जेव्हा राजेश खन्ना यांच्यावर झाला लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप!
सुपरस्टारपदाची झुल खांद्यावरून उतरल्यानंतर देखील राजेश खन्नांचा रुपेरी पडद्यावरील वावर कमी झाला नव्हता. ते स्वत:ला अजूनही सुपरस्टारच समजत असे. त्यांचे रुसवे फुगवे, त्यांचा ऑरा, त्यांचे किस्से अजूनही चवीने सांगितले जातात. आपल्या वयाचा विचार न करता रुपेरी पडद्यावर येणाऱ्या प्रत्येक नवीन तरुण अभिनेत्रींसोबत ते आणि देव आनंद चित्रपटात काम करताना दिसायचे.
ऐंशीच्या दशकात तर अभिनेत्री टीना मुनिमसोबत त्यांची जोडी चांगली जमली होती. आपला चित्रपट तिकिटबारीवर चालो वा न चालो याची त्यांना तमा नव्हती. चित्रपटात काम करण्याची त्यांची जिद्द शेवटपर्यंत कायम होती. याच काळात एका चित्रपटातील वेळी मात्र राजेश खन्नांना एका मोठ्या गंभीर आरोपाला सामोरं जावं लागलं. हा आरोप होता लैंगिक शोषणाचा!
त्या काळातील मीडियामध्ये हे प्रकरण खूप गाजले होते. अर्थात त्यानंतर हा सर्व ‘स्क्रिप्टेड ड्रामा’ होता की काय, असे देखील मीडियामध्ये छापून आले होते. पण राजेश खन्नांसाठी तो काळ मोठा कठीण होता. एक तर त्यांचा स्टारडम संपला होता. डिंपल यांच्यासोबतचे त्यांचे संबंध तुटले होते. कौटुंबिक आणि व्यावसायिक दोन्ही पातळ्यांवर त्यांना संघर्ष करावा लागत होता. त्यात हे प्रकरण उपटले. काय होता हा किस्सा?
१९८६ साली दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक आय व्ही ससी यांनी त्यांच्या ‘अनोखा रिश्ता’ या चित्रपटासाठी राजेश खन्नांना साइन केले. हा चित्रपट म्हणजे १९८४ साली त्यांनी मल्याळी भाषेत बनवलेल्या ‘कानामारायथु’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक होता. मूळ मल्याळी चित्रपटाचा नायक मामुटी होता. या चित्रपटात राजेश खन्नांची नायिका म्हणून सोळा वर्षाची सबिया नावाची कोवळी अभिनेत्री होती.
ही सबिया म्हणजे साठच्या दशकातील गाजलेली अभिनेत्री अमिताची मुलगी. अमिताने साठच्या दशकात ‘तुमसा नही देखा’, ‘मेरे मेहबूब’, ‘गुंज उठी शहनाई’ या गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या होत्या. तिची मुलगी देखणी होती. तिला ब्रेक सुपरस्टार सोबत मिळतो आहे, याचा अमिताला खूप आनंद झाला होता.
या चित्रपटांमध्ये स्मिता पाटील यांचीदेखील भूमिका होती. चित्रीकरणाच्या वेळी राजेश-सबियाच्या हॉट फोटोनी गॉसिप्सला उधाण आले होते. सिनेमाचे शूटिंग संपल्यावर एके दिवशी अमिताने प्रेस कॉन्फरन्स घेवून मोठा धमाका केला.
या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असताना राजेश खन्नांनी माझ्या मुलीचे लैंगिक शोषण केले असा आरोप तिने केला. तशी रीतसर तक्रार देखील तिने पोलिसांमध्ये केली. मीडियाने हा मुद्दा खूप उचलून धरला. त्या काळात ‘मिटू (Meetoo)’ चळवळ नव्हती, पण तरीही गॉसिप्स मॅगझिनला नवीन खाद्य मिळाले. मायलेकींनी रडत रडत सर्व मीडियासमोर आपले गाऱ्हाणे मांडले. काही दिवस अफवांचा बाजार गरम राहिला. नंतर सर्व शांत शांत झाले.
हा चित्रपट तसा अनलकी म्हणावा लागेल कारण या चित्रपटाचे चित्रीकरण चालू असताना स्मिता पाटील यांचे निधन झाले. त्यानंतर हा चित्रपट रडतखडत कधीतरी प्रदर्शित झाला आणि सुपरफ्लॉप ठरला. महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित झाला होता का, हे आठवत नाही. (यु ट्यूब वर उपलब्ध आहे)
====
हे देखील वाचा – कॉमिक्स बुक मधील अमिताभ बच्चन आठवतो का?
====
अमिताने केलेले आरोप पब्लिसिटी स्टंट होते का? अशी देखील चर्चा त्यानंतर सुरू झाली. एवढं सगळं करून देखील चित्रपट आणि अभिनेत्री सबिया दोघेही अपयशी ठरले. सबिया दिसायला चांगली असून देखील अभिनयात फारसा दम नसल्यामुळे पुढे दोन – तीन चित्रपटात झळकली आणि गायब झाली.
आज आपण जेव्हा जुने मॅगझिन्स/ संदर्भ ग्रंथ चाळतो त्यावेळी त्या काळात झालेल्या या चहाच्या पेल्यातील वादळाची आठवण होते.