सावधान! वॉल वैऱ्याची आहे…
एक फार मोठा धडा आपण सगळ्यांनी घ्यावा अशी गोष्ट सध्या मराठी चित्रपटसृष्टीत घडली आहे. याला कारणीभूत ठरला आहे, सोशल मीडिया. सोशल मीडियावर सध्या चर्चा आहे ती डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) आणि दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांची.
केवळ सरधोपट पद्धतीने काही गोष्टींना हिरवा कंदील दाखवल्यामुळे ही सगळी गडबड झाली आहे. पण ही गडबड डॉ. अमोल कोल्हे यांच्या जिव्हारी लागली आहे. अर्थात, सोशल मीडियावरची पोस्टच तशी आहे. त्या पोस्टनंतर डॉ. अमोल कोल्हे यांनी त्याची दखल घेत सोशल मीडियावर भाष्य केलं. पण गोष्ट एवढीच नाहीये. तर हा आपल्या सगळ्यांनाच एक मोठा धडा आहे. कारण, आता सोशल मीडियावरची वॉल वैऱ्याची झाली आहे.
त्याचं झालं असं, की सध्या ‘शेर शिवराज‘ या चित्रपटाची चर्चा आहे. दिग्पाल लांजेकर यांचा हा चित्रपट चर्चेत होता कारण, त्यांच्या यापूर्वी बनवलेल्या ‘पावनखिंड’ या चित्रपटाने चांगला व्यवसाय केला. रसिकांना हा चित्रपट आवडला. शिवाय दिग्पाल लांजेकर आता शिवरायांचं अष्टक मोठ्या पडद्यावर मांडणार असल्यामुळे त्याच्या आगामी सर्वच चित्रपटांबद्दल कुतूहल असणार आहेच. ‘शेर शिवराज’ चित्रपटाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा आहे. दिग्पालचे अनेक फॅन्स सोशल मीडियावर या चित्रपटाचं कौतुक करताना दिसतायत. पण यातल्या एका पोस्टमुळे मात्र गडबड झाली आहे.
दिग्पालच्या एका फॅनने दिग्पालला टॅग करत ‘शेर शिवराज’चं कौतुक करणारी पोस्ट लिहिली. पण ती लिहितानाच पोस्ट संपता संपता त्याने नाव न घेता डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या अभिनयाची अवहेलना केली आहे. ही पोस्ट दिग्दर्शक दिग्पाल यांनी शेअरही केली. पण त्यामुळे नवं वादळ उभं राहिलं. डॉ. अमोल कोल्हे यांचा शेलक्या शब्दांत केलेला हा अपमान खूप व्हायरल झाला. इतका, की यावर डॉ. अमोल यांनी एक व्हिडिओ जारी करत या अवहेलनेबद्दल दिग्दर्शकाला खडे बोल सुनावले. इतकंच नव्हे, तर शिवराय साकारण्याचं आव्हान आपण स्वीकारत असून आपल्या ‘शिवप्रताप’ या मालिकेत बनणाऱ्या तीन चित्रपटांमधून आपण ते दाखवून देऊ असं निक्षून परंतु नम्रतेनं सांगितलं. कोल्हे यांचा हा व्हिडिओही व्हायरल झाला. हा व्हिडिओ दिग्पालकडे पोहोचल्यावर मात्र त्याला यातली गल्लत कळली आणि त्यानंतर दिग्पालने सोशल मीडियावर आपला माफीनामा मांडला.
आता खरंतर दोन्हीकडून प्रकरण संपलं आहे. डॉ. कोल्हे (Amol Kolhe) या प्रकाराने दुखावले गेले आहेत हे उघड आहे. दिग्पालच्या सोशल मीडिया टीमकडून ही चूक झाली आहे हेही सत्य आहे. पण आता त्यावर हळहळत बसण्यापेक्षा माफी मागणं कधीही उत्तम जे दिग्पालने केलं. पण हीच आपल्या सगळ्यांसाठी धोक्याची घंटा आहे.
सध्या मराठीमध्ये इतिहासाचं वारं वाहू लागलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनत असतानाच त्यांच्या निधड्या शूर शिलेदारांवरही चित्रपट बनू लागले आहेत. त्यामुळे सध्या मराठीत अनेक जणांचे गट छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट बनवण्यात गुंतले आहेत. पण लांजेकर-कोल्हे प्रकरणामुळे सगळ्यांनी डोळे नीट उघडण्याची गरज निर्माण झाली आहे.
आपल्याकडे कौतुक करायला कुणाची ना नाहीच. पण ते कौतुक करतानाच दुसऱ्याला कमी लेखण्याची वृत्ती सोशल मीडियावर वाढीस लागली आहे. शिवाय, सोशल मीडियावर टीचभर फॉलोअर्स असलेली मंडळी मुद्दाम मोठ्या लोकांना टॅग करून असं भाष्य करत असतात. यातून त्यांना आपलं महत्व तर वाढवायचं असतंच शिवाय, दोन गटांत जुंपणारा झगडाही लांबून बघायचा असतो. आता या प्रकरणात निष्कारण दिग्पाल आणि डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यात ताण निर्माण झाला. खरंतर ही पोस्ट ज्याने लिहिली आहे, त्याला याची फार झळ बसली असेलच असं नाही. त्याला फार महत्व द्यायची गरजही नाही. म्हणूनच त्याचं नाव आत्ता या लेखात लिहिलेलं नाही.
=====
हे देखील वाचा – मेटाव्हर्स: मनोरंजन क्षेत्रासमोर आभासी तंत्रज्ञानाचं नवं आव्हान
=====
यातून आपण बोध घ्यायची गोष्ट एकच, कुणाचीही कोणतीही गोष्ट आपल्या वॉलवर शेअर करायची असेल तरी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपण वाचणं हाच त्याला पर्याय असणार आहे. दिग्पालच्या म्हणण्यानुसार त्याच्या सोशल मीडिया टीमकडून ते अनावधानानं झालं आहे. तसंच असण्याची शक्यता दाट असू शकेल. कारण, अमोल यांनी शिवराय साकारून तमाम महाराष्ट्राला वेड लावलं आहे. अभिनेते चंद्रकांत यांच्यानंतर महाराष्ट्राला महाराज लाभले ते डॉ. अमोल कोल्हेंच्या (Amol Kolhe) रुपाने. प्रत्येक कलाकार भूमिकेला न्याय देण्यासाठी पुरेपूर कष्ट उपसत असतो. अशामध्ये कुणा येऱ्या गबाळ्याने बसल्या बसल्या कोणाही अभिनेत्याला-दिग्दर्शकाला बोल लावणं दुर्दैवी आहे. म्हणूनच त्यांची तोंडं आपण बंद करू शकत नाही. पण आपण काय करायचं ते ठरवूच शकतो. म्हणून, आता जरा सांभाळूनच राहायला हवं. कारण, वॉल वैऱ्याची आहे.