
..जेव्हा किशोरकुमार ने निर्माता जी पी सिप्पी यांना विनाकारण पळ पळ पळवले!
हिंदी सिनेमातील हरफन कलाकार मौला किशोर कुमार(Kishore Kumar) यांच्या बद्दलचे किस्से प्रचंड संख्येने आहेत. त्याच्या हजरजवाबीपणाचे, विक्षिप्तपणाचे आणि चांगुलपणाचे देखील अनेक किस्से हिंदी सिनेमांमध्ये मशहूर आहेत. त्यातील हा एक किस्सा खूप मजेशीर आहे. त्याने जी.पी. सिप्पी या निर्मात्याला एकदा दिवसभर त्याच्या मागे पळायला लावले होते! काय होता हा किस्सा?जाणून घेवू. सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला एकदा जी.पी.सिप्पी यांच्या एका चित्रपटात किशोर कुमार(Kishore Kumar) गाणे जाणार होता. गाण्याची रिहर्सल झाली. फायनल टेक घ्यायची वेळ झाली. त्यावेळी किशोर कुमार म्हणाला ,”हे गाणे संपूर्णपणे आपण उद्या रेकॉर्ड करूयात!” संगीतकार, निर्माते यांनी त्याला होकार दिला आणि किशोर कुमार रेकॉर्डिंग स्टुडिओ मधून बाहेर पडला. परंतु निर्माते जी.पी. सिप्पी यांना किशोर कुमारच्या दिवसभराच्या बॉडी लैंग्वेज वरून त्याचा मूड बरोबर नसल्याचे लक्षात आले होते. त्यामुळे उद्याच्या रेकॉर्डिंगला तो येईल की नाही याची त्यांना भीती वाटत होती. ज्या पद्धतीने आज त्याने पॅकअप करून लवकर ‘कल्टी’ मारली त्यानुसार तो उद्या रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये वेळेत हजर राहील की नाही याची त्यांना चिंता वाटत होती.

यासाठी त्यांनी एक आयडिया केली. ते स्वतः किशोर कुमार(Kishore Kumar)ला स्टुडिओत घेऊन येण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर किशोर कुमारच्या घरी पोहोचले. ज्यावेळी बंगल्याच्या आवारात जी.पी. सिप्पी यांची गाडी आलेली दिसली त्यावेळी किशोर कुमार चटकन बंगल्याच्या मागच्या बाजूला गेला. तिथूनच त्याने त्याच्या ड्रायव्हरला खाणाखुणा करून गाडी काढायला सांगितली. इकडे हॉलमध्ये जी.पी.सिप्पी किशोर कुमारची वाट पाहत होते. तोच त्यांच्या डोळ्यासमोर किशोर कुमारची गाडी बंगल्याच्या आवारातून बाहेर पडताना दिसली. त्यांच्या लक्षात आले किशोर कुमार(Kishore Kumar) आपल्याला टाळून निघून जात आहे. लगेच त्यांनी आपल्या ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितले. ते देखील त्याच्या मागे निघाले. त्यांच्या मनात असा विचारला कदाचित किशोर कुमार स्टुडिओच्या दिशेने जात असावा म्हणून ते त्याच्या मागे जाऊ लागले.
परंतु किशोरची गाडी शहराच्या बाहेर जाताना दिसली. जी.पी.सिप्पी यांची गाडी देखील आता त्याचा पीछा करू लागली. पुढे किशोर कुमारची (Kishore Kumar)गाडी मागे जी.पी.सिप्पी ची गाडी! असा त्यांचा पाठलाग चालू राहिला. खूप वेळानंतर किशोर कुमारची गाडी मढ आयलँडला एका डेड एंडला पोहोचली. त्याच्यापुढे रस्ता नव्हता. समोर अथांग समुद्र होता. किशोर कुमार(Kishore Kumar) गाडीतून उतरला आणि समुद्राच्या लाटांकडे पाहू लागला. पाठोपाठ सिप्पी यांची गाडी आली. सिप्पी गाडीतून उतरले आणि किशोर कुमारकडे जाऊन म्हणाले,” हा काय वेडेपणा आहे? मी किती वेळ तुझ्या गाडीच्या मागे येत आहे तू असा पळून का जात आहेस?” त्यावर किशोर कुमार ने चेहऱ्यावर भोळेपणाचा आव आणत म्हटले,” आप कौन है साहब? मैने आपको पहले कभी देखा नही. आप क्यू मेरे पीछे आये हो?” आता चकित व्हायची पाळी सिप्पी साहेबांची होती. ते किशोरला म्हणाले ,” अरे किशोर ये तू क्या कर रहा है? मै जी.पी.सिप्पी हू प्रोड्युसर जी.पी.सिप्पी!” त्यावर किशोर म्हणाला,” कौन सिप्पी? मै किसी सिप्पी विप्पी को नही जानता. अभी आप चुपचाप यहा से चले जाइयेगा वरना एक शरीफ आदमी को तंग करने के जुर्म मे आपको हवालात मे बंद करवा सकता हूं!” किशोर कुमारचे(Kishore Kumar) ‘तेवर’ पाहून सिप्पी साहेब चपापले आणि किशोर कुमारचा काही भरवसा नाही तो पोलिसांना बोलून आपल्याला आत टाकू शकतो याची त्यांना जाणीव झाली! ते काहीही न बोलता आपल्या गाडीत जाऊन बसले आणि निघून गेले! त्या दिवशी किशोर कुमार काही रेकॉर्डिंगला आलाच नाही.
======
हे देखील वाचा : … या घटनेनंतर शर्मिला टागोर कमालीची ‘डिसिप्लिन मॅच्युअर्ड’ बनली!
=====
दुसऱ्या दिवशी सकाळी सिप्पी साहेब रेकॉर्डिंग स्टुडिओला पोहोचले तर किशोर कुमार तिथे त्यांच्या आधीच हजर झाला होता आणि तो पुढे होऊन सिप्पी साहेबांचे ‘आईये आईये’ म्हणत स्वागत करू लागला. त्यावर सिप्पी साहेब चिडले आणि त्याला म्हणाले,” कल क्या हो गया था किशोर कुमार आपको? आपने खामखा मुझे कितना परेशान कर दिया!” त्यावर किशोर कुमारने पुन्हा चेहऱ्यावर तोच भोळेपणाचा आव आणत म्हटले,” किसने परेशान किया? मैने?” त्यावर सिप्पी साहेब म्हणाले , “ हां तुम कल मढ आयलँड में मुझे पहचाने से भी इन्कार कर रहे थे!” त्यावर किशोर कुमार म्हणाला,” मै तो परसो रात को ही खंडवा चला गया था और आज सुबह ही वहा से वापस आ रहा हू सीधा स्टुडिओ. आपको कल मढ आयलँड में कैसे मिल सकता हूं? मै तो कल खंडवा में था. शायद आपने कोई सपना देखा होगा!” सिप्पी साहेब डोक्याला हात लावून बसले. किशोर कुमारने गाण्याचे रेकॉर्डिंग सुरू केले. पण सिप्पी साहेबांच्या डोक्याची मंडई झाली होती! डोक्यात गोंधळ माजला होता. नक्की आपण काल मढ आयलँड गेलो होतो की नाही हेच त्यांना आठवत नव्हते! किशोर कुमार म्हणतो त्या पद्धतीने खरोखरच आपल्याला स्वप्न पडले होते का असा देखील त्यांच्या मनात विचार येवू लागला!
तर असा होता हा अवलिया किशोर कुमार!
धनंजय कुलकर्णी