Bollywood : हिरोईनने नकार दिल्याने कोणता कलाकार फिल्म इंडस्ट्रीच सोडून

Bollywood : हिरोईनने नकार दिल्याने कोणता कलाकार फिल्म इंडस्ट्रीच सोडून चालला होता?
हिंदी सिनेमातील चरित्र अभिनेते आणि प्रामुख्याने खलनायकाच्या भूमिका करणारे सुजित कुमार यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात हिरो म्हणून देखील काही भूमिका केल्या होत्या पण त्यांना खरी ओळख मिळाली ती खलनायक म्हणूनच! राजेश खन्नाच्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या होत्या. ७ फेब्रुवारी १९३४ या दिवशी जन्मलेले सुजीतकुमार खरंतर ग्रॅज्युएशन नंतर एमबीए करण्यासाठी परदेशात जाणार होते. पण कॉलेजमध्ये असतानाच एका नाटकात त्यांनी भूमिका केली आणि एकदा चेहऱ्याला जो रंग लावला तो कायमचा तसाच राहिला. याच काळात त्यांना एका अभिनेत्रीने त्यांच्यासोबत काम करायला नकार दिल्यानंतर प्रचंड नैराश आल्यामुळे ते चक्क चित्रपटसृष्टी सोडून जायला निघाले होते पण त्यांच्या मित्रांनी त्यांना तसे करण्यापासून परावृत्त केले आणि सुजित कुमार मायानगरीत स्थिरावले.
महाविद्यालयात असताना त्यांनी एका नाटकांमध्ये भूमिका केली होती. हे नाटक त्या काळात प्रचंड गाजले. नाट्यस्पर्धे मध्ये देखील या नाटकाने पहिला क्रमांक मिळाला. पारितोषिक वितरणासाठी त्या काळातील ख्यातनाम दिग्दर्शक फणी मुजुमदार यांना बोलावण्यात आले होते. त्यांना सुजित कुमारचे देखणे रूप, उंची, त्यांची बोलण्याची स्टाईल खूप आवडली. त्यांनी कार्यक्रमानंतर त्याला ,” तू सिनेमामध्ये का ट्राय करत नाहीस?” असे विचारले आणि त्याला मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले. त्या काळात फणी मुजुमदार ‘आकाशदीप’(१९६५) या चित्रपटावर काम करत होते. या चित्रपटात नंदा आणि धर्मेंद्र यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सुजित कुमार फणी मुजुमदार त्यांचे सहाय्यक म्हणून या चित्रपटासाठी घेतले.
‘आकाशदीप’ चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे नवीन चित्रपटात ब्रेक देण्याचे जे आश्वासन दिग्दर्शकांनी दिले होते ते पूर्ण झाले नाही. त्यामुळे सुजित कुमार यांच्या वाटेला संघर्ष आला. छोट्या मोठ्या भूमिका त्यांना मिळत होत्या पण संघर्ष सुरु होता. याच काळात भारतात भोजपुरी चित्रपटांचा बोल वाला सुरू झाला होता. सुजित कुमार यांना एक भोजपुरी चित्रपट मिळाला. गंगा मैया तोहे पियरी चढइ बो’ हा चित्रपट चांगला चालला. यानंतर दिग्दर्शक नाझिर हुसैन (ज्यांनी हिंदी सिनेमात अनेक चरित्र भूमिका केल्या होत्या.) यांनी सुजित कुमारला एका भोजपुरी चित्रपटात (हमार संसार) हिरो म्हणून निवडले.

सुजित कुमारसाठी ही फार मोठी संधी होती. तो प्रचंड खूष होता परंतु हा आनंद फार काळ टिकला नाही. चित्रपट सुरू होण्याच्या दोन दिवस आधी चित्रपटाच्या हिरोईनने (लिली) ,” मी सुजित कुमार सोबत काम करणार नाही!” असे सांगितले. दिग्दर्शकाने नायक बदलला आता ही भूमिका असीम कुमार देण्यात आली. या घटनेमुळे सुजित कुमार यांना प्रचंड नैराश्य आले. एकतर हीरोइन ने त्याच्यासोबत काम करायला नकार दिला होता आणि दुसरी मनस्ताप देणारी गोष्ट म्हणजे असीम कुमार सोबत काम करायला तिने होकार दिला होता! सुजित कुमारचे वय तरुण होते त्यामुळे त्यांना असे वाटणे साहजिक होते.
