महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
जेव्हा देवानंदला त्याची ५५ वर्षांपूर्वीची कॅप एका चाहत्याकडे पुन्हा सापडते!
सदाबहार अभिनेता देवानंद (Dev Ananad) यांचे फॅन तीन ते चार पिढ्यांमध्ये आहेत. तब्बल पन्नास- साठ वर्ष त्यांनी रुपेरी पडदा गाजवला. प्रभात फिल्म्सच्या ‘हम एक है’ (१९४६) या चित्रपटापासून त्यांचा रुपेरी प्रवास सुरू झाला. तो पुढे अव्याहतपणे अनेक वर्षे चालू राहिला. या काळामध्ये रसिकांच्या अनेक पिढ्या बदलल्या. पण देव आनंदचे रसिकांच्या दिलातील स्थान कायम राहिले.
त्याचं दिसणं, त्याचं गुलकंदी हसणं, त्याची गाणी, त्याचे सिनेमे यावर प्रेक्षक कायम प्रेम करत राहिले. देव आंनदच्या (Dev Ananad) एका कॅपचा किस्सा खूप इंटरेस्टिंग आहे. त्याने एका चित्रपटाच्या प्रीमियर नंतर आपल्या डोक्यावरची कॅप प्रेक्षकांमध्ये भिरकावली होती. ती कॅप एका प्रेक्षकाने कॅच केली. आणि ती प्राणापलीकडे जपली. इतकी की तब्बल पन्नास वर्षानंतर देवानंदला ती कॅप पुन्हा बघायला मिळाली!!! कोण होता तो चाहता आणि काय होता तो नेमका किस्सा?
अभिनेता देव आनंद (Dev Ananad) सुरुवातीपासूनच आपल्या स्टाईलसाठी लोकप्रिय होता. वेगवेगळ्या स्वेटर्स, जॅकेट आणि कॅप यासाठी तो ओळखला जायचा. नवकेतनच्या ‘बाजी’ (१९५१) या चित्रपटाचा प्रीमियर मुंबईमध्ये झाला, हा सिनेमा १ जुलै १९५१ रोजी प्रदर्शित झाला होता. या सिनेमाच्या प्रीमियरला प्रेक्षकांनी प्रचंड मोठी गर्दी केली होती. देव आनंद प्रचंड खूष झाला होता. त्याने त्या खुषीमध्येच आपल्या डोक्यावरची कॅप प्रेक्षकांमध्ये भिरकावली. देव आनंदला माहीत नव्हते ही कॅप कुणी प्रेक्षक पुढची तब्बल पन्नास-साठ वर्षे जपून ठेवेल! पण तसं झालं होतं.
२००५ साली देव आनंद आपल्या रेग्युलर डेंटल चेकअपसाठी मुंबईच्या त्यांच्या डेंटिस्टकडे गेले होते. लिफ्ट मधून बाहेर पडल्यानंतर घाईघाईने ते डेंटिस्टकडे जाताना त्याचे डोके एका काचेच्या तावदानावर आदळले आणि ती काच फुटली. सर्वजण तिकडे धावले. सर्वांनी विचारले,”देव साब आपल्याला लागले तर नाही ना ?” देव आनंद (Dev Ananad) हसत हसत म्हणाले, ”मला अजिबात नाही. माझ्या कॅपमुळे माझे डोके वाचले. त्यामुळेच मी नेहमी कॅप घालत असतो.”
त्याचवेळी एक मुलगी ऑटोग्राफ बुक घेऊन देवकडे आली आणि म्हणाली “या कॅपमुळेच तुम्ही रसिकांमध्ये लोकप्रिय आहात. तुम्हाला आठवतं का? १९५१ साली ‘ बाजी’ या सिनेमाच्या प्रीमियर नंतर तुम्ही तुमच्या डोक्यावरची कॅप प्रेक्षकांमध्ये भिरकावली होती. ती कॅप माझ्या आजीने झेलली आणि ही कॅप तिने प्राणापलीकडे जपून ठेवली आहे. गेली ५५ वर्षे ही कॅप आमच्या दिवानखान्यामध्ये मानाचे स्थान मिळवून आहे!” असं म्हणून तिने आपल्या मोबाईलमध्ये त्या कॅपचा फोटो दाखवला.
देव आनंदला (Dev Ananad) खूप आनंद वाटला. आपल्यावर रसिकांचे केवढे मोठे प्रेम आहे हे त्याच्या पुन्हा लक्षात आले. त्या मुलीने देव आनंदचा ऑटोग्राफ घेतला आणि म्हणाली,” मी आता घरी गेल्यानंतर माझ्या आजीला हा ऑटोग्राफ दाखवेल आणि म्हणेल तुझ्याकडे कॅप आहे माझ्याकडे देव आनंदचा ऑटोग्राफ आहे आणि हा ऑटोग्राफ देखील मी असाच जपून ठेवणार आहे माझ्या नातीला दाखवण्यासाठी!!!”
आठवायला गेलं तर देव आनंद (Dev Ananad) यांच्या कितीतरी कॅप आपल्या नजरेसमोर येतात. अनेक लोकप्रिय गाण्यांमध्ये त्यांनी वेगवेगळ्या कॅप घातलेल्या दिसतात. यातील चटकन आठवणारी गाणी म्हणजे छेडा मेरे दिल ने तराना तेरे प्यार का (असली नकली) देखो रुठाना करो (तेरे घर के सामने) मेरे लबो पे देखो आज भी तराने है (बाजी( हम है राही प्यार के हमसे कुछ ना बोलेये (नौ दो ग्यारह) ये दिल ना होता बेचारा (ज्वेल थीफ) फुलो की रंग से दिल की कलम से (प्रेम पुजारी) कांची रे कांची रे (हरे रामा हरे कृष्णा) पन्ना की तमन्ना है के (हिरा पन्ना) देव आनंद यांनी घातलेली टॅक्सी ड्रायव्हर या चित्रपटातील कॅप मुंबईतील कॅब चालकांची पहिली पसंती होती.
=====================
हे देखील वाचा : आनंद बंधूंचा भाचा जागतिक पातळीवर दिग्दर्शक कसा बनला?
=====================
त्याने ‘नौ दो ग्यारह‘ मध्ये घातलेली पनामा कॅप तसेच ज्वेल थीफ मधील कॅप आजाही प्रचंड लोकप्रिय आहेत. अमेझॉन, फ्लीपकार्टवर याच नावाने आजही विकल्या जातात. तुम्हाला देवानंद यांची कॅप वाली कोणती गाणी आठवतात?