
कलात्मक चित्रपटाची नांदी देणारा : Bhuvan Shome!
भारतीय सिनेमाच्या इतिहासात कलात्मक तथा समांतर चित्रपटांची सुरुवात ज्या सिनेमाने झाली आणि ज्या सिनेमाला अधिकृतपणे न्यू वेव्ह सिनेमा चा पायोनियर सिनेमा म्हणून ओळखले जाते तो सिनेमा म्हणजे मृणाल सेन यांनी दिग्दर्शित केलेला आणि १२ मे १९६९ रोजी प्रदर्शित झालेला ‘भुवन शोम’. हा सिनेमा खऱ्या अर्थाने भारतीय सिनेमातील एक माईल स्टोन सिनेमा ठरला. कारण याच सिनेमानंतर कलात्मक सिनेमाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आणि अशा सिनेमाची निर्मिती देखील मोठ्या संख्येने होऊ लागली.
बुद्धिजीवी वर्गाला आवडणारा ज्यात मनोरंजनाची मात्रा कमी असली तरी विचार करायला लावणारा आणि अधिकाधिक वास्तवदर्शी, इथल्या मातीतील असा हा सिनेमा होता. हा सिनेमा पलायनवादापासून कोसो दूर होता. या सिनेमामुळे कलात्मक चित्रपटांनी भारतीय सिनेमांमध्ये स्वतःचे एक समृद्ध दालन उभे केले. या सर्व कलात्मक सिनेमाची सुरुवात ‘भुवन शोम’ पासून झाली. हा चित्रपट तसा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे. दिग्दर्शक मृणाल सेन यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. तसेच अभिनेता उत्पल दत्त आणि अभिनेत्री सुहासिनी मुळे यांचा देखील हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. महानायक अमिताभ बच्चन यांचा देखील या सिनेमाशी खूप जवळचा संबंध आहे आणि त्यांचा देखील हा पहिला हिंदी सिनेमा आहे. यात त्यांनी अभिनय केला नाही पण त्यांच्या आवाजामध्ये या सिनेमाची कथा पुढे जाताना दिसते त्या अर्थाने अमिताभ बच्चन या चित्रपटाचे ‘व्हॉइस नॅरेटर’ आहेत.

सिनेमाचे कथानक इथल्या अस्सल मातीतील आहे. त्यामुळेच रसिकांना ते जास्त भावते. चित्रपटात तसं बघितलं तर महत्वाची दोनच पात्र आहेत. भुवन शोम आणि गौरी म्हणजेच उत्पल दत्त आणि सुहासिनी मुळे. हा सिनेमा कृष्णधवल आहे. चित्रपटाचे कथानक साठच्या दशकातील आहे. ही कथा ख्यातनाम बंगाली लेखक बलाई चंद मुखोपाध्याय यांच्या कादंबरीवर आधारित आहे. चित्रपटाचा नायक भुवन शोम (उत्पल दत्त) एक मध्यमवयीन, विधुर कर्तव्य कठोर रेल्वे अधिकारी आहे. आपल्या तत्त्वाशी तो प्रचंड प्रामाणिक आहे. कर्तव्यात केलेली कसूर त्याला अजिबात आवडत नाही. त्यामुळेच एक खडूस अधिकारी म्हणून त्याची ख्याती आहे.
================================
हे देखील वाचा: ….. आणि Yash Chopra यांच्या आग्रहाने जावेद अख्तर गीतकार बनले!
=================================
स्वतःच्या मुलाने कामात दिरंगाई केली म्हणून त्याला देखील त्याने निलंबित केलेले असते. त्यामुळे एक निष्ठुर, कठोर आणि कडक शिस्तीचा अधिकारी म्हणून त्याचा लौकिक आहे. चित्रपटाची कथा सुरू होते ती अशाच एका प्रसंगापासून. एका तिकीट चेकर ने प्रवाशांकडून अधिक पैसे गोळा करून भ्रष्टाचार केला असा त्याच्यावर आरोप आहे आणि त्याचा रिपोर्ट भुवन शोम तयार करतो आहे. हा तिकीट चेकर सखीचंद जाधव (साधू मेहेर) प्रचंड घाबरलेला आहे परंतु साहेबांसमोर बोलायची त्याची हिंमत होत नाही. भुवन शोम त्याचा रिपोर्ट लिहून ठेवतो आता त्या तिकीट चेकर ची नौकरी नक्की जाणार असते. आपल्या कामाच्या ‘स्टाईल’ वर भुवन शोम खूष आहे.
