‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
ऐ मेरे दिले नादान तू गम से न घबराना…
तीसच्या दशकाच्या अखेरीस मध्य पूर्वेच्या अफगाणिस्तानातील यादवीमध्ये या अभिनेत्रीच्या आजी आजोबांची आणि आईची हत्या झाली. लहानग्या चार वर्षाच्या या मुलीला घेऊन तिचे वडील आणि आत्या अफगाणिस्तान सोडून जीव मुठीत घेवून भारतात आश्रयासाठी आले. खरं तर हि मुलगी राजघराण्यातील होती. तिथल्या राजघराण्यातील ही राजकन्या. पण आपलं सर्व वैभव विसरून भारतात राहू लागले आणि लवकरच ती भारतीय सिनेमाची आघाडीची अभिनेत्री बनली ! कोण होती ही अभिनेत्री? (Shakila)
प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाच तिने चित्र संन्यास का घेतला ? काय होती तिची सक्सेस स्टोरी? हि अभिनेत्री होती शकीला (Shakila)! अफगाणिस्तानच्या राजघराण्यात तिचा जन्म झाला. तिचे पूर्वज पर्शिया आणि अफगाणमधील खानदानी राजघराण्यातील होते. पण ती अवघी चार वर्षाची असताना अफगाणिस्तानात मोठी यादवी झाली आणि या कुटुंबाला परगांदा होत पळून यावं लागलं. आजच्या पिढीला हे नाव आठवण्याची सुतराम शक्यता नाही. पण तिच्यावर चित्रित झालेली गाणी तुम्ही नक्कीच पहिली असणार. ‘बाबूजी धीरे चलना प्यार में जरा संभालना, आंखो ही आंखो मे इशारा हो गया बैठे बैठे जीने का सहारा हो गया…. हि गाणी जेव्हा रसिक युट्युब किंवा टीव्हीवर बघता तेव्हा तिच्या आरस्पानी सौंदर्याने आज देखील घायाळ होतात तिचं सौंदर्य हे बेमिसाल होतं.
तिचं आखीव रेखीव शरीर आणि टिपिकल अरबी सौंदर्याने तिला ‘अरेबियन ब्यूटी’ म्हणून ओळखायचे. शकीलाच्या (Shakila) आत्याचे चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक मेहबूब आणि ए आर कारदार यांचे चांगले संबंध होते. तिला बालकलाकार म्हणून ए आर कारदार यांच्या ‘दास्तान’ (१९५०) या चित्रपटात घेतले. तिचं खरं नाव बादशहा जान पण कारदार यानीच तिचे फिल्मी बारसे केले आणि शकीला हे छोटे आणि सुटसुटीत नाव दिले. त्यानंतर पुढचे तीन-चार वर्ष बाल कलाकार म्हणून तिने काम केले.
गुमास्ता, खूबसूरत, राजरानी दमयंती, सलोनी, सिंदबाद द सेलर, आगोश आणि अरमान हे महत्वाचे सिनेमे. यात सोहराब मोदी यांच्या ‘झांसी कि रानी’ (१९५३)चा समावेश होतो. 1953 साली तिचा नायिका म्हणून पहिला चित्रपट आला ‘मदमस्त’. पण तिला खरा ब्रेक मिळाला गुरुदत्त यांच्या ‘आरपार’ या चित्रपटापासून. या चित्रपटातील तिने एका कॅबरे डान्सरचा भन्नाट रोल केला होता. यातील गाणी ओ पी नय्यर यांची होती. शकीला वर चित्रित ‘बाबूजी धीरे चलना…’ या गाण्याने कहर लोकप्रियता मिळवली. या पाठोपाठ आलेल्या ‘सीआयडी’ या चित्रपटात तिचा नायक देव आनंद होता. ‘आंखो ही आंखो मे इशारा हो गया…’ हे गाणं त्या काळात खूप गाजले.
