Prasad Oak : प्रसाद-मंजिरीच्या लग्नात सासूबाई ‘या’ कारणामुळे रडल्या!

जेव्हा पाच अभिनेत्रींनी यश चोप्रांच्या चित्रपटात काम करायला नकार दिला..
यशराज फिल्मच्या ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा चित्रपटाची भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वाधिक काळ थिएटरमध्ये चाललेला चित्रपट म्हणून त्याची नोंद झाली आहे. २५ ऑक्टोबर १९९५ ला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची जादू अजूनही प्रेक्षकांच्या मनावर कायम आहे. मुंबईच्या मराठा मंदिर या थिएटरमध्ये या चित्रपटाने तब्बल २५ वर्ष मुक्काम केला होता.
या चित्रपटाच्या निर्मितीच्या काळातच यशराज फिल्मच्या ‘दिल तो पागल है’ या चित्रपटाची सुरुवात झाली होती. हा सिनेमा ३१ ऑक्टोबर १९९७ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते यश चोप्रा (Yash Chopra). चित्रपटाला संगीत उत्तम सिंग यांचं होतं. याची प्रमुख स्टारकास्ट होती शाहरुख खान, माधुरी दीक्षित आणि करिष्मा कपूर. सुमधुर गीतांनी सजलेला हा चित्रपटही सुपरहिट ठरला होता. या तिघांनाही त्या वर्षीचं ‘फिल्मफेअर अवॉर्ड’ मिळालं होतं.
या चित्रपटातील ‘स्टारकास्ट’ हा नंतर चर्चेचा विषय झाला होता. चित्रपटातील अक्षय कुमारची भूमिका सर्वांसाठीच ‘सरप्राईज पॅकेज’ होती. कारण हा चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत कुठेही पोस्टरवर, मुलाखतीत, मीडियामध्ये या चित्रपटात अक्षय कुमार भूमिका करत आहे, असं सांगितलं गेलं नाही. ही गुप्तता ठेवण्यामागचं कारण म्हणजे त्यावेळी अक्षय कुमारचे चित्रपट लागोपाठ अपयशी ठरत होते. एक फ्लॉप स्टार म्हणून त्याच्यावर शिक्का बसत होता. वितरक कुठल्याही प्रकारची रिस्क घ्यायला तयार नव्हते. त्यामुळे त्यांनी यश चोप्रांना (Yash Chopra) स्पष्ट सांगितले की, अक्षय कुमार जरी या चित्रपटाला असला तरी त्याला अजिबात प्रसिद्धी मिळता कामा नये.

यश चोप्रांना खरं तर या भूमिकेसाठी जॅकी श्रॉफला घ्यायचे होते, पण जॅकीचे वय जास्त असल्यामुळे तो या भूमिकेसाठी थोराड वाटला असता. त्यामुळे अक्षय कुमारची या चित्रपटासाठी निवड झाली. या सिनेमात शाहिद कपूरने एका डान्समध्ये नायकाच्या मागे राहून काही स्टेप्स केल्या होत्या. तसेच अमिषा पटेल हिनेदेखील एक छोटी भूमिका या चित्रपटात केली होती.
या चित्रपटात करिष्मा कपूरने निशा ही व्यक्तिरेखा साकारली होती. पण तुम्हाला माहित आहे का की, या भूमिकेसाठी करिष्माच्या नावाचा विचारही झाला नव्हता. निशाच्या भूमिकेसाठी अभिनेत्री शोधताना यश चोप्रांना खूप मेहनत घ्यावी लागली. यश चोप्रांच्या मनात या भूमिकेसाठी पहिली पसंती होती ती मनीषा कोईराला. त्यामुळे त्यांनी यासंदर्भात मनीषाला विचारलं असता, तिने नकार दिला. कारण माधुरी दीक्षित सिनेमात असताना तिची भूमिका दुय्यम अभिनेत्रीची असणार याची तिला जाणीव झाली होती. अर्थात नंतर तिने एका चॅनेलशी बोलताना भूमिका नाकारल्याबद्दल पश्चाताप देखील व्यक्त केला होता. ती म्हणाली होती, “एक चांगली भूमिका मी माझ्या चुकीच्या विचारामुळे सोडून दिली.”
मनीषा कोइराला नंतर या भूमिकेसाठी काजोलला विचारण्यात आले. चोप्रांच्या (Yash Chopra) डीडीएलजेची नायिका काजोलच होती तिने एक दिवसाचे शूट देखील केले, पण नंतर तिने देखील भूमिकेचा मर्यादित आवाका लक्षात आल्यानंतर चित्रपट सोडला. त्यानंतर उर्मिला मातोंडकरला विचारण्यात आले, परंतु ती देखील अन्य प्रोजेक्टमध्ये बिझी असल्याने तिने देखील नकार दिला.
आता चोप्रा साहेब वैतागले. एरवी त्यांच्या सिनेमात काम मिळावे म्हणून जीव टाकणाऱ्या नायिका आता चक्क नकार देता होत्या. काय करावे? शेवटी यश चोप्रांनी करिष्मा कपूरला निशाच्या भूमिकेसाठी विचारणा केली. करिश्माने तोवर शाहरुख खान आणि यश चोप्रासोबत एकाही चित्रपटात काम केले नव्हते. या दोन्ही गोष्टी तिला करायच्या होत्याच आणि त्या आपणहून चालून आल्या होत्या. तरी तिने चोप्रांकडे विचारासाठी चौवीस तास मागितले आणि त्यानंतर तिने चित्रपटात काम करायला होकार दिला.

अशा पद्धतीने निशाच्या भूमिकेसाठी करिष्मा कपूरची ‘दिल तो पागल है’मध्ये एंट्री झाली. या चित्रपटाची मुख्य नायिका माधुरी दीक्षित जरी असली तरी करिष्मा कुठेही कमी पडली नाही. प्रेक्षकांनी तिच्या भूमिकेला जबरदस्त दाद दिली. तिला या भूमिकेसाठी फिल्मफेअरचा पुरस्कार तर मिळालाच शिवाय सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार देखील तिने पटकावला.
=============
हे ही वाचा: अमिताभ बच्चन आणि अर्चना पूरणसिंगच्या ‘त्या’ फोटोने देशभर उडाला होता गोंधळ!
प्रदीप पटवर्धन: एकेकाळी रिझर्व्ह बँकेत केली होती नोकरी पण …
करिश्माला हा पुरस्कार जेव्हा जाहीर झाला त्यावेळी करिश्मा अमेरिकेत होती. रणधीर कपूरने तिला ही ‘गुड न्यूज’ दिली. याशिवाय करिश्माला झी आणि स्क्रीनचे पुरस्कार मिळाला. थोडक्यात जी भूमिका पाच अभिनेत्रींनीं नाकारली त्या भूमिकेचे करिश्माने सोने केले.