प्रचंड नैराश्यातून त्यांनी चित्रपटातून संन्यास घेण्याचा विचार केला पण त्यांच्या मित्रांनी त्याला या निर्णयापासून परावृत्त केले. याच काळात संगीतकार एस एन त्रिपाठी यांनी ‘बिदेसिया’ या भोजपुरी चित्रपटासाठी त्यांना हिरो म्हणून घेतले. सुजित कुमार त्यांना म्हणाले ,” तुम्ही मला हिरो म्हणून घेतले त्याचा काय उपयोग? कारण चित्रपटाच्या हीरोइनने जर मला नकार दिला तर तुम्ही काढून टाकणार! मला असेच मागच्या एका सिनेमातून काढून टाकले होते!” त्यावर दिग्दर्शक म्हणाले,” असं होणार नाही. जर हीरोइन असं म्हणाली तर मीच त्या हीरोइन ला सिनेमातून काढून टाकेन!”
================================
हे देखील वाचा : Manoj Kumar : माला सिन्हा यांनी मनोज कुमार यांचा पाणउतारा केला होता.
=================================
आता सुजित कुमारला थोडासा धीर आला. दुसऱ्या दिवशी दिग्दर्शक सुजित कुमारला घेऊन हिरोईनच्या म्हणजे बेबी नाझ च्या घरी घेऊन गेले आणि तिला सुजित कुमारची भीती बोलून दाखवली. बेबी नाझ हसली आणि म्हणाली,” एवढा मोठा दिग्दर्शक जर तुम्हाला सिलेक्ट करत असेल तर मी कोण आली तुमच्या सोबत सिनेमात काम करायला नकार देणारी?” अशा पद्धतीने ‘बिदेसीया’(१९६३) या चित्रपटात सुजित कुमार आणि बेबी नाज ही जोडी पुढे आली. भोजपुरी मधील हा सिनेमा सुपर डुपर हिट ठरला. आता हिंदी सिनेमाच्या दिग्दर्शकांचे लक्ष देखील सुजित कुमार कडे गेले आणि त्यांना पहिला चित्रपट मिळाला ‘एक साल पहले’. चित्रपटाला फारसे यश मिळाले नाही पण सुजित कुमार ची हिंदी मध्ये एन्ट्री झाली.
त्यांना खरे यश मिळाले राजेश खन्नाच्या ‘आराधना’ या चित्रपटात. यातील ‘मेरे सपनोंकी रानी कब आएगी तू…’ या गाण्यात जीप मध्ये बसून माऊथ ऑर्गन वाजवणारा सुजित कुमार आज देखील सगळ्यांच्या लक्षात आहे. सत्तर च्या दशकातील तो आघाडीचा खलनायक ठरला. राजेश खन्ना सोबत त्याने अनेक चित्रपट केले. ऐंशीच्या दशकात सुजित कुमारने निर्माता म्हणून काही चित्रपट केले. २० भोजपुरी आणि १५० हिंदी सिनेमा त्यांनी भूमिका केल्या. एक हँडसम चरित्र अभिनेता आणि खलनायक म्हणून तो रसिकांच्या कायम लक्षात आहे.सुपरस्टार राजेश खन्ना च्या अनेक सिनेमात सुजीतकुमार असायचा. आराधना, इत्तफाक,आन मिलो सजना, हाथी मेरे साथी,अमरप्रेम,मेरे जीवन साथी,राजा रानी, रोटी,जमानत…५ फेब्रुवारी १९१० रोजी त्यांचे निधन झाले.