याच काळात तिला होमी वाडिया यांचा ‘अलीबाबा और चालीस चोर’ हा सिनेमा ऑफर झाला. शकीलाच्या (Shakila) आत्याला हा सिनेमा तिने करू नये असे वाटत होते. कारण तो एक fantacy cinema होता. त्यामुळे आत्याने या सिनेमाचे मानधन तब्बल १०००० रुपये सांगितले. तिला वाटले एवढे डिमांड केले तर तिच्या ऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीचा विचार होईल पण वाडिया यांनी ते मान्य केले. या चित्रपटात शकीला चमकली हा चित्रपट सुपरहिट झाला. त्यानंतर अशाच fantacy, धार्मिक, पोशाखी, जादूई सिनेमाची रांग लागली. या असल्या बी ग्रेड सिनेमांना लोकप्रियता खूप मिळायची पण आघाडीच्या अभिनेत्यासोबत सिनेमे मिळाल्याचे नाहीत. या काळात शकीलाने असले चिक्कार सिनेमे केले.
गुल बहार, हल्लागुल्ला, लाल परी, हातीं ताई, अल हिलाल, परीस्तान, नूरमहल, मस्त कलंदर, पैसा हि पैसा…..या सिनेमात तिचे नायक असायचे कधी महिपाल, कधी जयराज तर कधी अजित. या काळात तिला सामाजिक सिनेमे फार कमी मिळाले. राज कपूरसोबतच ‘श्रीमान सत्यवादी’ मनोज कुमारसोबतच ‘रेशमी रुमाल’, सुनील दत्त सोबतच ‘पोस्ट बॉक्स नं. ९९९’ , शम्मी कपूर सोबतचा ‘चायना टाऊन’ आणि प्रदीप कुमार सोबतचा ‘उस्तादो के उस्ताद… किशोर कुमार सोबतचा ‘बेगुनाह’ चांगला होता पण या सिनेमावर भारतात बंदी आणली. तिच्यावर चित्रित गाणी आज देखील लोकप्रिय आहेत. ओ नींद न मुझको आये (पो.बॉ.९९९), ऐ मेरे दिले नादान तू गम से न घबराना (टॉवर हाउस), जुल्प्हो कि घटा लेकर सावन कि परी आयी (रेशमी रुमाल),लागी छुटे ना अब तो सनम (काली टोपी लाल रुमाल) हूं अभी मै जवान (आरपार), दिल को लाख संभाला जी (गेस्ट हाउस) दगा दगा वै वै (काली टोपी लाल रुमाल)
==========
हे देखील वाचा : मुकेशने गायलेले गाणे पुन्हा रफीच्या आवाजात रेकॉर्ड केले!
==========
१९६३ साली शकीलाचे (Shakila) करीयर एकदम पिक वर गेले होते पण तिने वाय एम इलियास या अफगाणिस्तानच्या भारतातील राजदूत यांच्या सोबत लग्न केले आणि तिने हिंदी सिनेमाला अलविदा केले. यानंतर पुढची पंचवीस तीस वर्ष ती जर्मनी अमेरिका येथे होती. नव्वदच्या दशकात ती पुन्हा भारतात आली. पण मिडीयापासून ती लांबच होती. तिच्या मुलीने आत्महत्या केल्यानंतर मात्र ती पुन्हा चर्चेत आली होती. तिच्या धाकट्या बहिणीने नूरने जॉनी वॉकर यांच्यासोबत लग्न केले होते. शकीलाने आपल्या १४ वर्षाच्या रुपेरी जीवनात ७० हून अधिक सिनेमात भूमिका केल्या. आयुष्याच्या उत्तरार्धात अभिनेत्री नंदा, श्यामा, जबीन, वहिदा सोबत तिची चांगली मैत्री होती.
वयाच्या ८२ व्या वर्षी २० सप्टेबर २०१७ रोजी शकीलाचे निधन झाले!