
Mohammed Rafi : रफी यांनी गाणी गायचे बंद करण्याचा निर्णय कां घेतला होता?
जेष्ठ पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या गाण्यांची संख्या तुलनेने सत्तरच्या दशकामध्ये कमी झाली होती. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे किशोर कुमार त्या काळात प्रचंड लोकप्रिय असा गायक बनला होता. सर्व संगीतकारांचा, अभिनेत्यांचा आणि निर्मात्यांचा ओढा त्याच्याकडे जास्त होता. अर्थात रफी यांची गाणी येतच होती पण त्याची संख्या निश्चित कमी झाली होती. पण तुम्हाला माहिती आहे का याच काळात रफी यांनी गाणं बंद करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय त्यांनी का घेतला आणि या निर्णयापासून त्यांना कुणी परावृत्त केलं? ही खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. (Mohammed Rafi songs)

१९७८ साली त्या काळातील उर्दूतील फेमस ‘शमा’ या मासिकात रफी साहेबांचा एक इंटरव्यू छापून आला होता. त्यात त्यांनी या गोष्टीचा खुलासा केला होता. मोहम्मद रफी यांनी पवित्र हजची यात्रा १९६९ साली केली होती. तिथे गेल्यानंतर त्यांनी तिथल्या पवित्र मशिदीमधून अजान देखील दिली होती. रफी तसे खूप धार्मिक प्रवृत्तीचे व्यक्ती होते. खुदा का नेक बंदा अशीच त्यांची ओळख होती. (Indian cinema)

हज वरून परत आल्यानंतर काही मौलवींनी त्यांना सांगितले,”तुम्ही पवित्र हज यात्रा पूर्ण केली आहे. आता तुम्ही हाजी बनला आहात. त्यामुळे सिनेमातील गाणी गाणे वगैरे प्रकार तुम्ही आता बंद केले पाहिजे. हे सर्व आपल्या धर्मात बसत नाही”. त्यांच्या अशा सुचनांमुळे रफी यांनी असा निर्णय घेतला की आता यापुढे गाणं बंद करू आणि फक्त खुदाच्या धार्मिक रचना गाऊ. त्यांच्या या निर्णयाने संगीतकार आणि चित्रपट निर्मात्यांमध्ये मोठा हडकंप झाला. कारण भले किशोर कुमार त्या काळी लोकप्रिय असले तरी रफींच्या स्वरांची मोहिनी रसिकांवर कायम होती. (Bollywood)
================
हे देखील वाचा : Javed Akhtar : अभिनेता धर्मेंद्रने जावेद अख्तरची का माफी मागितली होती ?
================
याच काळात संगीतकार नौशाद हे एकदा रफी यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी आले. रफी यांच्या गाणी न गाण्याच्या निर्णयावर ते म्हणाले,” रफी साहब, आपकी आवाज अवाम की आवाज है. आपको कोई हक नही करोडो चाहनेवाले के दिलों को ठेस पहुचानेका. रफी मियां, आपके लिये गाना हि खुदा की इबादत है. आपकी आवाज से करोडो लोगों के दिल को सुकून मिलता है. इसलिए आपको कोई हक नही पहुचता गाना बंद करनेका. आप दुबारा गाना गाना शुरू कीजिए. पूरी दुनिया आपकी गानो के लिए तरस रही है.” रफी यांनी नौशाद अली यांचा सल्ला ऐकला आणि त्यांनी पुन्हा गायला सुरुवात केली.(Entertainment)

त्याच वेळी रफी संपले त्यांना कोणी गाणे देत नाही असा दुष्प्रचार काही हितचिंतकांनी (?) सुरू केला होता. या चुकीच्या नरेटीवला देखील रफी यांना उत्तर द्यायचे होते. या सर्वातून त्यांनी पुन्हा एकदा गाणी घ्यायचा निर्णय घेतला आणि असं ठरवले की आता आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण गात राहायचं. कारण गाणं हीच आपली खरी इबादत आहे; असं म्हणून त्यांनी गायला सुरुवात केली. आणि रफींचा पुन्हा comeback झाला. सत्तरच्या दशकात भले त्यांच्या गाण्याची संख्या कमी झाली असेल पण क्वालिटी तीच होती. (Bollywood tadaka)

‘क्या हुआ तेरा वादा’ (हम किसीसे काम नही), ‘आज मौसम बडा बेईमान है’ (लोफर), ‘चुरा लिया है तुमने जो दिल को’ (यादो की बारात), ‘तुम जो मिल गये हो’ (हंसते जख्म), ‘परदा है परदा’ (अमर कबर अन्थानी), ‘डफली वाले’ (सरगम), ‘दर्दे दिल दर्दे जिगर’ (कर्ज), ‘मैने पूछा चांद से के देखा है कही’ (अब्दुल्ला) … रफींच्या लोकप्रियतेचा आलेख पुन्हा विस्तारत होता. पण ३१ जुलै १९८० या दिवशी हृदयविकाराने रफी यांचे अकाली वयाच्या अवघ्या ५६व्या वर्षी निधन झाले. त्याच्या आदल्या दिवशी त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्याकडे ‘आसपास’ या सिनेमासाठी एक गाणं रेकॉर्ड केलं होतं ‘तू काही आसपास है दोस्त….’ शेवटच्या श्वासापर्यंत गात राहायचं ही त्यांची प्रतिज्ञा खऱ्या अर्थाने पूर्ण झाली होती!(Bollywood masala)