‘जंजीर’ सुपरहिट झाला आणि अमिताभचे स्टार पालटले!
माणसाच्या आयुष्यातील जेंव्हा खराब काळ असतो तेंव्हा सगळ्या बाजूने संकटांचा भडिमार होत असतो. कुठलीच गोष्ट सरळ होत नाही. साध्या सुलभ गोष्टी साठी ही झगडावे लागते. कलाक्षेत्रात तर याचा प्रत्यय वारंवार येत असतो. कारण इथे कर्तृत्वासोबतच नशीब देखील मोठी खेळी खेळत असते. मुळात मायानगरी ही उगवत्या सूर्याला नमस्कार करणारी दुनिया आहे. त्यामुळे इथे जो हिट होतो त्याचीच बात ऐकली जाते.
महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी सुरुवातीची चार-पाच वर्ष अतिशय संघर्षात काढली होती. कित्येक सिनेमातून त्यांना फ्लॉप कलाकार म्हणून चक्क काढून टाकण्यात आलं होतं. अतिशय अपनास्पद वाईट अशी वागणूक त्यांना मिळत असायची. पण त्यांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं आणि यश संपादन केले. त्यांच्या याच संघर्षाच्या काळातील एक किस्सा मध्यंतरी वाचण्यात आला होता.
दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी यांनी ‘आनंद’ (१९७१) या चित्रपटानंतर ‘नमक हराम’ या चित्रपटाचे निर्मिती सुरू केली. ‘आनंद’ या चित्रपटातील राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांना या सिनेमा देखील त्यांनी रिपीट केले. राजेश खन्ना त्यावेळी सुपरस्टार पदावर होता तर अमिताभ बच्चन फ्लॉप चित्रपटांचा नायक होता! राजेश खन्नाच्या डेट्स मिळणं खूप अवघड होतं. अमिताभ बच्चन यांच्याकडे डेट्सचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे ऋषिकेश मुखर्जी यांनी अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांचे सोलो शॉट्स चित्रित करायचे ठरवले.
राजेश खन्ना त्यावेळी प्रचंड बिझी असल्यामुळे त्याचे खूप कमी शॉट तोपर्यंत चित्रित झाले होते. दरम्यानच्या काळात त्यांचे दिल्लीमधील काही डिस्ट्रीब्युटर्स ऋषिकेश मुखर्जी यांना भेटण्यासाठी आले. त्यांनी ऋषिदांना त्यांच्या आगामी ‘नमक हराम’ चित्रपटाचे रशेस (अपूर्ण चित्रपटाचे झालेले शूट) दाखवायची मागणी केली. ऋषिकेश मुखर्जी यांनी आपल्या नमक हराम या चित्रपटाचे रशेस त्या लोकांना दाखवले. त्यात अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांचेच शॉट्स जास्त होते राजेश खन्नाचे त्या मानाने कमी शॉट्स होते.
डिस्ट्रीब्यूटरने विचारले,” या सिनेमाचा हिरो नक्की कोण आहे? राजेश की अमिताभ?” ऋषिकेश मुखर्जी म्हणाले ,”अर्थातच राजेश खन्ना!” डिस्ट्रीब्यूटरने विचारले,” राजेश खन्ना तर या चित्रपटात कुठे दिसत नाही?” तेव्हा ऋषिकेश मुखर्जी म्हणाले,” चित्रपटाच्या रशेस वरून तुम्हाला आता कल्पना येणार नाही. तुम्ही आता जे पाहत आहात तो केवळ अर्धवट बनलेला सिनेमा आहे. अजून अर्ध्या सिनेमाची शूटिंग बाकी आहे.” तेव्हा डिस्ट्रीब्युटर्स म्हणाले,” त्या अश्वमुखी अभिनेत्याला का घेतले? तो अभिनयातला ठोकळा आहे. त्याचा सिनेमातले रोल कमी करा. राजेश खन्नाचा रोल वाढवा”. मग ते डिस्ट्रीब्यूटर ! ऋषिकेश मुखर्जी शांतपणे सर्व ऐकून घेत होते. डिस्ट्रीब्यूटरचे ऐकून ते म्हणाले,” आपण याबाबत आता काहीच बोलायला नको. चित्रपट पूर्ण होवू द्या.”
या नंतर मात्र एक मोठा चमत्कार झाला. ११ मे १९७३ या दिवशी प्रकाश मेहरा यांचा ‘जंजीर’ हा चित्रपट झळकला. आणि पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाने देशभर मोठी हवा निर्माण केली. Angri young man चा जन्म झाला. ’ये पुलिस स्टेशन है. आपके बाप का घर नही.” या डायलॉग ने अमिताभ (Amitabh Bacchan) तरुणाईचा स्टार झाला. अमिताभ बच्चनचे नाव देशभर गाजू लागले. याच काळात नमक हरामचे उर्वरित शूटिंग देखील चालू होते. आता अमिताभ बच्चन यांच्या नावाला एक वलय प्राप्त झाले होते.
==============
हे देखील वाचा : ‘कभी कभी’ चे टायटल सॉंग अमिताभ बच्चन गाणार होते?
पुन्हा काही दिवसानंतर डिस्ट्रीब्यूटरस ऋषिकेश मुखर्जी यांना भेटायला आले. त्यावेळी ज्या डिस्ट्रीब्युटर्सने अमिताभची एकमुखाने टिंगल केली होती ते सर्व हृषिदांना म्हणू लागले, ”दादा अमिताभ बच्चन का रोल बढाव. उसे राजेश खन्ना के इक्वल का रोल दो.” एका ‘जंजीर’ ने सर्व हवा फिरवली होती. जे डिस्ट्रीब्युटर्स अमिताभ बच्चन वर अपशब्दा मध्ये टिंगल करत होते त्यांची शब्द त्यांच्याच घशात गेले. आणि ते सर्व अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांचे भक्त झाले. हा सर्व करिष्मा जंजीर चा होता. ऋषिकेश मुखर्जी फक्त शांतपणे हसले आणि म्हणाले “वक्त वक्त की बात होती है.” १८ नोव्हेंबर १९७३ रोजी ‘नमक हराम’ प्रदर्शित झाला आणि सुपर हिट झाला.