छोट्यांसाठी गम्मत : अटकन चटकन
कोरोनामुळे मार्च महिन्यापासून घरी कैद झालेली छोटी मंडळी किती कंटाळली असतील याची कल्पना कोणालाही येणार नाही. या छोट्यांसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक छान म्युझिकल मेजवानी सादर झाली आहे. अटकन चटकन हा लहान मुलांचा चित्रपट नुकताच झी-5 वर प्रदर्शित झाला आहे. जो सपने देखते वो डरते नही…असं म्हणून चहा टपरीवर आणि गॅरेजमध्ये काम करणारी छोटी मुलं आपला स्वतःचा म्युझिक बॅण्ड तयार करतात. अगदी सामान्य साहित्याच्या मदतीतून वाद्य निर्मिती करतात…या छोट्यांच्या हा स्वप्नाचा प्रवास आपल्या सर्वांच्या घरातील छोट्या मंडळींना नक्की आवडण्यासारखा आहे.
अटकन चटकन हा चित्रपट ए. आर. रहमान यांच्या मार्गदर्शनाखाली झाला आहे. या चित्रपटाची कथा सौम्य शिवहरे यांची असून तेच या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. तर संगिताची जबाबदारी शिवमणी यांनी सांभाळली आहे. चित्रपटात लिडियन नदस्वरम, यश राणे, सचिन चौधरी, तमन्ना दीपक, आयशा विंधारा या बालकलाकारांच्या भूमिका आहेत.
ही चार मित्रांची कथा आहे. गुड्डू, माधव, छुट्टन, मिठी हे आपली संगिताची आवड कठीण परिस्थितीतून पूर्ण करतात. त्यातला गुड्डू हा चहाच्या टपरीवर काम करत असतो. त्याला प्रत्येक गोष्टीतून सूर ऐकायला येतो. एक दिवस ऑर्केस्ट्रा कंपनीमध्ये चहा देण्यासाठी गेल्यावर तिथल्या वातावरणांनी मोहीत होतो. तिथे काम देण्यासाठी विनंती करतो. आणि त्याच आशेवर टपरीवरील काम सोडतो. पण त्याला ऑर्केस्ट्रामध्ये काम मिळत नाही. शेवटी त्याला एका भंगाराच्या दुकानात काम करावे लागते. तिथे त्याला छुट्टन आणि मिठी भेटतात. ही दोघंही बसमध्ये गाणी गाऊन पैसे मिळवत असतात. एक दिवस भंगारच्या दुकानातून छुट्टन आणि मिठी काही भांडी चोरतात. आळ गुड्डूवर येतो. त्याचं आणि छुट्टन, मिठी यांचे जोरदार भांडण होते. हे भांडण सोडवायला माधव नावाचा मुलगा येतो. मग या चौघांना समजते की त्यांची आवड एकच आहे. त्यांची मैत्री पक्की होते, आणि ते एक ऑर्केस्ट्राची निर्मिती करतात. या ऑर्केस्ट्रामधील वाद्यांना वाद्य म्हणायचे का, हाही एक प्रश्न असतो. सर्व तुटलेल्या वस्तूंचा वाद्य म्हणून ही छोटी मंडळी वापर करतात. कसे हे मात्र पडद्यावर बघण्यासारखे आहे. या अनोख्या ऑर्केस्ट्रावर एक दिवस म्युझिक स्कूलच्या प्राचार्यांची नजर पडते. हे प्राचार्य या मुलांमधील गुण ओळखून त्यांना स्पर्धेत भाग घेण्यासाठी तयार करतात. ही मुलं स्पर्धा जिंकतात का…त्यांचे म्युझिक स्कूलमध्ये शिकण्याचे स्वप्न पूर्ण होते का हे बघण्यासारखे आहे.
अटकन चटकन चित्रपटातील गाणीही खास आहेत. कारण त्यातील एका गाण्याला चक्क अमिताभ बच्चन यांचा आवाज आहे. अटकन चटकन आणि दाता शक्ति दे ही गाणी अमिताभ बच्चन, सोनू निगम, हरिहरन, रूना शिवमणि आणि उथारा उन्नीकृष्णन या दिग्गज्जांनी गायली आहेत. एकूण काय कोरोनामुळे घरी अडकडलेल्या छोटया मुलांसाठी अटकन चटकन ही चांगली मेजवानीच ठरणार आहे.