सेलिब्रिटी वेडिंग: कल और आज…
लग्नाचा आपला एक सिझन असतो (म्हणजे त्याचे मुहूर्त, रिसेप्शन) तरी सेलिब्रेटिजच्या लग्नाची गोष्ट बाराही महिने सुरुच असते. जरा कुठे एखाद्या अभिनेत्रीचे करियर रंगात येतेय तोच तिला फिल्मी मुलाखतीत प्रश्न केला जातो, तू लग्न कधी करतेयस??? मग लगेचच पुढचा प्रश्न असतोच, लग्नानंतर सिनेमात काम करणार ना???
असा प्रश्न कदाचित हॉलिवूडमध्ये केले जात नसतील. (तेथे दुसरं अथवा तिसरं लग्न कधी करतेयस??? असे प्रश्न विचारात असतील.) जगभरातील सर्वच फिल्मी मिडियाला ‘नटीचं लग्न’ हा सर्वाधिक वाचक/टीआरपी/लाईक्स मिळवून देणारा हॉट सब्जेक्ट वाटतोय म्हणून त्याचा पत्रकारीता अभ्यासक्रमात समावेश करायला हवा असे सांगण्याचा मोह मी सांगून आवरतो.
हे देखील वाचा: चिरतारुण्य म्हणजे अनिल कपूर – बॉलिवूडचा एकदम “झक्कास” अभिनेता!
उपयोगी पडणारे शिक्षण द्यायला काय हरकत आहे???) एका राजकीयपटाच्या प्रमोशनच्या मुलाखतीतही एका नटीला तिच्या राजकीय मतांपेक्षा ती लग्न कधी करणार हाच प्रश्न केला गेला आणि तिनेही छान हसत खेळत न लाजता उत्तर दिले (यात लाजण्यासारखे काही नसले, तरी पूर्वीच्या अभिनेत्री अशा प्रश्नाने बावरत, संकोचत हे मी अनुभवलयं. बाय द वे, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी असे हुकमी प्रश्न आणि उत्तरेही टाळता येत नाहीत.)
अभिनेत्रींच्या तुलनेत अभिनेत्यांना हा हुकमी प्रश्न क्वचितच केला जातो याचे कारण मला आजही सापडलेले नाही. पण लग्नाबाबत सर्वाधिक आश्चर्याचा धक्का दिला तो राजेश खन्नाने!(Rajesh Khanna) आणि आजही सोशल मिडियात त्याच्या लग्नाच्या वेळचे शूटिंग फूटेज, फोटो जास्त पाहिले जातात. आपली मैत्रीण अंजू महेंद्रूच्या घरावरुन त्याची वरात गेली हे एखाद्या मसालेदार मनोरंजक सिनेमासारखे दिसते. तर राजेश खन्ना आणि डिंपल यांना शुभेच्छा द्यायला लता मंगेशकर, राज कपूर आल्याचे फोटो आजही लाईव्ह वाटतात.
तेव्हाच्या वृत्तपत्रात या लग्नाच्या बातमीला फोटोसह ठळक स्थान मिळाले आणि एक नवीन ट्रेण्डही आला. अन्यथा हिंदी फिल्मवाल्याचे लग्न म्हणजे गॉसिप्स मॅगझिनसाठी कुरकुरीत, कलरफुल बातमी आणि मग भाषिक वृत्तपत्रात ती बातमी आली तरच येई. खरं तर, तेव्हा कलाकारांचा अभिनय, त्याची गुणवत्ता, सिनेमाचा दर्जा, त्याचे विषय, दिग्दर्शकाची शैली, गीत संगीत व नृत्याचा गोडवा यावर फोकस टाकण्याचे आणि जुन्या चित्रपटाच्या गोष्टी वारंवार सांगण्याचे ते युग होते. वाचकांनाही तेच हवेहवेसे वाटत होते. त्यांना पडद्यावरचा सिनेमा जास्त जवळचा होता. पण या जोडीला फिल्म स्टारच्या लग्नाच्या गोष्टी हळूहळू त्यांच्यासमोर येऊ लागल्या. तरीही या गोष्टी मुख्य प्रवाहात फार नसत.
तसाच मोठा तारा असेल तरच ती बातमी होई अन्यथा न्यूज एडिटर अशा बातम्यांवर रागाने पाहत हे मी श्रीदेवीने (Sridevi) निर्माता बोनी कपूरशी लग्न केले तेव्हा अनुभवले. हैद्राबादला राज कंवर दिग्दर्शित ‘जुदाई’चे शूटिंग सुरु असतानाच वृत्त संस्थेकडून या लग्नाची आलेली बातमी मी उत्साहाने करुन दिली, पण ‘असल्या फिल्मी बातम्या देण्याइतपत मराठी वृत्तपत्रांचा स्तर घसरलेला नाही’ असे मला ऐकवले गेलेले माझ्या मनावर कायमचे कोरले गेले.
