Kishore Kumar शत्रुघ्न सिन्हावर चित्रित किशोर कुमारने गायलेलं पहिले गाणे
Chandan Cinema : चंदन चित्रपटगृह पडद्याआड
एखाद्या चित्रपटात घडावी वा शोभावी अशीच गोष्ट
प्रत्येक शुक्रवारी प्रदर्शित होत असलेला नवीन चित्रपट फर्स्ट डे फर्स्ट शोला पाहत असलेल्या एका विवाहीत स्त्रीला एका शुक्रवारी नवीन चित्रपटाची तिकीटेच न मिळाल्याने ती निराश होऊन घरी आल्याचे पाहताच त्या स्त्रीच्या विविध व्यवसायात यशस्वी वाटचाल करीत असलेल्या पतीने निर्णय घेतला आपल्या मालकीचे एक चित्रपटगृह असावे. त्यांनी निर्णय घेतला, आपल्या सहकाऱ्यांशी यावर अधिक चर्चा केली आणि जुहू परिसरात स्वतःच्या मालकीचे चित्रपटगृह उभारले, त्याचे नाव चंदन (Chandan Cinema).
जुहू परिसरातील गुलमोहर सोसायटी, जेव्हीपीडी, आयरीश पार्क, जुहू समुद्र किनारा, इर्ला, अंधेरी पश्चिमेकडील डी. एन. नगर या परिसरातील चित्रपट रसिकांसाठीचे चंदन (Chandan Cinema) हे हुकमी व हक्काचे चित्रपटगृह आता कायमचेच पडद्याआड जात आहे. व्यावसायिक बैजनाथ जोशी यांच्या पत्नी चंद्रकांता यांना नवीन चित्रपट पहिल्याच दिवशी पाहण्याची आवड होती. पण एके दिवशी ते शक्य न झाल्याने बैजनाथ जोशी यांनी आपल्या पत्नीच्या नावावरुन या चित्रपटगृहाचे नाव चंदन असे ठेवले. या चंदन चित्रपटगृहाचे राज कपूरच्या शुभ हस्ते अतिशय थाटात उदघाटन झाले आणि पहिलाच चित्रपट होता, “Bobby” (२८ सप्टेंबर १९७३). राज कपूरचा धाडसी तरुण प्रेमपट. आजही त्याची गाणी लोकप्रिय आहेत. (untold stories)
त्या काळातील जुहू अतिशय शांत, बर्यापैकी निर्मनुष्य, अनेक फिल्मवाल्यांचे प्रशस्त बंगले असणारे (मनोजकुमार, धर्मेंद्र मग Amitabh Bachchan, शत्रुघ्न सिन्हा तर झालेच पण दिग्दर्शक यश चोप्रा, मोहनकुमार, अमोल पालेकर यांचाही याच परिसरात प्रशस्त बंगला. कालांतराने रणजीतचाही बंगला), शूटिंगसाठीचे अरुणोदय, गिरी कुंज वगैरे बंगले, उच्चभ्रूंची निवासस्थाने आणि मोठाच समुद्र किनारा यासाठी ओळखला जाई. चंदन चित्रपटगृहाच्या (Chandan Cinema) जवळच आयरीश पार्क येथे Dev anand चा बंगला. या परिसरातील हे तसे पहिलेच चित्रपटगृह. तसे लिडो चित्रपटगृह जुहूचेच म्हणून ओळखले जाई (आता त्याचे नूतनीकरण करण्यात येवून तीन छोटे स्क्रीन आता आहेत) पण ते सांताक्रूझ पश्चिमेकडे आहे.
चंदन चित्रपटगृह अनेक वैशिष्ट्यपूर्ण. या चित्रपटागृहासमोरच ॲक्शन दिग्दर्शक वीरु देवगन यांचे कार्यालय. ‘फूल और कांटे‘च्या निमित्ताने अजय देवगणच्या मुलाखतीसाठी मी येथेच भेटलो. या परिसरात राहत असल्यानेच राकेश रोशन, आदित्य चोप्रा अशा अनेकांनी चंदन चित्रपटगृहात (Chandan Cinema) अनेक चित्रपट पाहिले. आदित्य चोप्रा येथील फर्स्ट डे फर्स्ट शोचा हुकमी रसिक. अभिषेक बच्चन, गोल्डी बहेल हे लहानपणापासूनचे मित्र. त्यांनाही मोठे होत असताना चंदन आपलेसे केले.
या परिसरात पंजाबी, उत्तर भारतीयांची संख्या बरीच. त्यामुळे धर्मेंद्र, सनी देओल यांची भूमिका असलेल्या चित्रपटांचे येथे जोरदार धमाकेदार स्वागत. गदर एक प्रेमकथा येथे हाऊसफुल्ल गर्दीत टाळ्या आणि भरपूर शिट्ट्यांनी एन्जाॅय केला जात असतानाच हेमा मालिनी व इशा देओलही चंदनला गेल्या असता सनी देओलच्या एन्ट्री, डायलॉगबाजी, जोरदार ॲक्शनला इशा देओलने अतिशय उत्फूर्तपणे दिलेल्या प्रतिसादाची चक्क बातमी झाली.
