महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
वकांडा फॉरएवर ; ब्लॅक पँथरचा जगभरात धुमाकूळ
वकांडा फॉरएवर(Wakanda Forever) हे म्हणत ब्लॅक पॅंथर हा हॉलिवडू चित्रपट सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या या चित्रपटानं आता बॉलिवूडपटांनाही मागे टाकले आहे. ब्लॅक पँथर हे मार्वल कॉमिक्समधील एक काल्पनिक पात्र आहे. हे अमेरिकन कॉमिक लेखक स्टॅनली यांनी तयार केले होते. चित्रपटात आलेल्या या ब्लॅक सुपरहिरोनं पुन्हा एकदा बॉक्स ऑफीसवर आपला ठसा उमटवला आहे. ब्लॅक पँथर-वाकांडा फॉरेवर चित्रपट 11 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर अवघ्या तीन दिवसांत या चित्रपटाने बक्कळ कमाई केली. भारतातही या हॉलिवूड चित्रपटाचे बहुतांश शो हाऊसफुल्ल होते. ब्लॅक पँथर-वकांडा फॉरएवरने भारतात 51 कोटी रुपयांची कमाई केली आहे. गेल्या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या तीन बॉलिवूडपटांपेक्षा ही कमाई दुप्पटीनं आहे.
ब्लॅक पँथर-वकांडा फॉरएवरने(Wakanda Forever) जगभरात 2678 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे एकूण बजेट 2030 कोटी रुपयांचे होते, चित्रपटाने प्रदर्शित होताच बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे. यासोबतच चित्रपटाने 500 कोटींचा नफाही कमावला आहे, आणि हा आकडा आता अधिकच वाढत जाणार आहे. ब्लॅक पँथर-वकांडा फॉरएवर (Wakanda Forever)चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॅक पँथरचा सिक्वेल आहे. या चित्रपटापुढे कोणताही भारतीय चित्रपट कमाईच्या आसपासही पोहचला नाही हे विशेष. अमिताभ बच्चन, बोमन इराणी, अनुपम खेर, नीना गुप्ता या दिग्गज कलाकारांचा उंचाई, थोड्याप्रमाणात यशस्वी झाला आहे. मात्र थाई मसाज, यशोदा यांना अपेक्षित यश मिळाले नाही. या तीनही चित्रपटांची एकूण कमाई 21 कोटी असून ब्लॅक पँथर-वकांडा फॉरएवरने 51 कोटींची कमाई केली आहे. यापूर्वी अॅव्हेंजर एंडगेम या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 442 कोटींची कमाई केली होती. इन्फिनिटी वॉरने 296 कोटींची कमाई केली. तर स्पायडर-मॅन: नो वे होमने 261 कोटींची कमाई केली. द जंगल बुक या चित्रपटानं 259 कोटींची कमाई केली होती.
======
हे देखील वाचा : अनिल कपूरच्या अनप्रोफेशनल अप्रोचवर प्रचंड नाराज…
======
आता मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या ब्लॅक पँथर मालिकेतील ब्लॅक पँथर-वकांडा फॉरएवर(Wakanda Forever) हा दुसरा चित्रपट आहे. 2018 मध्ये आलेल्या ब्लॅक पॅंथरमध्ये प्रमुख भूमिकेत असलेला अभिनेता चॅडविक बोसमन, याचा 2020 मध्ये कर्करोगाने मृत्यू झाला. त्यानंतर 2019 मध्ये ब्लॅक पॅंथरच्या सिक्वेलची घोषणा करण्यात आली. परंतु चॅडविकच्या मृत्यूनंतर, निर्मात्यांनी त्याच्या भूमिकेत इतर कोणत्याही अभिनेत्याला न घेण्याचा निर्णय घेतला…कारण ब्लॅक पॅंथर म्हणजे चॅडविक बोसमन हे समिकरण एवढं फिट्ट झालं की, दुसरा कोणताही अभिनेता त्या भूमिकेत प्रेक्षकांना भावला नसता. हा दिग्दर्शकाचा निर्णय भावनिक ठरला. चॅडविकच्या चाहत्यांनी त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठीही या चित्रपटाला पसंती दिली आहे. ब्लॅक पँथर हे मार्वल कॉमिक्समधील एक काल्पनिक पात्र आहे. हे अमेरिकन कॉमिक लेखक स्टॅनली यांनी तयार केले होते. हे पात्र प्रथम 1966 च्या कॉमिक बुक फॅन्टास्टिक 4 मध्ये प्रदर्शित करण्यात आले. ब्लॅक पँथरचे खरे नाव टी’चाल्ला आहे, जो आफ्रिकेतील काल्पनिक देश वाकांडाचा राजा बनून त्या देशाचे रक्षण करतो. राजा टी’चाल्ला (चॅडविक बोसमन) जीवनासाठी लढा देत आहे आणि त्याची बहीण शुरी (लेटिशिया राइट) तिच्या भावाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. व्हायब्रेनियममुळे वाकांडा जगातील सर्वात शक्तिशाली देशांपैकी एक आहे. अन्य देशांना वाकांडावर वर्चस्व मिळवायचे आहे. परंतु वाकांडाची राणी प्रत्येकवेळी हा प्रयत्न हाणून पाडते. या लढ्यात रामोंडा मारला जातो आणि शुरी तिच्या भावाच्या आणि आईच्या मृत्यूनंतर एकटी पडते. यावेळी तिच्या मदतीसाठी पुढे आलेला ब्लॅक पँथर कोण आहे? हे सर्व जाणण्यासाठी ब्लॅक पॅंथर वकांडा फॉरएवर(Wakanda Forever) पहावा असाच आहे. या सगळ्यात चित्रपटातील VFX देखील प्रमुख आकर्षण ठरला आहे.
एकूण वकांडा फॉरएवर….म्हणत वाकांडाच्या राणीनं बॉक्स ऑफीसवर आपलं राज्य प्रस्थापित केलं आहे. या राणीच्या ताकदीपुढे बॉलिवूडही फिकं पडलं आहे. येता आठवडाही वाकांडामय राहणार आहे.
सई बने