‘त्या’ एक गोष्टीमुळे रमेश सिप्पी यांच्या बायकोने धरला होता सहा महिने अबोला…
संशयाचे भूत एकदम मानगुटीवर बसले की, चांगल्या संसाराची वाट लागायला वेळ लागत नाही. पण हाच संशय जर वेळीच दूर झाला, तर पुढे येणारे सगळे प्रश्न आपोआप कमी होत जातात. संसाररूपी रथात सारथ्य करणारे दोन्ही अश्व जर परस्परांशी समन्वय साधून मार्गक्रमण करत असतील तरच प्रपंचाची वाटचाल सोपे असते, हा आपल्या संस्कृतीतील अर्वाचीन विचार आहे आणि हेच चिरंतन सत्य देखील आहे. तरी जोडप्यांमध्ये बेबनाव याच संशयामुळे होत राहतात.
पण संशयामुळे जर ‘सेलिब्रेटी’ जोडप्यांमध्ये वाद झाले तर!? सेलिब्रिटींभोवती असलेलं प्रसिद्धीचे वलय, लाईम लाईटचा प्रकाशझोत, वातावरणातील मोकळेपणा, स्त्री-पुरुषांमधील स्त्रैण संबंध यातून संशयाला भरपूर वाव मिळत जातो. गॉसिप मॅगझिन्स त्यात अधिकच मसाला टाकत राहतात. आणि याचा त्रास (काही वेळा) प्रामाणिक लोकांना होत राहतो. अर्थात चर्चेत राहण्यासाठी सेलिब्रिटी स्वतःच असला खोटा नाटा मालमसाला मीडियाला पुरवत असतात. काहीही करून आपण प्रेक्षकांच्या पुढे राहिले पाहिजे, चर्चेत राहिले पाहिजे हा या मागचा उद्देश असतो. यातून मिळणारी पब्लिसिटी त्यांना हवी असते. पण प्रत्येकजणच तसा नसतो.
‘शोले’ चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांना एकदा असाच भयंकर अनुभव आला होता. ज्यामुळे तब्बल सहा महिने त्यांच्या बायकोने त्यांच्याशी अबोला धरला होता. काय होता हा किस्सा? त्यावेळी रमेश सिप्पी त्यांच्या महत्वाकांक्षी ‘शोले’ या चित्रपटाचे चित्रीकरण बेंगलोर जवळच्या रामनगर येथे करत होते. दिवसभर कडक उन्हामध्ये चित्रीकरण केल्यानंतर संध्याकाळी थकून भागून ते लवकर झोपी जात. (Untold story of Ramesh Sippy)
एकदा मध्यरात्री उशिरा त्यांच्या रूममधील फोन खणखणला. अर्धवट झोपेतच त्यांनी फोन उचलला. फोनवर मुंबईहून त्यांची पत्नी गीता बोलत होती. तिने रागा रागातच विचारले, “या महिन्याचा स्टारडस्ट वाचलात का?” रमेश सिप्पी यांनी सांगितले,” नाही!”
त्यावर बायकोने सांगितले, “उद्या वाचा आणि मग फोन करा!” रमेश सिप्पींची झोपच उडाली. गीताचा फोन तोही मध्यरात्री म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड असणार आणि तिच्या एकंदरीत बोलण्यावरून बातमी डेंजर असणार, हे समजले. पण काय आहे, हे समजत नव्हते.
पहाटे उठल्यावर त्यांनी स्टारडस्टचा अंक मागून घेतला. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी अंक पाहिला त्यात त्यांना काहीच सापडले नाही. त्यावेळी म्हणजे १९७४ साली फोन करणे देखील खूप अवघड गोष्ट होती. त्यावेळी ट्रंक कॉल लावावा लागे. रमेश सिप्पी यांनी संध्याकाळी मुंबईला ट्रंक कॉल लावून गीताला सांगितले, “मी स्टारडस्ट पाहिला. मला त्यात काही आढळले नाही.”
==========
हे ही वाचा: …यामुळे बिग बींनी बस स्टॉपवर असहाय्य अवस्थेत असलेल्या भारत भूषण यांना दिली नाही लिफ्ट
==========
गीताने फणकाऱ्यात उत्तर दिले, “तुम्हाला कसे सापडेल? पेज नंबर ४० वाचा आणि मला फोन करा”, असे म्हणून फोन कट केला. रमेश सिप्पीने स्टारडस्ट घेऊन पेज नंबर ४० काढले. त्या पानावरील अनेक बातम्यांमध्ये एक बातमी त्यांच्याबाबत होती. त्यात रमेश सिप्पी आणि अभिनेत्री परवीन बाबी यांच्या प्रेम प्रकरणाची खमंग बातमी त्यात होती. (Untold story of Ramesh Sippy)
रमेश सिप्पीना आश्चर्य वाटले कारण तोवर ते परवीन बाबीला भेटले देखील नव्हते. त्यांनी लगेच पत्नी गीताला ट्रंक कॉल करून सांगितले, “ही बातमी पूर्णतः चुकीचे आहे. मी अजूनपर्यंत परवीन बाबीला पाहिले पण नाहीये.” त्यावर पत्नी म्हणाली, “मग बातमी आलीच कशी?” ती अजून रागातच होती.
=========
हे ही वाचा: बॉलिवूडमध्ये चमकलेल्या ‘या’ मराठी अभिनेत्री सध्या कुठे गायब आहेत?
=========
सिप्पी म्हणाले, “आता मला काय माहित?” त्यावर गीता सिप्पी म्हणाल्या, “जर बातमी खोटी असेल, तर तुम्ही ताबडतोब संपादकाला फोन करून माफी मागायला सांगा.” सिप्पीनी ‘हो’ म्हणून फोन ठेवला. ‘शोले’ चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी त्यांच्या डोक्याला हा नवीनच भुंगा लागला होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी ‘स्टारडस्ट’ संपादकाच्या नावाचा शोध घेतला. संपादक नारी हिरा अमिताभ बच्चन यांचे चांगले मित्र आहेत, असे त्यांना कळले. पुन्हा त्यांनी ट्रंक कॉल लावून अमिताभ बच्चन करवी संपादकाला सर्व घटना ऐकवली आणि त्यांना ही बातमी चुकीची असून तुम्ही त्याबद्दल माफी मागा असे सांगितले. (Untold story of Ramesh Sippy)
स्टारडस्ट संपादकाने देखील ‘सॉरी’ म्हणून चुकीबाबत माफीची बातमी छापतो असे सांगितले. रमेश सिप्पी यांनी बायकोला फोन करून सर्व वृत्तांत दिला. स्टारडस्टवाले देखील भारी.. त्यांनी पुढच्या अंकात माफीनामा छापलाच नाही. तब्बल सहा महिन्यांनी तो छापला. पण तोवर सहा महिने रमेश सिप्पी यांच्या पत्नीने त्यांच्याशी चक्क अबोला धरला होता.