपाळ, सरळ नाक त्यामुळे पहिल्या चित्रपटात रीना प्रेक्षकांची आवडती बनली.
याच काळात अभिनेत्री नर्गिस हिने रीनाला बघितले आणि तिला आपल्या प्रोडक्शनच्या सिनेमात घ्यायचे ठरवले. ‘रेश्मा और शेरा’ या चित्रपटानंतर ‘अजंठा आर्ट’ च्या सिनेमासाठी सुनील दत्त सोबत तिचे नाव ठरले परंतु हा प्रोजेक्ट पूर्ण झाला नाही. सुनील दत्त ने मात्र पुढे ‘जख्मी’ या चित्रपटात नायिका म्हणून आपल्या सोबत घेतले. या पूर्वी १९७३ साली ‘जैसे को तैसा’ या चित्रपटात जितेंद्र सोबत रीना (Reena Roy) झळकली आणि तिला खरी आयडेंटिटी मिळाली. राजकुमार कोहली यांच्या १९७६ साली प्रदर्शित झालेल्या मल्टीस्टारर ‘नागिन’ या चित्रपटातून तिने रंगवलेली शीर्षक भूमिका जबरदस्त गाजली. याच काळात रीनाचे नाव जोडले गेले शत्रुघ्न सिन्हा सोबत. हे अफेअर त्या काळात प्रचंड चर्चेत होतं.
या दोघांचे मिलाप, कालीचरण, संग्राम,मुकाबला, जानी दुश्मन, काली बस्ती, दो उस्ताद, भूख, हिरा मोती, ज्वालामुखी, चोर हो तो ऐसा, माटी मांगे खून, विश्वनाथ,हथाकडी, नसीब असे एक डझनहून अधिक चित्रपट पडद्यावर आले. त्या काळातील हि हिट पेअर होती. रील लाईफ आणि रियल लाईफ मध्ये त्यांचा रोमान्स चर्चेत होता. पण १९७९ साली शत्रुघ्न सिन्हाने अनपेक्षितपणे त्याची पहिली प्रेयसी पुनम हिच्यासोबत लग्न केल्यामुळे रीना (Reena Roy) एकटी पडली. तिच्यासाठी हा मोठा धक्का होता पण तिने आता आपल्या फिल्म करिअरकडे सिरीअसली पाहायला सुरुवात केली.
अपनापन, आशा, अर्पण हे तिचे सिनेमे तिच्या अभिनयासाठी आजही आठवले जातात. जितेंद्र सोबत आता ती पडदा गाजवू लागली. ’अपनापन’ या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. नायिका प्रधान चित्रपटाची ती आवडती हीरोइन झाली. ‘सौ दिन सास के’ या चित्रपटात एक हतबल सुनेचा रोल भारतातील तमाम स्त्रियांना प्रचंड आवडला. राजेश खन्नाचे सिनेमे पाहून तिने सिनेमात येण्याचा निर्णय घेतला होता. परंतू त्याच्यासोबत काम करण्याची संधी दिली मात्र १९८१ साली मिळाली. सोहनलाल कंवर यांच्या ‘धनवान’ या चित्रपटात हि जोडी पहिल्यांदा झळकली.
यानंतर ‘धरम कांटा’ ‘आशा ज्योती’ या चित्रपटात देखील ती राजेश खन्ना सोबत होती. पण ही जोडी काही फारशी गाजली नाही. तिची खरी जोडी जमली होती जितेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा सोबत. जितेंद्र सोबतचे तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले. कमल हसन सोबतचा ‘सनम तेरी कसम’ १९८३ सालचा सुपरहिट सिनेमा होता. मात्र ती अचानक पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खान सोबत लग्न करून पाकिस्तानला निघून गेली. हा निकाह फार टिकला नाही. (Reena Roy)
===================
हे देखील वाचा : दिलीप कुमारचा बॉम्बे टॉकीजमधील पहिला पगार!
===================
१९९२ साली ती पुन्हा भारतात परत आली. त्यानंतर तिने पहिला चित्रपट केला ‘आदमी खिलौना नही’ यात तिचा नायक होता जितेंद्र. यानंतर मात्र तिने कॅरेक्टर भूमिका करायला सुरुवात केली. अभिषेक बच्चन यांच्या रेफ्यूजी या चित्रपटातील तिची कॅरेक्टर भूमिका खूप गाजली. आज रीना रॉय ६७ वर्षाची आहे. करीअर अगदी बहरत असताना तिने पाकिस्तानी क्रिकेटपटू मोहसीन खानसोबत लग्न केले आणि सिनेमाला बाय बाय केले. त्यावेळी ती पाकिस्तानला गेली नसती तर कदाचित तिची कलाकारकीर्द आणखी बहरली असती असं नेहमी वाटतं ! (Reena Roy)