अनिल कपूरच्या अनप्रोफेशनल अप्रोचवर प्रचंड नाराज…
निर्माता दिग्दर्शक सावन कुमार टाक अनिल कपूर (Anil Kapoor’s) वर एकदा प्रचंड नाराज झाले होते. इतके की त्यांनी प्रिंट मीडियाला त्याच्या विरुद्ध मोठा इंटरव्ह्यू देऊन खरडपट्टी देखील काढली होती. काय होता हा किस्सा? का एवढे नाराज झाले होते सावन कुमार अनिल कपूर वर? या घटनेची सुरुवात ऐंशीच्या दशकात झाली होती. अनिल कपूर (Anil Kapoor’s)त्यावेळी नुकताच चित्रपटाच्या दुनियेत आला होता. हिंदी सिनेमात ‘एक बार कहो’,’हमारे तुम्हारे’,’हम पांच’ या सिनेमातून एक-दोन फुटकळ भूमिका केल्या होत्या. एका मोठ्या ब्रेकच्या प्रतीक्षेत तो होता. त्याच काळात त्याला अचानकपणे एक तेलगू चित्रपट ऑफर झाला. हा चित्रपट बापू यांनी दिग्दर्शित केला होता. ‘वंश वृक्षम’ या चित्रपटात त्याची लीड भूमिका होती. यानंतर त्याला एक कन्नड चित्रपट देखील ऑफर झाला ‘ पल्लवी अनु पल्लवी’. हा चित्रपट मणीरत्नम यांनी दिग्दर्शित केला होता. साउथ कडचे दोन चित्रपट केल्यानंतर त्याला मेन स्ट्रीमच्या हिंदी सिनेमामध्ये मोठ्या भूमिकेची अपेक्षा होती. एम एस सत्थू यांच्या ‘कहा से कहा गुजर गया’ या चित्रपटात त्याला भूमिका मिळाली होती, पण हा चित्रपट खूपच संथ गतीने निर्माण होत होता.
एकदा १९८१ साली स्टार डस्ट या मॅगझिनच्या एका पार्टीमध्ये सावन कुमार टाक आपल्या नवीन चित्रपटासाठी एका नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. त्यावेळी त्यांची नजर पडली अनिल कपूरवर(Anil Kapoor’s). अनिल कपूरच्या वडिलांना ते ओळखत होते. अनिल कपूरचा ‘प्रॉमिसिंग फेस’ त्यांना आवडला आणि त्यांनी तिथेच त्याला दुसऱ्या दिवशी आपल्या ऑफिसला येण्याचे निमंत्रण दिले. दुसऱ्या दिवशी अनिल कपूर ज्या वेळेला सावन कुमार यांच्याकडे गेला त्यावेळी त्यांनी त्याला त्यांच्या आगामी ‘लैला’ या चित्रपटासाठी प्रमुख भूमिकेत कास्ट केले. “मी तुला हिंदी सिनेमात ब्रेक देतोय. ही तुझी इंट्रोड्युसिंग मूवी असल्याने इतर कुठल्याही सिनेमा आपला हा सिनेमा प्रदर्शित झाल्याशिवाय साइन करू नकोस ” असे बजावले. अनिल कपूर त्यावेळेला हो म्हटला. सावन कुमार यांचा ‘सौतन’ हा चित्रपट देखील तेंव्हा फ्लोअरवर होता. त्यामुळे साहजिकच ‘सौतन’ हा चित्रपट पूर्ण करण्याकडे त्यांचा कल होता. ‘लैला’ आणि ‘सौतन’ दोन्ही चित्रपटाचे शूटिंग चालू होते. ‘लैला’ या चित्रपटात अनिल कपूरची नायिका पूनम धिल्लन होती. या काळात अनिल कपूरला (Anil Kapoor’s)रमेश सिप्पी यांच्या ‘शक्ती’ या चित्रपटात एक छोटी भूमिका मिळाली होती. ‘लैला’ या चित्रपटाचा वेग पाहता अनिल कपूर जाम कंटाळला होता. त्याला झटपट प्रेक्षकांच्या पुढे यायचे होते.
याच दरम्यान त्याची भेट तेलगू चित्रपटात त्याला ब्रेक दिलेल्या बापू यांच्या सोबत झाली. तेंव्हा बापू एक हिंदी चित्रपट दिग्दर्शित करणार होते. चित्रपटाचा नाव होतं ‘वो सात दिन’ अनिल कपूरने सावन कुमार यांना न सांगता हा चित्रपट साइन करून टाकला! त्याचे चित्रीकरण देखील सुरू झाले. साउथ कडील सिनेमातील डिसिप्लिन वातावरणामुळे हा सिनेमा लवकर बनला. या चित्रपटात त्याच्यासोबत पद्मिनी कोल्हापुरे आणि नसरुद्दीन शहा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘वो सात दिन’ तयार होवून चित्रपट प्रदर्शित व्हायला रेडी झाला. ज्यावेळी सावन कुमार यांना या चित्रपटाबद्दल कळाले त्यावेळी ते प्रचंड अपसेट झाले. त्यांनी अनिल कपूरच्या अनप्रोफेशनल अप्रोच वरून प्रचंड झापले आणि ,”माझा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधी तू मला न सांगता हा चित्रपट का साइन केला?” म्हणून त्याची खरडपट्टी काढली.
======
हे देखील वाचा: अली फजलची हॉलिवूडवारी…
======
‘वो सात दिन’ हा चित्रपट २३ जून १९८३ रोजी प्रदर्शित झाला. हिट झाला त्याचबरोबर अनिल कपूरचा (Anil Kapoor’s)आणखी एक चित्रपट ‘रचना’ देखील प्रदर्शित झाला. ‘सौतन’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सावन कुमार यांनी ‘लैला’ चा उर्वरित भाग चित्रित केला. आता त्यांचा या सिनेमा बनवण्याचा मूड आता गेला होता. कसाबसा रखडत हा सिनेमा ७ सप्टेंबर १९८४ रोजी प्रदर्शित झाला. तरी पण गंमत म्हणजे या चित्रपटाच्या ओपनिंग क्रेडीट टायटल्स मध्ये त्यांनी मुद्दाम ‘इंट्रोड्युसिंग अनिल कपूर’ असे टाकले. अनिल कपूर आणि सावंत कुमार यांच्यातील ही खडा जंगी त्या काळातील मीडियामध्ये प्रचंड गाजली होती.दोघांमध्ये कायमचे मतभेद झाले आणि पुन्हा कधीही अनिल कपूरने सावन कुमार यांच्या चित्रपटात काम केले नाही!
धनंजय कुलकर्णी