आशा पारेखला मिळालेलं एकमेव फिल्मफेअर अवार्ड आणि मुमताजची नाराजी
हिंदी सिनेमातील बॉक्स ऑफिसवर कायम हिट असणाऱ्या अभिनेत्री आशा पारेख यांनी आपल्या पंचवीस वर्षाच्या सिने कारकिर्दीत अनेक यशस्वी चित्रपट दिले. यश आणि आशा पारेख हे दोन समानार्थी शब्द झाले होते. त्यामुळेच की काय, आशा पारेख यांच्यावर पत्रकार खालिद मोहम्मद यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे नावही ‘द हिट गर्ल’ असेच आहे.
आशा पारेख यांची इतकी प्रदीर्घ आणि यशस्वी कारकीर्द असली तरी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार फक्त एका चित्रपटासाठी मिळाला होता ही कटू वस्तुस्थिती नाकारता येत नाही. अर्थात पुरस्कारानेच कलाकारांचे मूल्यमापन होतं, अशातला भाग नाही. तसं असतं तर, धर्मेंद्र सारख्या सुपरस्टारला आयुष्यात एखादा तरी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला असता.
आज आपण आशा पारेख यांच्या पुरस्काराबाबत आणि त्यानंतर घडलेल्या एका रामायणाबाबत बोलणार आहोत. असे काय झाले की, एक अभिनेत्री या पुरस्कारावर जबरदस्त नाराज झाली आणि तिने का शेलक्या शब्दात आशाचा उध्दार केला?
ही ‘अनटोल्ड स्टोरी’ सांगण्यापूर्वी थोडंसं आशा पारेखच्या कलाजीवनाबाबत आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलूयात. २ ऑक्टोबर १९४२ रोजी गुजरात मध्ये तिचा जन्म झाला. तिची आई मुस्लीम, तर वडील हिदू होते. लहानपणापासूनच तिला नटा-मुरडायची हौस होती. बालवयातच ती चित्रपटसृष्टीमध्ये आली. तिच्या वयाच्या सोळाव्या वर्षी विजय भट्ट यांनी तिला ‘गुंज उठी शहनाई’ या चित्रपटात घ्यायचा विचार केला, पण तिच्यात ‘स्टार मटेरियल’ नाही म्हणून तिला डावलून अमिताला घेतले गेले. पण त्याने काही फरक पडला नाही.
नासिर हुसैन यांनी तिला १९५९ साली, ‘दिल देके देखो’ या चित्रपटात शम्मी कपूर सोबत कास्ट केले आणि तिची अभिनयाची यात्रा चालू झाली. नासीर हुसैन यांच्या १९५९ सालच्या ‘दिल देके देखो’ पासून १९७१ सालच्या कारवा पर्यंत प्रत्येक चित्रपटामध्ये प्रमुख नायिका आशा पारेख होती.
१९६६ सालच्या ‘बहारों के सपने’ पासून नासिर हुसैन सोबत ती सिने डिस्ट्रीब्यूशन करू लागली. चुलबुली, शरारती, फॅशनेबल आणि पन्नासच्या दशकातील नायिकांची प्रतिमा बदलून टाकणारी अभिनेत्री म्हणून आशा पारेखकडे पाहायला पाहिजे. हुकमी यशाची स्मार्ट नायिका, असं खरंतर तिचं वर्णन करायला पाहिजे.
साठच्या दशकात आशा ‘रोमँटिक म्युझिकल’ चित्रपटात मस्तपैकी सामावली गेली. तिची नृत्यशैली देखील चांगली होती, पण या दशकात तिला अभिनय करण्याची संधी फार कमी मिळाली. गुडीगुडी दिसणे, नायकाच्या मागे पुढे करणं, झाडाभोवती फिरत गाणी म्हणणं अशा टिपिकल भूमिका तिच्या वाट्याला आल्या. तरीही संधी मिळेल त्या वेळेला ती तिच्या अभिनयाचा रंग दाखवत होती.
