दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘या’ गोष्टीमुळे काजोलने केले होते आईसोबत भांडण; दोन आठवडे धरला होता अबोला..
बॉलीवूड मधील मुखर्जी आणि समर्थ ही दोन कुटुंबे स्वातंत्र्यापूर्वीपासून सिनेमाच्या व्यवसायात आहेत. १९७२ साली आलेल्या ‘एक बार मुस्कुरादो’ या सिनेमामध्ये तनुजा आणि शोमू मुखर्जी यांनी एकत्र भूमिका केली होती. शोमु मुखर्जी हा शशिधर मुखर्जी यांचा मुलगा. शशिधर मुखर्जी फिल्मीस्तान, फिल्मालय स्टुडिओचे मालक. तनुजा देखील फिल्मी कुटुंबातली. तिची आई शोभना समर्थ, वडील कुमार सेन समर्थ, तर बहिण नूतन सर्व जण सिनेमातील. (Untold story of Kajol and Tanuja)
तनुजा आणि शोमू मुखर्जी यांनी १९७३ साली लग्न केले. त्यांना पहिले कन्या रत्न प्राप्त झाले. काजोलचा जन्म पाच ऑगस्ट १९७४ चा. पुढे काजोलनेही चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. आज लोक तिला ‘स्टारकिड’ म्हणून नाही तर, एक प्रगल्भ अभिनेत्री म्हणून ओळखतात. हा किस्सा आहे काजोलच्या लहानपणीचा.
लहानपणी काजोलला हत्ती खूप आवडायचे. त्यामुळे तनुजा तिला कायम प्राणी संग्रहालयात घेऊन जायची. १९८० साली एकदा मुंबईला एका चित्रपटगृहात राजेश खन्ना आणि तनुजा यांचा १९७१ सालचा ‘हाथी मेरे साथी’ हा चित्रपट रिपीट रनला प्रदर्शित झाला. काजोल तेव्हा सहा वर्षाची होती. तनुजाला वाटले हा सिनेमा आपल्या मुलीला – काजोलला खूप आवडेल कारण त्यामध्ये हत्ती आहे. काजोलला घेऊन ती सिनेमा पाहायला गेली. (Untold story of Kajol and Tanuja)
या सिनेमातील एका प्रसंगात रामू हत्तीला तनुजा घराबाहेर काढते आणि तिकडेच हत्तीचा मृत्यू होतो. हा प्रसंग पाहिल्यानंतर लहानगी काजोल थिएटर मध्येच खूप रडू लागली आणि रामू हत्तीच्या मृत्यूला आपली आई जबाबदार आहे, असे ते समजून सिनेमा पाहून आल्यानंतर तिने आईसोबत चक्क भांडण केले. “तू रामू हत्तीला बाहेर का काढले? त्यामुळे तो बिचारा मेला नं?” तनुजा ने तिला हर तऱ्हेने समजून सांगितले.” बेटा हे सगळं खोटं असतं. सिनेमात असंच खोटं खोटं दाखवलं आहे. रामू हत्ती अजून जिवंत आहे तो मेलेला नाही.” पण काजोलचे काही समाधान होत नव्हते. (Untold story of Kajol and Tanuja)
दोन आठवडे ती आईशी धड बोलत देखील नव्हती. आपल्या लाडक्या रामू हत्तीच्या मृत्यूला आई जबाबदार आहे, असे तिच्या चिमुकल्या डोक्यात फिट्ट बसले होते. तनुजाला देखील काय करावे समजत नव्हते. काजोल नीट खात पीत नव्हती. आता तनुजाला तिची काळजी वाटू लागली होती. पण त्याच वेळी एक अशी घटना घडली की, काजोलचा आपल्या आई वरील राग आपोआप कमी झाला.
त्यावेळी मुंबईमध्ये एक सर्कस आली होती. या सर्कसच्या उद्घाटनाला तनुजाला बोलावले होते. तनुजा आपली मुलगी काजोल हिला घेऊन उद्घाटनाला गेली. सर्कसच्या प्रांगणात जाताना तिथे काही हत्ती बांधून ठेवले होते. त्यांच्या जवळून जात असताना एका हत्तीने त्याची सोंड लांबवून तनुजाच्या साडीचा पदर ओढला! तनुजा घाबरून गेली. पण लगेच सर्कसचे मालक तिथे आले आणि त्यांनी सांगितले “तनुजाजी, ये वोही रामू हाथी है जिसके साथ आपने ‘हाथी मेरे साथी’ मे काम किया था. उसने आपको पहचान लिया है.” (Untold story of Kajol and Tanuja)
============
हे देखील वाचा – अमिताभ बच्चन यांनी मला ठार मारण्याच्या प्रयत्न केला; परवीन बाबी यांनी केला होता गौप्यस्फोट..
============
तनुजाला खूप आनंद झाला. ती रामू हत्तीच्या जवळ गेली. त्याला केळी खायला दिली. काजोल देखील रामू हत्ती जिवंत आहे पाहून खूप आनंदित झाली. तिने त्याच्यासोबत काही फोटो काढले. अशाप्रकारे काजोलचा आपल्या आई वरील राग क्षणार्धात पळून गेला. हा किस्सा तनुजा ने एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितला होता. (Untold story of Kajol and Tanuja)