भारताच्या माजी पंतप्रधानांनी वाचवले होते डिंपल कपाडियाचे प्राण
हिंदी सिनेमाच्या इतिहासात अपघातांना तोटा नाही. पण हा जो किस्सा मी सांगणार आहे यात अपघात होता होता राहिला म्हणजे अपघात झालाच नाही, पण झाला असता… आणि या अपघातामध्ये दोन मोठ्या स्टार कलाकारांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. हे दोन स्टार होते अभिनेत्री डिंपल कपाडिया (Dimple Kapadia) आणि अभिनेता राकेश रोशन. आता तुम्ही म्हणाल, या दोघांनी तर एकाही चित्रपटात एकत्र काम केले नाही, मग अपघाताच्या वेळी एकत्र कसे आले? त्याचाच हा रंजक किस्सा-
हा किस्सा आहे १९७३ सालचा. मस्त मजेशीर किस्सा आहे हा. १९७३ साली त्यावेळी डिंपल कपाडियाचा ‘बॉबी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला नव्हता आणि त्यापूर्वीच ११ मार्च १९७३ रोजी तिने सुपरस्टार राजेश खन्ना सोबत लग्न केले होते. लग्नानंतर राजेश खन्ना डिंपल कपाडियाला घेऊन कश्मीरला गेला होता… हनीमूनसाठीच पण कामासाठीही! म्हणजे राजेश खन्ना डिंपलला ‘जे ओमप्रकाश’ यांच्या ‘आपकी कसम’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी घेऊन गेला होता. हनिमून पण होईल आणि शूटिंग पण, हा दुहेरी हेतू यातून साध्य होणार झाला. (Dimple Kapadia)
‘आपकी कसम’ हा जे ओमप्रकाश यांचा दिग्दर्शनातील पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटाचे चित्रीकरण लेह, लडाख सोबतच मनाली, सिमला येथे देखील झाले. ‘आप की कसम’चे काश्मीर मधील शूटिंग संपले. पण त्याच वेळी राजेश खन्नाला असा निरोप मिळाला की, तो अभिनय करत असलेल्या ‘त्याग’ या चित्रपटाचे एक युनिट देखील काश्मीरला पोहोचत आहे. (‘त्याग’ हा चित्रपट पुढे खूप रेंगाळला. १९७७ साली प्रदर्शित झाला. हा चित्रपट सचिनदा यांनी स्वरबध्द करून प्रदर्शित झालेला शेवटचा चित्रपट ठरला. राजेश- शर्मिला या हिट जोडीचा हा शेवटचा चित्रपट होता. या चित्रपटाची निर्मिती शर्मिला टागोरची होती, तर दिग्दर्शन दिन दयाळ शर्मा यांचे होते.)
तर, त्याग चित्रपटाचे युनिट काश्मीरमध्ये दाखल होत असल्याचे कळल्यामुळे राजेश खन्ना डिंपलला (Dimple Kapadia) म्हणाला, “मी काही दिवसांत ‘त्याग’ या चित्रपटाचे शूटिंग संपवून मुंबईला येतो. तोवर तुम्ही दिल्ली मार्गे मुंबईला जा.” त्यावेळी जे ओम प्रकाश यांचा जावई राकेश रोशन सुध्दा तिथे आला होता. ठरल्याप्रमाणे डिंपल, राकेश रोशन, जे ओम प्रकाशच्या युनिटसोबत विमानाने दिल्लीला निघाले. हे फ्लाईट श्रीनगर – दिल्ली असे होते.
तो दिवस होता १४ मे १९७३. त्या दिवशी अचानक हवामानात बदल झाला आणि बर्फवृष्टी सुरू झाली. विमानाने टेक ऑफ केले होते. त्या दिवशी सर्वत्र वातावरण खराबच होते. राजधानी दिल्लीमध्येही वातावरण बिघडलेले होते. दिल्लीला पोहोचेपर्यंत विमान रडारवरून गायब झाले. सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. दिल्ली विमानतळावर अफरातफरीचा ‘माहोल’ निर्माण झाला. विमान दिल्ली विमानतळावर घिरट्या घालत होते, पण खराब हवामानामुळे ‘लँडिंग’ करता येत नव्हते. विमानातील इंधनाचा साठा कमी होत चालला होता. आणीबाणीची परिस्थिती होती. पण अखेर विमानाच्या पायलटने सुखरूपपणे विमानाला या संकटातून बाहेर काढले. (Dimple Kapadia)
========
हे देखील वाचा – जेव्हा धर्मेंद्रने बसच्या टपावर बसून प्रवास केला आणि कंडक्टरच्या लक्षात आलं तेव्हा…
========
आग्रा विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. यावेळी या विमानातील प्रत्येक व्यक्ती पायलटचे आभार मनात होती कारण त्याच्या कौशल्यामुळेच प्रवाशांचे प्राण वाचले होते. प्रत्येकजण पायलटला आशीर्वाद देत होते. डिंपल आणि राकेश रोशन आणि जे ओम प्रकाश यांच्या टीमनेही पायलटचे शतशः आभार मानले. या विमानाचे पायलट पुढे भारताचे पंतप्रधान झाले ….त्यांचे नाव राजीव गांधी! (Dimple Kapadia)