या काळातील तिच्या हीट चित्रपटांबद्दल बोलायचं तर, दिल देके देखो, जब प्यार किसी से होता है, फिर वही दिल लाया हु, मेरे सनम, तीसरी मंजिल, लव इन टोकियो, इ. चित्रपटातून आशा चमकत राहिली. अधून मधून छाया, घुंघट, दो बदन बहारों, बहारो के सपने अशा सिनेमातून तिच्या अभिनयाची उजवी बाजू समोर येत होती.
शक्ती सामंत यांच्या १९७० साली प्रदर्शित झालेल्या ‘कटी पतंग’ या चित्रपटात आशा पारेखला घेतले त्यावेळी बऱ्याच जणांनी आश्चर्य व्यक्त केले होते. एकतर या चित्रपटात नायिका ‘नॉन ग्लामरस’ पूर्णतः पांढरे कपड्यातील विधवा दाखवली होती. अशा प्रकारची भूमिका तिच्या फिल्मी इमेजला पूर्णपणे काट मारणारी अशी होती. खरंतर या भूमिकेसाठी शक्ती सामंत यांना शर्मिला टागोर यांनाच घ्यायचं होतं कारण दोन वर्षांपूर्वी आलेल्या ‘आराधना’ मध्ये शर्मिलाने अभिनयात बाजी मारली होती. पण नेमकं या चित्रपटाच्या वेळी ती गरोदर असल्याने आशा पारेखची वर्णी लागली.
आशा पारेखने त्यापूर्वी शक्ती सामंत सोबत ‘पगला कही का’ या चित्रपटात भूमिका केली होती. राजेश खन्ना सोबत या पूर्वी तिचे ‘बहारों के सपने’, ‘आन मिलो सजना’ हे चित्रपट पडद्यावर झळकले होते.
‘कटी पतंग’ या चित्रपटाचे कथानक गुलशन नंदा यांच्या कादंबरीवर आधारित होती व यांनीच या चित्रपटाची पटकथा देखील लिहिली होती. गुलशन नंदा यांची ‘कटी पतंग’ ही कादंबरी मूळ अमेरिकन लेखक कॉर्नेल वूलरिच यांच्या १९४८ साली लिहिलेल्या ‘मॅरीड अ डेड मॅन’ या पुस्तकावर आधारित होती.
सत्तरच्या दशकामध्ये नायिकेला संपूर्ण चित्रपट विधवा दाखवण्याचा जुगार शक्ती सामंत यांनी मोठ्या यशस्वीपणे खेळला होता. आशा पारेख यांनी श्वेत वस्त्रामध्ये साकारलेली विधवा अप्रतिमरित्या वठवली. याच भूमिकेसाठी आशा पारेख यांना आयुष्यातील एकमेव सर्वोत्कृष्ट फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. यावेळी तिच्यासोबत जया भादुरी यांना गुड्डी आणि उपहार या सिनेमा करीता ‘नॉमिनेशन’ मिळालं होतं. पण या पुरस्कारानंतर अभिनेत्री मुमताज खूप नाराज झाली होती.
हे ही वाचा: नवं वर्ष ब्लॉकबस्टर चित्रपटांचं….अडसर फक्त कोरोनाचा….(Blockbuster Movies in 2022)
अमिताभ बच्चन -अमजद खान यांच्या मैत्रीची ‘अधुरी एक कहाणी’
तिला स्वत:ला ‘तेरे मेरे सपने’ साठी हा पुरस्कार मिळायला हवा, अशी तिची खूप इच्छा होती. नवकेतन या चित्रपटातील तिचा अभिनय खरोखरच अतिशय वरच्या दर्जाचा झाला होता, पण दुर्दैवाने तिला फिल्मफेअरचे नॉमिनेशन देखील मिळाले नाही. मुमताजने या वेळी आपली नाराजी उघड बोलून दाखवली होती.
एका इंग्रजी नियतकालिकाशी बोलताना ती म्हणाली होती, “I really deserved it. Instead, it went to Asha Parekh for Kati Patang in which she wore white and stood in front of the piano doing precious little. Khair, jaane do (let it go). God has given me so much.”