Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Amitabh Bachchan यांच्या कोणत्या सिनेमाचे पोस्टर्स फाडून प्रेक्षक ‘तो’ सिनेमा बंद का पाडत होते?
आपल्या देशातील लोक खूप भावनाप्रधान आहेत. एखाद्या व्यक्ती वर इतकं प्रचंड प्रेम करतील की त्याच्यासाठी काहीही करायला तयार होतील पण एकदा का त्या व्यक्तीचा द्वेष आला की कुठच्याही टोकाला जायला तयार होतात. हा अनुभव राजकारण, समाजकारण, चित्रपट, क्रीडा अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये येतो. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना देखील हा अनुभव आला होता. ज्याच्यावर जीवापाड प्रेम करणारे प्रेक्षक आपल्या देशाने बघितले तेच प्रेक्षक त्याच्या सिनेमाचे पोस्टर फाडायला सज्ज झाले होते. सिनेमा बंद पाडायला पुढे येत होते. नेमकं काय घडलं होतं? कोणता सिनेमाच्या बाबत असं झालं होतं?

खरंतर २६ जुलै १९८२ रोजी अमिताभ बच्चन ‘कुली’ या चित्रपटाच्या सेटवर एक्सीडेंट मुळे मृत्यूच्या दारात पोहोचले होते. त्यावेळी संपूर्ण देश त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी म्हणून देवाकडे प्रार्थना करत होता. त्या काळात सारा देश जणू एक कुटुंब झाला होता आणि त्यात कुटुंबातील एक व्यक्ती म्हणजे अमिताभ बच्चन मृत्यूची झुंज देत होते. अमिताभ ही आयुष्याची लढत जिंकला आणि पुन्हा एकदा सिनेमात आला. पण त्यानंतर चार-पाच वर्षातच चित्र पूर्ण पालटले. १९८८ साली अमिताभ बच्चन यांचा ‘शहेनशहा’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी तयार होता. पण त्यावेळी त्याच्याविरुद्ध देशभर संतापची लाट होती. कारण बोफोर्स प्रकरणांमध्ये त्याचे नाव आले होते आणि सर्व देशभर त्याच्यावर विरोधात प्रदर्शने चालू झाली.

अमिताभला गद्दार, चोर, दरोडेखोर, हरामखोर… असं म्हटलं जाऊ लागलं होतं. आणि याच काळात 12 फेब्रुवारी 1988 या दिवशी टिनू आनंद दिग्दर्शित ‘शहेनशहा’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. दिल्लीच्या ‘शीला’ या थिएटर मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. थिएटरच्या बाहेर जवळपास आठ ते दहा हजार लोकांची गर्दी जमा झाली. थेटरच्या मालक धास्तावले होते. कारण ही सर्व गर्दी अमिताभचा चित्रपट बंद पाडण्यासाठी आलेली होती. पोलिसांना बोलावले गेले. पण त्या गर्दीमध्ये अमिताभचे अनेक चाहते देखील होते. त्यात कष्टकरी समाज होता, रिक्षावाले होते, कॉलेजचे विद्यार्थी होते. त्यांना अमिताभचा चित्रपट पाहायचा होता.

