‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
डीडीएलजेची २५ वर्षे आणि मराठा मंदिरचे दहा सुपर हिट…
आज सिनेमा रिलीज झाल्याचे दिसते, पण गेल्याचे अजिबात समजत नाही. मल्टीप्लेक्स युगापूर्वी असे अजिबात होत नसे हो. ते दिवसच वेगळे होते. अनेक यशस्वी चित्रपट मेन थिएटरला पंचवीस अथवा पन्नास आठवड्यांचा मुक्काम करत.
त्याचे मेन थिएटर न्यू एक्सलसियरला दिवसा तीन खेळ याप्रमाणे त्याने पन्नास आठवड्यांचा मुक्काम केला. आणि मग तो मराठा मंदिर चित्रपटगृहात मॅटीनी शोला शिफ्ट केला आणि आजही तो सुरुच आहे. तूर्तास थिएटर बंद असली तरी त्याच्या प्रदर्शनास २५ वर्ष पूर्ण झाली आहेत. रसिकांच्या दोन पिढ्या ओलांडूनही आजही हा चित्रपट थिएटरमध्ये आहे हे विशेषच आहे. कम्माल आहे.
Ddlj च्या निमित्ताने याच मराठा मंदिरचे दहा खणखणीत ज्युबिली हिट चित्रपट अगदी थोडक्यात आढावा घेत सांगायचे तर, हे थिएटर १९५८ साली सुरु झाले आणि ५ ऑगस्ट १९६० रोजी के. असिफ दिग्दर्शित ‘मुगल ए आझम’ रिलीज झाला. त्याचे अतिशय भव्य डेकोरेशन पाह्यलाही गर्दी झाली.
के. असिफ दिग्दर्शित यांच्या या फिल्मबद्दल वेगळे सांगायला नकोच. विजय आनंद दिग्दर्शित ‘गाईड’ ( १९६५) प्रीमियरच्या आमंत्रणावरही दिग्दर्शक विजय आनंदचा प्रभाव होता हे विशेष. हा चित्रपट एकाच वेळेस हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत निर्माण झाला. आपल्याकडे हिंदी प्रदर्शित झाला. विजय आनंद दिग्दर्शितच “तिसरी मंझिल” ( १९६६) या रहस्यमय म्युझिकल हिट चित्रपटाने येथेच रौप्यमहोत्सवी यश संपादले.
पुन्हा एकदा विजय आनंद दिग्दर्शित ‘जाॅनी मेरा नाम’ ( १९७०) टेरिफिक मसाला मुव्ही याच थिएटरचे विशेष आकर्षण राहिले. याचा येथील प्रीमियर खूप दिवस गाजला आणि याचे थिएटर डेकोरेशन पाह्यलाही गर्दी होई. विजय आनंदचे या तीन सुपर हिट चित्रपटांनंतर ‘तेरे मेरे सपने’, ‘छुपा रुस्तम’ यांचे मेन थिएटर मराठा मंदिरच होते. यश चोप्रा दिग्दर्शित ‘इत्तेफाक’ ( १९६९ ) येथेच मॅटीनी शोला रिलीज होत जुबिली हिट झाला. विशेष म्हणजे यशजींचा हा गीतविरहित चित्रपट आहे. राजेश खन्ना फाॅर्मात असल्याच्या काळातील हा चित्रपट आहे. कमाल अमरोही दिग्दर्शित ‘पाकिजा’ ( १९७२) मीनाकुमारीच्या अभिनयाने गाजला.
थिएटरवरचे भव्य डेकोरेशन चर्चेचा विषय होता. आणि चित्रपटातही भव्य सेट जणू व्यक्तिरेखेचा भाग होते. बोनी कपूर निर्मित आणि शेखर कपूर दिग्दर्शित ‘मिस्टर इंडिया’मध्ये ( १९८७) श्रीदेवी छा गयी. येथेच खणखणीत ज्युबिली हिट झाला. अतिशय भव्य मनोरंजक चित्रपट म्हणून ‘मिस्टर इंडिया’ कधीही आणि कितीही वेळा पाहिला तरी तो फ्रेश करतोच.
टीनू आनंद दिग्दर्शित ‘शहेनशहा’ (१९८८) या फिल्मविरोधात अतिशय तीव्र वातावरण असल्याने चक्क या थिएटरवर पोलीस बंदोबस्त होता हे आठवतेय. अमिताभसाठी हा अतिशय आव्हानात्मक काळ होता.
मुकुल आनंद दिग्दर्शित ‘अग्निपथ’ ( १९८९)च्या वेळी अमिताभला पहिला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आणि त्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली. या चित्रपटासाठी अमिताभला ‘खर्जातला आवाज’ देण्याचा मुकुल आनंदने केलेला प्रयोग रसिकांना आवडला नाही. प्रोजेक्शनमध्ये काही गडबड आहे असे वाटले. आठवडाभरातच त्याचे पुन्हा डबिंग करण्यात आले. मुळातच अमिताभ आपल्या आवाजानेही ओळखला जातो आणि त्यानेही तो एक प्रकारचा अभिनय करतो तरी उगाच वेगळा आवाज?
एव्हाना तुमच्या लक्षात आले असेलच की, यातील जवळपास सर्वच चित्रपटांची गाणी (अर्थात अपवाद ‘इतेफाक’) आजही लोकप्रिय आहेत.
चित्रपटाच्या जडणघडणीत आणि यशात श्रवणीय गाण्यांचा खूपच मोठा आणि महत्त्वाचा सहभाग असतोच ही तर आपल्या चित्रपटांची खास संस्कृती.
आणि आता डीडीएलजे २५ व्या वर्षात….एक महत्त्वाची गोष्ट आहे ही. जगात कधीही कोणत्याही भाषेतील चित्रपटाबाबत झाले नाही ते मनोरंजन हिंदी चित्रपटाबाबत झाले.
खरं तर या प्रत्येक चित्रपटावर लिहावे/बोलावे/सांगावे/ऐकावे /पहावे तेवढे थोडेच आहे. हा फक्त या थिएटरमधील ‘सुपर हिट’ दहा चित्रपटांचा फक्त आढावा आहे.
याच मराठा मंदिर थिएटरमध्ये ‘खेल खेल मे’ , ‘अपनापन’, ‘कर्मा ‘ वगैरे वगैरे चित्रपट ज्युबिली हिट ठरले तर ‘फरार’, ‘रझिया सुल्तान’, ‘पापी पेट का सवाल है’, ‘करिष्मा’ वगैरे वगैरे दणकून फ्लाॅपही ठरले. डीडीएलजेच्या निमित्ताने या थिएटरमध्ये सुपर हिट ठरलेल्या दहा चित्रपटांवर थोडक्यात ‘फोकस’ टाकला इतकेच..!