‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
मुंबईतील डबल डेकर बस आणि सिनेमा
मुंबईतील बेस्ट बसचा प्रवास हा अनेक पिढ्यांना सुखावणारा आणि अनेकांच्या आपल्या काही विशेष आठवणी असणारा. याला चित्रपट अपवाद कसा असेल ? या मुंबईतच चित्रपटसृष्टी रुजली. जगभरात भारतीय चित्रपट म्हटलं की, मुंबईतील चित्रपटसृष्टीचा उल्लेख होतो, त्यामुळे मुंबईतील अनेक गोष्टींचे प्रतिबिंब चित्रपटात पडणे अगदी स्वाभाविक. अगदी डबल डेकर बसचेही. तिचं आपलं एक व्यक्तीमत्व होते (आणि कधीही या डबल डेकर बसची आठवण येईल तेव्हा ती बस पटकन डोळ्यासमोर येईलच.) आता ती बंद करण्यात आल्याचे वृत्त तुम्हालाही माहितीये. चित्रपटांतूनही ही डबल डेकर बस दिसलीय.(Double Decker Bus)
पटकन आठवते ती, जी. पी. सिप्पी निर्मित व रमेश सिप्पी दिग्दर्शित ‘शान’ (१९८०) मधील जानू मेरी जान मै तुझपे कुर्बान या गाण्यातील डबल डेकर बस. शशी कपूर, अमिताभ बच्चन, परवीन बाबी आणि बिंदीया गोस्वामी यांनी हे गाणे रुपेरी पडद्यावर साकारलय. या गाण्यात डबल डेकर बसचा चांगलाच सदुपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे त्या बससह हे गाणे आठवतेय.(Double Decker Bus)
प्रमोद चक्रवर्ती दिग्दर्शित ‘नास्तिक’ (१९८३) या चित्रपटात आज का यह दिन. हे अमिताभ बच्चनवरचे गाणे पॅसेंजर ट्रेनमध्ये सुरु होते आणि गाण्याच्या शेवटच्या भागात डबल डेकर बसमध्ये अमिताभ ते साकारतो. त्याचे मरीन ड्राईव्हवर शूटिंग झाल्याचे लक्षात येते. तसं पाहिलं तर मरीन ड्राईव्हवर चित्रित झालेल्या गाण्यात एखादी डबल डेकर बस आजूबाजूला दिसते. मग ते ‘चक्के पे चक्का’ (ब्रह्मचारी) असो अथवा ‘वो मुकद्दर का सिकंदर जानेमन कहलाये गा ( मुकद्दर का सिकंदर) असो. (Double Decker Bus)
दिग्दर्शक बासू चटर्जी यांनी कायमच मुंबईतील एखाद्या थीमनुसार चित्रपट रसिकांसमोर आणले. त्यामुळे त्यांच्या चित्रपटात याच बेस्ट बसचा स्टाॅप (छोटीसी बात) अथवा डबल डेकर बसचा प्रसंग (बातों बातों मे) असं काही हमखास दिसे. ‘छोटीसी बात ‘मध्ये बुजरा मध्यमवर्गीय नायक (अमोल पालेकर) या बसस्टॉपवरच नायिकेकडे ( विद्या सिन्हा) मन मोकळे करण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात त्यांचा परिचित (असरानी) तडमडतो आणि नायिकेला स्कूटरवरुन लिफ्ट देतो आणि नायक उदास होऊन आता स्टाॅपवर आलेल्या बेस्ट बसमध्ये चढायलाही विसरतो. जे. पी. दत्ता दिग्दर्शित ‘हत्यार’, मुकुल आनंद दिग्दर्शित ‘खून का कर्ज’ अशा अनेक चित्रपटांत या डबल डेकर बसचं दर्शन घडलयं. (Double Decker Bus)
राज कपूर आपल्या प्रत्येक चित्रपटाच्या पूर्वप्रसिध्दीत विशेष ‘फोकस’ ठेवणारा सिनेमावाला म्हणून कायमच ओळखला गेला. प्रेक्षकांपर्यंत आपला चित्रपट पोहचवण्यात त्याच्यातील ‘निर्माता’ विशेष जागरुक असे. ‘मेरा नाम जोकर’च्या (१९७०) वेळेस मुंबईतील याच एका डबल डेकर बसला पूर्णपणे ‘जोकर’ मय करुन नवीन ट्रेंड आणला. आता ही प्रवासी बस मुंबईत काही भागात फिरत असतानाच चित्रपटाची प्रसिद्धीही फिरत राहिली. सत्तर ऐंशीच्या दशकात याच डबल डेकर बसच्या मागील बाजूस नवीन चित्रपटाची जाहिरात पाहायला मिळे. अशा अनेक डबल डेकर बस मुंबईभर फिरत असताना तो चित्रपटही माहित होत गेला. कधी एकादी बस एकाद्या चित्रपटाच्या जाहिरातीने पूर्णपणे रंगवलेली दिसे.
==========
हे देखील वाचा : चित्रपटसृष्टीतील आठवणीतला श्रीगणेशोत्सव…
==========
फार पूर्वी गिरगाव, गावदेवी, गिरणगावात राहणाऱ्या मराठी कलाकारांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात या डबल डेकर बसने प्रवास केला आहे. त्या काळात अनेक कलाकार मध्यमवर्गातून येत आणि बेस्ट बस, लोकल ट्रेन, एस. टी. बस यातून ‘सामान्य नागरिकांप्रमाणेच ‘ प्रवास करत. चेहर्याला थोडी ओळख मिळायला लागल्यावर सहप्रवासी मात्र त्याच्याकडे ‘हा कलाकार डबल डेकर बसमधून प्रवास करतोय म्हणजे आश्चर्य आहे’ अशा नजरेने पाहत आणि मग आता आपण सेकंड हँड का असेना पण गाडी घ्यायला हवी असे अनेकांना वाटू लागे. असे काही किस्से प्रसिद्ध आहेत. (Double Decker Bus)
पूर्वी अंधेरी पूर्वेकडील कमालीस्तान स्टुडिओला जाण्यासाठी अंधेरीच्या पूर्वेकडील स्टेशनबाहेरुन ३३३ नंबरची महाकाली येथे जाणारी डबल डेकर बस पकडावी लागे. मी कमालीस्तान स्टुडिओत असाच जा ये करे. ही बस बहुतेक डबल डेकरच असे आणि त्यातूनच नवीन कलाकार, ज्युनियर आर्टिस्ट, डान्सर, मेकअपमन, हेअर ड्रेसर वगैरे अनेक जण याच बसने ये जा करत. डबल डेकर बसचे चित्रपटसृष्टीशी नाते हे असे विविध प्रकारे जमले. आता ही डबल डेकर बस थांबली असून आता वातानुकूलित डबल डेकर बस येताहेत. त्याचही चित्रपटसृष्टीशी नाते नक्कीच जमेल. मुंबईतील थीमवरील चित्रपटातही ती दिसेल आणि मुंबईतील अनेक लहान मोठ्या स्टुडिओत जाण्या येण्यासाठीही नक्कीच जमेल…