कारण १९८४ नंतर अमिताभचे फक्त तीन चित्रपट प्रदर्शित झाले होते. ‘गिरफ्तार’, ‘मर्द’ आणि ‘आखरी रास्ता’. त्यामुळे अमिताभच्या खऱ्या चाहत्यांना राजकारण, बोफोर्स याच्याशी काही देणे घेणे नव्हते. त्यांना अँग्री यंग मॅन अमिताभ पडद्यावर पाहायचा होता. इंडिया टुडे या मासिकाने या शो बाबत नंतर लिहिले होते. अमिताभ च्या चाहत्यांनी पोलिसांना ॲडव्हान्स बुकिंग केलेलं तिकीट दाखवले. पोलिसांच्या संरक्षणामध्ये सिनेमाचा पहिला शो पार पडला आणि हाउसफुलचा बोर्ड लागला गेला! कारण सिनेमाच्या ॲडव्हान्स तिकीट खिडकीवर गर्दी वाढू लागली. पुढचे तीन आठवडे हा चित्रपट दिल्लीच्या शीला थेटर मध्येच नाही तर देशभरातील किमान 300 थिएटर्स मध्ये हाउसफुल लागला होता. सिनेमा सुपर हिट कॅटेगिरी मध्ये गेला.
================================
हे देखील वाचा : ‘कभी कभी’ चे टायटल सॉंग अमिताभ बच्चन गाणार होते?
=================================
पण यापूर्वी या सिनेमाच्या मेकिंगला आणि प्रदर्शनाच्या वेळी प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. निर्माता दिग्दर्शक टिनू आनंद यांनी अमिताभला घेऊन 1981 साली ‘कालिया’ हा चित्रपट बनवला होता. त्यानंतर लगेचच ‘शहेनशहा’ या चित्रपटाचे प्लॅनिंग झाले. पण नंतर अमिताभ बच्चन यांचा ‘कुली’च्या सेट वरचा एक्सीडेंट, 1984 साली इंदिरा गांधीच्या हत्येनंतर अमिताभने राजकारणात केलेला प्रवेश, त्यानंतर डिसेंबर 1984 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणूकीत अलाहाबाद मध्ये हेमवती नंदन बहुगुणा यांचा पराभव करून लोकसभेत खासदार म्हणून एन्ट्री घेतलेला अमिताभ आता सिनेमासाठी फारसा उपलब्ध होत नव्हता.

तरी या काळात त्याचे फ्लोअर असलेले तीन चित्रपटाचे शूटिंग त्याने पूर्ण केले. पण 1985 साली अमिताभ बच्चन यांना ‘मायस्थेनिया ग्रेवीस’ नावाच्या दुर्धर आजाराने घेरले आणि अमिताभने हा चित्रपट चक्क सोडून दिला! टिनू आनंद यांनी नंतर या चित्रपटासाठी जितेंद्र यांचा विचार सुरू केला पण चित्रपटाची स्क्रिप्ट आणि एकंदरीत भूमिकेचा आवाका पाहता जितेंद्रने ही भूमिका अमिताभ बच्चन यांच्यासाठी योग्य आहे असे टिनू आनंदला सांगून तो बाहेर पडला. जितेंद्रने अमिताभला फोन करून सांगितले,” ही भूमिका तुमच्यासाठीच लिहिली आहे. आणि प्रकृतीत आराम पडला की ही भूमिका तुम्हीच करा.” त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी पुन्हा या चित्रपटाची शूट सुरू केले.

या सिनेमांमध्ये अमिताभ बच्चन यांनी जे आयकॉनिक काळे जॅकेट घातले आहे ते या सिनेमासाठी खास डिझाईन करून बनवले होते. या लेदर आणि स्टीलच्या जॅकेटचे वजन 16 किलो होते. ते बनवायला तीन महिने लागले होते आणि तब्बल 40 हजार रुपये खर्च आला होता.( हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर एका लिलावामध्ये हे जॅकेट लाखो रुपयाला विकले गेले!) या सिनेमांमध्ये अमिताभची नायिका मीनाक्षी शेषाद्री होती. खरं तर या भूमिकेसाठी टिनू आनंद यांना श्रीदेवी किंवा डिंपल कापडिया हवी होती. डिंपल ला साइन देखील केले होते. पण तिने तिच्या इतर बिझी शेड्युलमुळे हा सिनेमा सोडला. या सिनेमात अमिताभ बच्चन, मीनाक्षी शेषाद्री, प्राण, अमरीश पुरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा डबल रोल होता. एक पोलीस इन्स्पेक्टर आणि एक शहेनशहा. अमिताभचा शहेनशहा एकदम तडफदार झाला होता. त्याच्या जुन्या भूमिकांची आठवण करून देणारा. हा सिनेमा ऑक्टोबर 1987 साली तयार झाला. पण त्याच वेळी अमिताभ बच्चन यांच्यावर बोफोर्स प्रकरणातील आरोप सुरू झाले आणि देशभर अमिताभ बच्चन यांच्या विरोधी वातावरण तयार झालं. ठिकठिकाणी अमिताभचे पुतळे जाळले जाऊ लागले. निदर्शने होऊ लागली. अमिताभ बच्चन यांचे जुने चित्रपट चालू असतील तर ते देखील बंद पाडू लागले. अलाहाबाद अमिताभ बच्चन यांचे जन्मस्थळ. जिथे प्रत्येक भिंतीवर निवडणुकीच्या काळात ‘छोरा गंगा किनारी वाला…’ म्हणून लिहिलं जायचं तिथे आता अमिताभचे कार्टून काढून तिथे चोर, दरोडेखोर, रिश्वत खोर लिहीलं जात होते. अशा या पार्श्वभूमीवर चित्रपट कसा प्रदर्शित करावा? याची भीती निर्माता दिग्दर्शक टिनू आनंद यांना वाटत होती.

