हाय ग्रेड फिवरमुळे निसटला ‘हा’ सुपर हिट सिनेमा
दिग्दर्शक लॉरेन्स डिसुझा यांनी १९९१ साली एक चित्रपट दिग्दर्शित केला होता; जो त्यावर्षीचा सर्वाधिक हिट सिनेमा ठरला होता! चित्रपट होता साजन. या म्युझिकल हिट सिनेमाने तब्बल सत्तर लाख कॅसेटची विक्री झाली होती. या सिनेमाने सुभाष घई यांच्या ‘सौदागर’ या मल्टीस्टार सिनेमाला देखील बिजनेसमध्ये मागे टाकले होते. या चित्रपटाची कहाणी रीमा राकेश नाथ यांनी स्वतःच्या अनुभवावर लिहिली होती. जुन्या काळातील प्रसिध्द चरित्र अभिनेते सप्रू यांची कन्या रीमा! पुढे तिने माधुरी दीक्षित चे सेक्रेटरी राकेश नाथ यांच्या सोबत लग्न केले आणि रीमा राकेश नाथ बनली. रीमा सप्रू यांचा एक मोठा अपघात झाला होता. अक्षरशः दोन वर्ष बेडवर पडून राहावं लागलं. पायाचे हाड मोडले. तिथे रॉड टाकला. कॉलर बोन ला इजा झाली. चेहऱ्याला वीस टाके पडले. असंच अपंगासारखा आयुष्य जगावं लागतं काय अशी त्यांना भीती वाटू लागली. आपल्या या अपंग जीवनामध्ये कोणी जीवनसाथी तरी मिळेल का अशी त्यांना शंका वाटायला लागली. आयुष्यात न्यूनगंड निर्माण झाला आणि त्यातून नैराश्य! पण लेखणीने त्यांना आधार दिला. त्या लिहू लागल्या. त्यातून आत्मविश्वास वाढू लागला आणि बॉलीवूडच्या एक सफल स्क्रिप्ट रायटर म्हणून त्या लोकप्रिय झाल्या. याच स्वत:च्या कहाणीचा प्लॉट घेऊन त्यांनी ‘साजन’ या चित्रपटाचे कथा लिहिली. आणि संजय दत्त ने साकारलेल्या अपंग व्यक्तीमत्वाचा कथानकात प्रवेश झाला!
या सिनेमात सुरुवातीला संजय दत्तचे कॅरेक्टर आमिर खान करणार होता. स्क्रिप्ट वाचल्यावर तो या व्यक्तिमत्त्वाच्या प्रेमात पडला होता पण नंतर आपल्या करिअरमध्ये कदाचित ही भूमिका बाधा आणू शकेल अशी भीती वाटल्याने तो सिनेमापासून बाजूला झाला. या सिनेमाची नायिका म्हणून आधी आयेशा झुल्का(Ayesha Jhulka) हिची निवड झाली होती.सलमान सोबतचा तिचा ‘कुर्बान’ नुकताच झळकला होता आणि हिट झाला होता. प्रेक्षकांना तिचे लुक्स आवडले होते. ‘साजन’ सिनेमात नायिकेचा रोल मिळाल्याने ती प्रचंड खूश होती. सिनेमाचं शेड्युल ठरलं. लॉरेन्स डीसुझाला हा सिनेमा कमीत कमी काळात पूर्ण करायचा होता.निर्माते सुधाकर बोकाडेचा तसा आग्रह होता. सर्व गोष्टी सेट झाल्या होत्या. पण शूटिंगच्या आदल्या दिवशी आयेशा झुल्काला(Ayesha Jhulka) प्रचंड ताप आला. अगदी हाय ग्रेड फीवर. त्यामुळे ती शूटिंगला येऊ शकली नाही. डॉक्टरांनी तिला पुढचे दोन महिने सक्त विश्रांतीची आवश्यकता सांगितली. आयेशाला सोडून सिनेमाचं शूटिंग सुरू झालं. पण एक वेळ अशी आली की आता आयेशाला(Ayesha Jhulka) रिप्लेस करून दुसरी नायिका शोधणे भाग होते. नव्याने शोध सुरू झाला. आयेशाला खूप वाईट वाटले पण नाईलाज होता. नव्या नायिकेचा शोध माधुरी दीक्षित या नावावर थांबला. तिच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. माधुरी त्याकाळी सुपरस्टार होती. परंतु चित्रपटाचे कथानक ऐकल्यानंतर तिने होकार दिला. आणि अवघ्या ३६ दिवसांमध्ये या चित्रपटाचे संपूर्ण शूटिंग पूर्ण झाले! हा एक विक्रम होता. या सिनेमाचे बरेचसे शूटिंग दक्षिण भारतातील उटी या निसर्गरम्य ठिकाणी झाले होते. आयेशा च्या हातात आलेली एक चांगली संधी स्वत:च्या आजारपणामुळे निघून गेली.याची खंत तिने जाहीरपणे बोलून दाखवली. लॉरेन्स डिसुझा सोबत आयेशा ने १९९२ साली पुढे एक सिनेमा केला पण तो फ्लॉप झाला. हा सिनेमा होता ‘बलमा’ ज्यात तिचा नायक अविनाश वाधवान होता.
========
हे देखील वाचा :‘चंबळच्या खोऱ्यातील डाकू’ बॉलीवूडच्या दिग्दर्शकावर भडकले….
========
‘साजन’ या सिनेमात आधी सलमान खान आणि संजय दत्त च्या जागी ऋषी कपूर आणि प्रसेनजीत भूमिका करणार होते. परंतु तारखांच्या प्रॉब्लेम मुळे हे दोघेही सिनेमातून बाहेर पडले. या सिनेमाचे निर्माते सुधाकर बोकाडे होते. या चित्रपटाच्या सिल्वर जुबली पार्टीमध्ये मोठा गोंधळ झाला होता. निर्माता दिग्दर्शक सुभाष घाई यांनी ड्रिंक्स घेऊन मोठा राडा पार्टीमध्ये केला होता. ‘साजन’ सारख्या लो बजेट सिनेमाने त्यांच्या ‘सौदागर’ या चित्रपटाला बिग फाईट देत त्याच्यापेक्षा जास्त बिझनेस केला होता हा राग सुभाष भाई यांच्या मनात होता त्यातून हा राडा झाला होता. याची चर्चा मिडीया त चांगलीच रंगली होती.खैर आयेशा झुल्काच्या(Ayesha Jhulka) ‘हाय ग्रेड फिवर ‘ ने तिच्या हातून सुपर हिट सिनेमा निसटला हे नक्की!
धनंजय कुलकर्णी