हे वाचलंत का: टॅलेंट आणि ग्लॅमरच समीकरण म्हणजे सोनाली बेंद्रे…
पण काळ बदलत असतो, माध्यमे तर बदलत असतात आणि बदल होतच असतो. अर्थात, सेलिब्रेटिजच्या वलयानुसार बातमीचे मूल्य ठरते. माधुरी दीक्षितने अमेरिकेत डॉ. श्रीराम नेने यांच्याशी लग्न केल्याची हॉट न्यूज तिचा सेक्रेटरी रिक्कू राकेशनाथने फक्त आणि फक्त आज तक या वृत्त वाहिनीला दिली आणि तिचे फॅन्स, आम्ही फिल्म मिडिया, अख्खी मराठी व हिंदी फिल्म इंडस्ट्री असे सगळेच शॉक झाले. हा एक प्रकारचा सांस्कृतिक धक्काच होता हो. काही दिवसांनी मुंबईतील तिच्या या लग्नाच्या रिसेप्शनची चक्क चार कॉलम फोटोची बातमी सर्व मराठी वृत्तपत्रात पहिल्या पानावर आली तेव्हा मराठी रसिक मन म्हणाले, माधुरीचा नवरा दिसला हो….. ही एक छान उत्सुकता होती.
तोपर्यंत (म्हणजे १९९९ अखेर) खाजगी वृत्त वाहिन्या फार रुजल्या नव्हत्या. त्यामुळे या लग्नाचा इव्हेन्टस झाला नव्हता आणि जणू चोवीस तास लाईव्ह कव्हरेजची गरज नव्हती. तो ट्रेण्ड मेगा स्टारपुत्र अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि विश्वसुंदरी ऐश्वर्या रॉय (Aishwarya Rai) च्या लग्नापासून रुळला. तीन दिवस हा इव्हेन्ट जुहू परिसरात चालला आणि चॅनलचे कॅमेरे त्यावर रोखून धरले गेले होते. एव्हाना ग्लोबल युगातील रसिकांच्या अशा गोष्टींच्या पसंतीचा प्रश्न होताच. ते जगभरातील अनेक भाषांतील चित्रपट (सबटायटल्सने का होईना) पाहू लागले होते आणि हिंदी चित्रपटाच्या स्टारच्या लग्नाच्या गोष्टीत विशेष रस घेऊ लागले. बरं त्याना चित्रपटही बाजीराव मस्तानी, बाहुबली (पहिला, दुसरा), पद्मावत असे पडद्याचा कानाकोपरा व्यापून टाकतील असे भव्य हवेसे झाले. असेच हॉलिवूडचेही भव्य चित्रपट ते पाहू लागले. अशा भव्यतेत आशय हरवला अशा चिंतन आणि चिंता याकडे लक्ष देणे त्यांना महत्वाचे वाटत नाही.
या सगळ्या प्रवासात दुसरीकडे मग चित्रपटासह मालिका, म्युझिक अल्बम, वेबसिरिज यातील लहान मोठ्या सेलिब्रेटिजच्या लग्नाची बातमी कधी महत्वाची झाली हे समजलेच नाही. अशा खुसखुशीत बातम्या मिडियाची गरज आहे (चोवीस तास दाखवायचे तरी काय असा अधूनमधून प्रश्न असतोच, राजकीय बातम्या, चर्चा तरी किती दाखवणार???) की आजच्या ऑनलाईन पिढीची गरज आहे, या प्रश्नाचे उत्तर आपण का शोधा?
हे नक्की वाचा: चौकटी बाहेरचा राज… राज कपूर…
पण आज एखाद्या सेलिब्रेटिने सोशल मिडियात आपल्या केळवणाचा फोटो सोशल मिडियात पोस्ट केला रे केला की प्रिन्ट/चॅनल/डिजिटल यात त्याची बातमी होतेय असे सिध्दार्थ चांदेकर (Siddharth Chandekar) आणि मिताली मयेकर (Mitali Mayekar) जोडीच्या फोटोने दिसले. या दोघांचा फॅन फॉलोअर्स भरपूर आहे आणि केळवण आपली संस्कृती आहेच तेव्हा अशी बातमी होणे अगदी स्वाभाविक होतेच. महत्वाचे म्हणजे, त्यांनीच जर फोटो शेअर केला आहे, तर मग ती गोष्ट खाजगी गोष्ट राहत नाही.
अभिज्ञा भावेनेही (Abhidnya Bhave)आपल्या कुटुंबासह ग्रहमख सोहळा केल्याचे फोटो सोशल मिडियात पोस्ट केले तोच तीही पटकन बातमी झाली. असे घराघरात माहिती असलेल्या स्टारच्या कौटुंबिक गोष्टीत त्यांच्या फॅन्सना भारी रस असतो. अनेकदा तरी अशा बातमीकडे दुर्लक्ष करुन ‘तिची साडी किती छान होती’ याकडे जास्त लक्ष जाते, त्या साडीचीच जास्त चर्चा होते.
