दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
सेटवर प्रत्यक्षातही क्रिकेटचा खेळ मेळ…
रिळ पहिले
देव आनंदने क्रिकेटला (Cricket) थीमच्या मध्यभागी ठेवून “अव्वल नंबर” नावाचा त्याच्या स्टाईलचा (म्हणजेच त्याची चित्रपट निर्मिती/दिग्दर्शन व आपलीच मध्यवर्ती भूमिका, आपल्याच दिलखुलास मुलाखती) असलेला चित्रपट पडद्यावर आणला होता आणि त्यात चक्क आमिर खानही होता (देव आनंदच्या चित्रपटात देव आनंदच हीरो असतो, म्हणजेच आमिर खान यात हीरो होता असे म्हणता येणार नाही.) देव आनंदच्या अनेक हौशी गोष्टींमधील एक म्हणजे आपल्या चित्रपटाच्या सेटवर आम्हा सिनेपत्रकारांना आग्रहाने बोलावणे, आपल्या दिग्दर्शनातील शूटिंग आम्हाला दाखवणे आणि गोडधोड गोष्टी ऐकवणे. देवसाहेबाची भेट म्हणजे आपण फक्त आणि फक्त ऐकायचे असते. हा माझा अनुभव. त्यामुळे देवसाहेबांच्या उत्साहाची उर्जा आणखीन वाढे. एकूणच अनुभव सुखद. याच अलिखित नियमानुसार ‘अव्वल नंबर’च्या ब्रेबॉर्न स्टेडियमवरील शूटिंग रिपोर्टींगचे आमंत्रण हाती येताच ही संधी घेणारच. विशेष म्हणजे, ब्रेबॉर्नच्या मैदानात एका बाजला हे शूटिंग होते. कसोटी क्रिकेटर्सच्या (Cricket) सफेद कपड्यात देव आनंद, आमिर खान, आदित्य पांचोली, इत्यादी. क्रिकेटच्या मैदानावरचा सिनेमा असाच हा अनुभव. अर्थात, क्रिकेट असो वा चित्रपट भर उन्हाचा अनुभव आणि ताप दोन्हीत. पण शूटिंगला अधूनमधून कॅमेर्यासमोर आणि तसेच अधूनमधून मोठ्या कलरफुल छत्रीखाली असा प्रकार, असे सुख. क्रिकेटच्या मैदानावर असे शूटिंग अनेक चित्रपटात आपण पाहिलयं, मला त्याचा असा अनुभव आला.
रिळ दुसरे
स्थळ नागी व्हीला बंगला, जुहू विलेपार्ले स्कीम
निमित्त विनय लाड दिग्दर्शित “घोळात घोळ” या चित्रपटाच्या शूटिंग रिपोर्टींगसाठी मी सेटवर जातो. सेटवर पाऊल टाकताच मला निवेदिता जोशी, अश्विनी भावे व आशालता दिसतात. बहुतेक दुपारनंतर लक्ष्मीकांत बेर्डे शूटिंगला येईल असा मी विचार करत असतानाच एका रुममधून लक्ष्या अतिशय आनंदात, हसत हसत येतो आणि म्हणतो, आजची मॅच आपण जिंकतोय. नक्कीच आपण जिंकतोय. चल आता सीन करताना आणखीन मजा येईल. त्याच्या एकूणच बोलण्यातून आणि देहबोलीतून तो विलक्षण चार्ज झाला असल्याचाच भक्कम पुरावाच समोर होता. माझ्या लक्षात आले, तो दोन दृश्यांच्या मधल्या वेळेत लायटींग होत असताना अधूनमधून दूरदर्शनवर (तोपर्यंत क्रीडा वाहिन्या आल्या नव्हत्या.) क्रिकेट (Cricket) मॅच पाहतोय आणि मस्त चार्ज होतोय. महत्वाचे म्हणजे, शूटिंगला प्राधान्य देतच तो असा सेटवर मॅचही एन्जाॅय करायचा. त्या काळात आजच्यासारखे बाराही महिने क्रिकेट नसे. वर्षभरात जेमतेम दोन तीन महिन्यांचा सिझन असे. आणि तेवढाही मौसम मस्त वाटे. लक्ष्मीकांत बेर्डे आमच्या गिरगावातील कुंभारवाड्यात लहानाचा मोठा झाल्याने त्याला गल्ली क्रिकेटपासून (Cricket) कसोटी क्रिकेटपर्यंत अनेक गोष्टींत रस. त्याच्या क्रिकेट (Cricket) वेडावर एक ‘खेळकर’ मुलाखतही घेतली.
