‘मुगल-ए-आजम’च्या प्रीमियरला मुख्य तारे का उपस्थित नव्हते?
दिग्दर्शक के. आसिफ यांनी तब्बल दहा वर्ष मेहनत करून मागच्या शतकातील एका महान कलाकृतीला पडल्यावर आणले. चित्रपट होता ‘मुगल ए आजम’ (Mughal-E-Azam). या चित्रपटासाठी निर्माता आणि पाण्यासारखा पैसा खर्च केला. के असिफ याने या चित्रपटातील प्रत्येक शॉट कसा परिपूर्ण होईल यासाठी कमालीची मेहनत घेतली होती. हा चित्रपट म्हणजे भारतातील त्या काळातील एक मोठं आश्चर्य होतं. या सिनेमाचा प्रीमियर देखील खूप धूमधडाक्यामध्ये ५ ऑगस्ट १९६० रोजी पार पडला होता.
या सिनेमाची हवा तीन चार महिन्यापासून सतत गरम ठेवली होती. खरंतर त्या वेळेला पब्लिसिटी मीडिया फारसा उपलब्ध नव्हता. पण तरी मिळेल त्या साधनातून के असिफ आणि निर्माते यांनी ‘मुगल ए आजम’ (Mughal-E-Azam) या चित्रपटाची प्रचंड हवा निर्माण केली होती. मराठा मंदिर थिएटरमध्ये या चित्रपटाचा प्रीमियर झाला होता. हे थिएटर या चित्रपटाच्या रिलीजच्या निमित्ताने पूर्णतः अंतर बाह्य सजवले गेले होते. चित्रपट प्रदर्शन होण्यापूर्वी एक दीड महिने आधी चित्रपटातील किल्ल्याचा सेट पुढे थिएटर समोर उभा केला होता.
पृथ्वीराज कपूर, दिलीप कुमार, मधुबाला, के आसिफ यांचे मोठमोठे कट आउट मुंबई शहरात लावले होते. पोस्टर्स मुंबईच्या सर्व लोकल स्टेशनवर मोठ्या दिमाखात झळकत होते. या चित्रपटाचे ब्रॅण्डिंग फार मोठ्या प्रमाणात आणि पहिल्यांदाच केले गेले. सिनेमाच्या पोस्टर्सपासून सिनेमाच्या तिकिटापर्यंत ते दिसून येत होते. सिनेमाची तिकिटे सप्तरंगात छापली होती. एक रुपया तीस पैसे तिकीट असलेले चक्क शंभर ते दीडशे रुपये ब्लॅकने विकले होते! सिनेमाचे ऍडव्हान्स बुकिंग खूप दिवस आधीच सुरू झाले होते.
अर्थात आपल्याकडे सुपरहिट झालेल्या गोष्टीच्या अनेक दंतकथा देखील निर्माण होतात. तशा या सिनेमांमध्ये झाल्या होत्या. या सिनेमाच्या प्रीमियरला अख्ख बॉलीवूड उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याची निर्मिती त्याच वर्षी झाली होती. राज्याचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण स्वतः या प्रीमियरला उपस्थित होते. व्ही शांताराम, राजकपूर, शम्मी कपूर, मीनाकुमारी, कमल अमरोही, नूतन, तनुजा, निम्मी, देव आनंद, कल्पना कार्तिक, सुरय्या सर्वजण या प्रीमियरला उपस्थित होते.
या प्रीमियरला पाकिस्तानी अभिनेता नझिर हुसेन उपस्थित होते. हा अभिनेता के असिफ यांचा कझिन होता. गंमत म्हणजे नझिर हुसेनची बायको सितारा देवी हिने त्याच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर के असिफ यांच्याशी लग्न केले. नझिर हुसेन फाळणीनंतर पाकिस्तानात गेले. तिकडे त्यांनी अनेक चित्रपट निर्माण केले आणि भारतातून तिकडे गेलेल्या स्वर्णलतासोबत त्यांनी लग्न केले. हे दोघेही प्रीमियरला उपस्थित होते. या चित्रपटाच्या प्रीमियरची एक डॉक्युमेंटरी बनवली गेली. भारतात हे पहिल्यांदाच घडत होतं. या चित्रपटाच्या प्रीमियमला कोण कोण उपस्थित होते. याची नावे वारंवार सांगितले जातात.
पण या प्रीमियरला अनुपस्थितीत कोण होते? या सिनेमाला गैरहजर होते? चित्रपटाचे नायक आणि नायिका दिलीप कुमार आणि मधुबाला हे दोघेही प्रीमियरला फिरकलेच नाहीत. या दोघांचे अनुपस्थित राहण्याचे कारणे वेगवेगळी होती. दिलीप कुमार आणि के असिफ यांच्यात चित्रपटाच्यानंतर मतभेद निर्माण झाले होते याचं कारण के असिफ यांनी दिलीप कुमार यांची बहिण अख्तरसोबत लग्न केले होते. जे दिलीप कुमारला अजिबात आवडले नव्हते.
========
हे देखील वाचा : ‘शान त्रेचाळीस वर्षाचा झाला..’
========
मधुबाला प्रीमीयरला अबसेंट राहण्याचे कारण दिलीप कुमार नव्हते. त्या दोघांमध्ये ऑलरेडी मतभेद होतेच पण मधुबालाचे वडील आताऊल्ला खान यांनी तिला कोणत्याही प्रीमियरला जाण्यापासून बंधन घातले होते. त्यामुळे ती या चित्रपटाच्या प्रीमियरला उपस्थित नव्हती. काही मीडियाच्या मते त्या काळात तिची तब्येत देखील बरी नसायची त्यामुळे ती या प्रीमियरला उपस्थित नव्हती. काही असो, बॉलिवूडचे सर्व तारे मुगल-ए-आजमच्या प्रीमियरला उपस्थित जरी असले तरी सिनेमातील मुख्य तारे दिलीप व मधुबाला या प्रीमियरला उपस्थित नव्हते हे खरे.
२००६ साली मुगल-ए-आजम (Mughal-E-Azam) संपूर्ण रंगीत बनवला गेला आणि त्याचा प्रीमियर मुंबईमध्ये झाला या प्रीमियरला मात्र दिलीप कुमार आवर्जून उपस्थित होते! मधुबाला मात्र त्या वेळी या दुनियेत नव्हती.