सोशल मिडियाच्या युगात अनेकदा तरी बातमी शोधणे/काढणे म्हणजे सेलिब्रेटिजच्या पोस्टवर नजर ठेवणे झाले आहे. पूर्वी त्यासाठी तसे कॉन्टॅक्ट निर्माण करावे लागत अथवा काही सेलिब्रेटिज इंग्रजी वृत्तपत्राच्या पेज थ्री सप्लीमेंटमध्ये तशी बातमी देत आणि मग ती वाचता वाचता सगळीकडे पोहचत असे. आता सगळे कसे एकदम सोपे आणि थेट झाले आहे.
मानसी नाईकने आपण लग्न करतोय हे स्वतः आपल्या भावी पतीसोबतचा फोटो शेअर करीत बातमी दिली. तात्पर्य, अशा पोस्टनी न्यूज कन्फर्म आहे का??? अशी जागरुक पत्रकाराच्या मनात वळवळणारा किन्तू शांत होतो. (अशी वृत्ती असणारा तोच खरा पत्रकार असे अगदी कालपर्यंत म्हटले जात होते. आता ते कालबाह्य होत चालला आहे.)
हे माहिती आहे का: नर्गीसची रेडिओवर मुलाखत घेताना सुनीलदत्त घाबरला होता!
नवीन वर्षात अनेक सेलिब्रेटिजची लग्ने आहेत, केळवणेही होतीलच, तर दोन वर्षांपूर्वी लग्न झालेल्या काही जणींच्या डोहाळ्याचे सोहळे होतील. तशीही एक छान बातमी होतीच. जे जे आपल्या कुटुंबात असते ते ते सेलिब्रेटिजच्या आयुष्यातही असतेच, ती देखील माणसेच हो आणि त्यांच्या केळवण, लग्न वगैरेच्या गोष्टीत रस असणारा खूप मोठा वर्ग आहे.
एरवी तशी बरीचशी थिएटर बंदच आहेत आणि जी सुरु आहेत त्यात जावेसे वाटत नाही. सगळी थिएटर्स सुरु झाली तरी बघण्यासारखे चित्रपट फारच थोडे असतात यात रसिकांचा दोष काय??? ओटीटी प्लॅटफॉर्मवर अर्थात तिसरा पडदा पध्दतीने चित्रपट पाहायचा म्हणजे आपणच आपल्याशी बोलायचे असते. फार पूर्वी सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या काळात एकदा का आपण सिनेमा पाहिला की त्यावर ‘सीन बाय सीन’ इतरांना कधी रंगवून खुलवून सांगतो असे व्हायचे. आता एक व्हाट्स अँप मेसेजही पुरा होतोय. अशा एकूणच स्थित्यंतरात सेलिब्रेटिजच्या लग्नाची गोष्ट अधिकाधिक महत्वाची होत चाललीय यात आश्चर्य ते काय??? हे तर स्वागतार्ह आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील टॉप फाईव्ह प्रचंड लोकप्रिय चित्रपटातील ‘हम आपके है कौन’ (१९९४) (Hum Aapke Hain Koun) या चित्रपटात तर लग्न सोहळाच तर आहे आणि जनसामान्य कुटुंबात मुलगा अथवा मुलगी वयात आल्यावर एखाद्या गोष्टीवरुन रुसली की तिचे पालक सवयीने आणि वारंवार बोलतात, एकदा तुझे लग्न झाले ना की कळेल हं तुला…. एकूणच सामाजिक, सांस्कृतिक स्थितीचा विचार करता सेलिब्रेटिजच्या लग्न आणि त्याच्या इतर गोष्टी यांना वाढती न्यूज व्हॅल्यू नक्कीच आहे. ते नाकारणे म्हणजे, तुम्ही अजूनही ब्लॅक अँड व्हाईट सिनेमाच्या काळातील अथवा छायागीतच्या आठवणीवरच जगणारे आहात असा भरभक्कम पुरावा देणारे आहात असा त्याचा अर्थ होतो. आता तुम्हीच ठरवा,
अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांच्या लग्नाच्या फोटोत रमायचे की आजच्या अभिनेत्यांच्या रिलेशनशिप मधील गोष्टी जाणून घ्यायच्या. अक्षयकुमारने ट्वींकल खन्नाशी लग्न केल्याने जसा धक्का बसला तो पंच गेला. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्न गाठीतही सिक्रेट राहिलेले नाही. फक्त ते लग्नासाठी स्पॉट आणि दिवस कोणता निवडताहेत त्यानुसार लाईव्ह कव्हरेजची तयारी करायला….