रिळ तिसरे
स्थळ आर. के. स्टुडिओ, चेंबूर
निमित्त मनमोहन देसाई निर्मित व केतन देसाई दिग्दर्शित ‘अल्लारखा’ या चित्रपटाच्या शूटिंग रिपोर्टीगसाठी आम्हा सिनेपत्रकारांना सेटवर बोलावलयं. मनजी मिडिया फ्रेन्डली असल्याने त्यांच्या भेटीसाठी आम्हा सिनेपत्रकारांना कायमच वेलकम असे. या आज सेटवर वहिदा रेहमान, डिंपल कापडिया आणि जॅकी श्राॅफ असल्याचे समजल्याने थोडा लवकरच आर. के. स्टुडिओत पोहचलो तर सेटवरबाहेर एक छोटसा आडोसा करुन त्यात मनमोहन देसाई अतिशय तल्लीन होऊन क्रिकेट मॅच पाहताना दिसले. अशा प्रकारे ते नेहमीच आपल्या शूटिंगच्या वेळेस क्रिकेट मॅचचा मनसोक्त मनमुराद आनंद घेतात आणि कधी अमिताभ बच्चनही रिलीफसाठी त्यांच्यासोबत त्यात सामील होतो याचे किस्से आणि फोटो प्रसिद्ध आहेतच, पण यावेळेस तो माझ्यासाठी लाईव्ह अनुभव होता. चित्रपटसृष्टीतील भटकंतीत मी कायमच अशा ‘अवतीभवती’च्या गोष्टींकडे खास लक्ष ठेवल्याने या जगताची मला कायमच वेगळी माहिती मिळत राहिली. त्यात बरेच वेगळेपण आणि रंजकता आहे. सिनेमाचे जग अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींतून रमलयं. त्यातीलच माझा हा एक अनुभव…
रिळ चौथे
स्थळ कमालीस्तान स्टुडिओ. अंधेरी (पश्चिम)
निमित्त एन. आर. पसीचीया निर्मित व महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘तेरा मेरा साथ रहे’च्या सेटवर शूटिंग रिपोर्टींगसाठीचे आमंत्रण. सेटवर अजय देवगण व सोनाली बेन्द्रे आहेत हे माहीत होतं. ‘वास्तव’नंतरचा महेश मांजरेकरचा चित्रपट म्हणून त्याच्याशी संवाद साधण्याची विशेष उत्सुकता होती. कमालीस्तान स्टुडिओत शिरलो तर समोरच चाळीचा भला मोठा सेट दिसला. मला पटकन आमच्या गिरगावातील चाळी डोळ्यासमोर आल्या. तेवढ्यात याच चाळीच्या परिसरात लंच ब्रेकमध्ये महेश मांजरेकर आपल्या युनिटसोबत अगदी दिलखुलासपणे क्रिकेट (Cricket) खेळत होता. त्याने खुणेनेच चाळीत येऊन बसायला सांगितले. या चित्रपटाच्या शूटिंगचा भाग म्हणून बहुतेक हे क्रिकेट(Cricket) असेल आणि हा लंच ब्रेकमधला छान टाईमपास असावा असे मी समजत होतो. पण तेवढ्यात लंच ब्रेक संपला आणि महेश मांजरेकर मला म्हणाला, शूटिंगमध्ये थोडा रिलीफ हवा म्हणून आम्ही अधूनमधून असे क्रिकेट (Cricket) खेळतो. खेळल्याने हात पाय मन अगदी मोकळं होतं. फ्रेश व्हायला होते. एक प्रकारचे ते टाॅनिक ठरते. महेश मांजरेकरने एक वेगळाच मुद्दा मांडला. आणि त्याच्या म्हणण्याचा प्रत्यय लंचनंतरच्या शूटिंगमध्ये आला. या फिल्मच्या शूटिंग रिपोर्टींगमध्ये मी हाच खेळकर अनुभव लिहिला.
रिळ पाचवे
यशराज फिल्मचे यश चोप्रा दिग्दर्शित ‘दाग’ ( १९७३) पासून आदित्य चोप्रा दिग्दर्शित ‘दिलवाले दुल्हनिया ले जाऐंगे’ ( १९९५) जवळपास सर्वच चित्रपटांचे मुहूर्त आणि बरेचसे शूटिंग परेलच्या राजकमल कलामंदिर स्टुडिओत झालेय. याच काळात यशराज फिल्मचे तेथे ऑफिसच होते. याच राजकमलच्या प्रांगणात डीडीएलजेच्या शूटिंगच्या वेळेस रिकाम्या वेळात अक्षयकुमार आणि शाहरुख खान चक्क ‘गल्ली क्रिकेट’ खेळतानाच एक्स्युझिव्हज फोटो सोशल मीडिया पाह्यला मिळाला. याला आपण ‘सेटबाहेरचे क्रिकेट’ म्हणूयात. दोघांचाही मस्त टाईमपास झाला असेल. मात्र कोणी कोणाची विकेट काढली याची कल्पना नाही. आपणच वरचढ असावे असे शाहरुखला नेहमीच वाटत असते म्हणा.
======
हे देखील वाचा : मेहबूब स्टुडिओ आणि देव आनंदचे घट्ट नाते…
=====
रिळ शेवटचे
दिलीपकुमार समुद्र किनार्यावर म्हणा अथवा आणखीन कुठे कुठे अतिशय आवडीने क्रिकेट (Cricket) खेळतानाचे फोटो तुम्ही पाहिले असालच. मसाला मिक्स मनोरंजक धमाकेदार क्रिकेट सामन्यात अनेक क्रिकेटर्स खेळतात याचीही परंपरा आहे. पडद्यावरचे क्रिकेटही आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान ‘( २००१) , नीरज पांडे दिग्दर्शित ‘धोनी द अनटोल्ड स्टोरी’ ( २०१९) अशा अनेक चित्रपटात आपण पाहिलयं. अगदी सूरजकुमार बडजात्या दिग्दर्शित ‘हम आपके है कौन ‘ ( १९९४) मध्ये माधुरी दीक्षितने क्रिकेट खेळण्याचा हसतखेळत अभिनय केला. कैतरिना कैफही शूटिंगमधील रिकाम्या वेळात गंमतीजमतीचे क्रिकेट खेळलीय. एव्हाना तुमच्याही लक्षात आले असेलच, चित्रपटाच्या जगात पडद्यावर आणि प्रत्यक्षातही क्रिकेटचा (Cricket) खेळ मेळ आहे. अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींतून सिनेमाचे जग भरलयं. त्याची अशी छोट्या छोट्या क्षणातून दखल.