आपल्या रोजच्या कामातून ब्रेक घ्यावा म्हणून पक्षांची शिकार करण्यासाठी भुवन शोम सौराष्ट्रा मध्ये जातो. त्या एका दिवसात त्याला जे अनुभव मिळतात; त्यावर हा संपूर्ण चित्रपट आहे. भुवन शोम शिकारीसाठी खेड्यात जातो तिथे त्याची गाठ एका तरुण मुली सोबत पडते ही मुलगी असते गौरी (सुहासिनी मुळे) ही त्याला शिकारीसाठी मदत करते. प्रचंड करड्या शिस्तीचा भुवन शोम गावातील साधे,सोपे , मनमोकळे आणि परस्परांना मदतीचे वातावरण बघून अंतर बाह्य बदलतो. त्याच्यातील होत जाणारे बदल आणि माणूसपणा कडे त्याची होणारी वाटचाल दिग्दर्शकाने फार सुंदर रीतीने टिपली आहे. ‘खरा आनंद हा इतरांना मदत करण्याचा असतो’ हा मूलमंत्र तो नकळतपणे गौरी कडून शिकून घेतो.

गौरीचे निर्व्याज्य प्रेम, माया त्या कर्तव्य कठोर अधिकाऱ्याला माणूस बनवते. जेव्हा भुवन शोम ला कळते की आपण ज्या तिकीट चेकर ला निलंबित करणार आहोत तो गौरीचा नवरा आहे तेव्हा तो गोंधळतो.आतून हलतो. पक्षाची शिकार त्याच्या हातून व्हावी म्हणून गौरी हर प्रकारे त्याला मदत करते. पक्षी शहरी पोशाखाला घाबरतात म्हणून गौरी भुवन शोम ला तिच्या वडिलांचे कपडे घालायला लावते. तरी पक्षी फिरकत नाहीत. तेव्हा ती भर उन्हात दोन-तीन किलोमीटर पायी जाऊन झाडाच्या फांद्या घेऊन येते आणि त्या फांद्या आणि पानांच्या मध्ये भुवन शोम ला बसवते. मग पक्षी तिथे येऊन बसतात. पक्षाची शिकार त्याच्या हातून व्हावी म्हणून ती जीवाचा आटापिटा करते आणि हे सर्व ती अतिशय निर्व्याज रीतीने करत असते. तिला माहित देखील नसतं की आपल्या नवऱ्याला निलंबित करणारा साहेब हा आपल्या समोर आहे.
चित्रपटाला अतिशय सुंदर असे संगीत विजय राघव राव यांनी दिले आहे. यात एक अतिशय गोड राजस्थानी लोकगीत नायिकेच्या तोंडी आहे. उत्पल दत्त यांचा हा पहिलाच हिंदी चित्रपट होता. या सिनेमात त्यांनी कर्तव्य कठोर अधिकारी आणि त्याचे होत जाणारे परिवर्तन आपल्या अभिनयातून खूप चांगला रीतीने दाखवले आहे. अभिनेत्री सुहासिनी मुळे हिचा देखील हा पहिलाच चित्रपट. अतिशय गोड दिसते या चित्रपटात. हिला आपण अनेक वर्षानंतर ‘लगान’ या चित्रपटात पाहिले. दिग्दर्शक मृणाल सेन यांचे दिग्दर्शन कौशल्य आपल्याला प्रत्येक फ्रेम मध्ये दिसते. या सिनेमात ॲनिमेशनचा खूप चांगला वापर करून घेण्यात आला. हे देखील या सिनेमाचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.
चित्रपट अनेक पातळ्यांवरून आपल्याशी संवाद साधतो. शहरी आणि ग्रामीण दोन संस्कृतींचा आणि सामाजिक जाणीवांचा चांगला परिपाठ इथे आपल्याला दिसतो. चित्रपटातील परस्परांना वाटणाऱ्या भयाचे फार सुंदर चित्रण केले आहे. चित्रपटात एका दृश्यात एक रेडा भुवन शोम च्या मागे लागतो त्या रेड्या पासून त्याची सुटका गौरी करते. म्हणजे रेड्याला भुवन शोम घाबरतो. रेडा गौरीला घाबरतो. आणि गौरीचा नवरा सखीचंद जाधव भुवन शोम ला घाबरतो! असे एक भयाचे सुंदर वर्तुळ येथे दाखवले आहे आणि हीच इथली सामाजिक अपरिहार्यता आहे. दिग्दर्शकाने चित्रपटात प्रतिकांचा वापर फार सुंदर रीतीने केला आहे.
================================
हे देखील वाचा : Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..
=================================
चित्रपटात शेवटी काय घडते? भुवन शोम तिकीट चेकर ला टर्मिनेट करतो का? गौरीची त्यावर काय प्रतिक्रिया असते? नक्की काय घडते? या सिनेमाचा शेवट सांगून मी स्पायलर देत नाही. पण हा सिनेमा you tube वर उपलब्ध आहे तुम्ही नक्की पहा. त्यावर्षीच्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘भुवन शोम’ ला सर्वोत्कृष्ट चित्रपट, मृणाल सेन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि उत्पल दत्त यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता अशी पारितोषिक मिळाले. तसेच चौथ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे ज्युरी अवार्ड मिळाले.