चित्रपट तसा डिस्ट्रीब्यूटर यांनी चांगल्या किमतीमध्ये विकत घेतला होता. देशातील पाच पॉकेट्स मध्ये प्रत्येक टेरिटरी 90 लाख रुपये पर टेरिटरी अशा भावात विकला गेला होता. चित्रपटाचे बजेट होतं सव्वा दोन करोड. याचा अर्थ चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच त्याची किंमत वसूल झाली होती . पण चित्रपट प्रदर्शन होणे बाकी होते. टिनू नो आनंद आणि अमिताभ बच्चन यांनी मुंबई शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांना सर्व प्रकरण सांगितले. बाळासाहेबांनी देखील ,”मुंबईत तुमचा सिनेमा व्यवस्थित प्रदर्शित होईल आमचे शिवसैनिक यासाठी मदत करतील!” असे आश्वासन दिले. अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटाचा उपवास तब्बल तीन वर्षाचा होता. अमिताभचे १९७४ सालापासून वर्षाला किमान तीन-चार चित्रपट मागच्या तीन वर्षापासून केवळ तीन सिनेमा एवढ्यावर येऊन थांबले होते. अमिताभ शिवाय बॉलीवूड सुनसुने वाटत होते. त्यामुळे प्रेक्षकांना देखील अमिताभच्या सिनेमाची ओढ होती, आतुरता होती, उत्सुकता होती!
================================
=================================
या सिनेमाचे स्क्रिप्ट आणि डायलॉग टिनू आनंद यांचे वडील इंदर राज आनंद यांनी लिहिले होते. यातील अखेरचा कोर्टातील क्लायमॅक्स चित्त थरारक सीन त्यांनी हॉस्पिटलमध्ये बेडवर असताना लिहिला होता आणि हा शॉट लिहिल्यानंतर त्यांचा काही दिवसात मृत्यू झाला होता. हा सीन जबरा बनला होता. अमिताभ बच्चन अमरीश पुरीला कोर्टात फरफटत घेऊन येतो आणि तिथे जज च्या समोर मारतो. या सीन वर अनेक ठिकाणी आक्षेप घेतला गेला. कोर्टात केस दाखल केल्या गेल्या. परंतु यामुळे सिनेमाचीच पब्लिसिटी आणखी वाढत गेली. पब्लिकच्या इच्छाशक्तीचा शेवटी विजय झाला. राजकारण बाजूला पडलं आणि अमिताभ बच्चन यांचा शहेनशहा सुपर डुपर हिट झाला. सव्वा दोन कोटी रुपये खर्च केलेले या सिनेमाने तब्बल सात करोड रुपये बॉक्स ऑफिसवर कमावले. ‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं नाम है शहनशाह…’ हा अमिताभचा आयकॉनिक डॉयलॉग शहनशाह हि आणखी उपाधि देवून गेला. अमिताभ बच्चन यांचा हा अखेरच्या काही सोलो हिट पैकी सिनेमा ठरला कारण यानंतर अमिताभ बच्चन यांचा ‘आज का अर्जुन’ सोडला तर फारसे चित्रपट गाजले नाही. 90 च्या दशकामध्ये तर अमिताभ बच्चन फ्लॉप होत गेले आणि मोठ्या आर्थिक संकटामध्ये सापडले!