==============
हे देखील वाचा : Yearend movies : यामुळे वर्षअखेरीस चित्रपट केले जातात प्रदर्शित !
==============
एन. चंद्रा दिग्दर्शित ‘तेजाब‘ (Tezaab) ( दिवाळी १९८८) मुंबईत प्रदर्शित होत असतानाच Madhuri Dixit अमेरिकेत बहिणीकडे होती. तेथून परतेपर्यंत “पिक्चर सुपर हिट“. चंदनमध्ये आपल्या आई वडीलांसोबत तेजाब पहायला येताना माधुरीने आपल्याला पब्लिकने ओळखू नये याची विशेष काळजी घेतली. चित्रपट सुरु झाला आणि काही वेळानंतर पडद्यावर माधुरीची मेहनती नृत्य अदा असलेले एक दो तीन चार पाच… गाणे सुरु होताच पब्लिकने टाळ्या नि शिट्ट्यांनी असे काही थिएटर डोक्यावर घेतले की आजही आपल्या अनेक मुलाखतीत माधुरी दीक्षित आपला हा अनुभव रंगवून खुलवून आवर्जून सांगते. (Updates)
अनेक कलाकारांच्या चंदन चित्रपटगृहाशी (Chandan Cinema) निगडित खास आठवणी आहेत. नागेश भोसले आपला पहिला चित्रपट Amol Palekar दिग्दर्शित ‘बनगरवाडी‘ (१९९५) याच चंदन चित्रपटगृहात सकाळच्या साडेअकरा वाजताच्या खेळास प्रदर्शित झाला असता आवर्जून पहायला गेला तेव्हा संपूर्ण चित्रपटगृहात मोजून पाच सात चित्रपट रसिक होते. ही आठवण त्यानेच सांगितली. सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये हाऊसफुल्ल गर्दीत चित्रपट एन्जाॅय करायची सवय व हौस असतानाच अशा जवळपास रिकाम्या चित्रपटगृहात आपलाच चित्रपट पहायला? हादेखील एक वेगळाच अनुभव समजून नागेश भोसलेने तो लक्षात ठेवला. (विशेष उल्लेखनीय गोष्ट अमोल पालेकर यांचा चिरेबंदी बंगला याच चंदन चित्रपटगृहापासून अवघ्या पाच मिनिटांवर. आता ते पुणे शहरात राहतात. )
चंदन चित्रपटगृहात (Chandan Cinema) प्रदर्शित झालेले सत्तरच्या दशकातील काही चित्रपट सांगायचे तर, रोटी कपडा और मकान, शोले, प्रतिज्ञा, प्रेम कहानी, दोस्त, दफा 302, दुनिया का मेला, शैतान, प्रेम नगर, धरम करम, संन्याशी, सेवक, हत्यारा, परवरीश इत्यादी. त्यानंतरच्या काळात शक्ती, मेरा शिकार, बिवी नंबर वन, अमावस, ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर, प्यार तुने क्या किया इत्यादी अनेक. Hum Aapke Hain Koun मुंबईत फक्त आणि फक्त एकमेव लिबर्टी चित्रपटगृहात प्रदर्शित करण्यात राजश्री प्राॅडक्सन्सचे व्यावसायिक डावपेच होते. ते यशस्वी ठरल्यावर काही आठवड्यानंतर इतरही चित्रपटगृहात तो प्रदर्शित केला. त्यात चंदन चित्रपटगृहाचाही समावेश होताच.
ते करताना चंदन चित्रपटगृहाची छान रंगरंगोटी करण्यात आली. त्याला नवीन तजेलदार रुप देण्यात आले. या चित्रपटाचा आनंद घेण्यासाठी मोठ्याच प्रमाणावर सहकुटुंब सहपरीवार चित्रपट रसिक येत असल्याने त्यांना आपलेसे वाटेल असे रुपडं चंदनला दिले. शेखर कपूर दिग्दर्शित बॅन्डिक्ट क्वीन चंदनला प्रदर्शित झाला असतानाच महिला प्रेक्षकांसाठी खास खेळांचे आयोजन करण्यात आले. संजय लीला भन्साली (Sanjay Leela Bhansali) दिग्दर्शित हम दिल दे चुके सनम येथे प्रदर्शित करण्यासाठी अगोदरचा चित्रपट उतरवण्यात आल्याची बरीच चर्चा रंगली.
==============
हे देखील वाचा : Jaanwar Movie : ‘या’ चित्रपटाला पंचवीस वर्ष पूर्ण.
==============
येथे सतत नवीन चित्रपटच प्रदर्शित होत. काही चित्रपट एक दोन आठवडे तर काही पाच सहा आठवड्यापर्यंत मुक्काम करीत. मूळ १२६५ अशी आसन क्षमता असलेले हे चित्रपटगृह काही वर्षातच ११०७ अशा आसन क्षमतेचे झाले. आणि रुजले. एवढ्या हाऊसफुल्ल गर्दीत एन्जाॅय करतानाचा अनुभव काही वेगळाच. समीर जोशी यांनी अनेक वर्ष चंदन चित्रपटगृहाचे (Chandan Cinema) व्यवस्थापन पाहिले. मूळ मालकांची ही पुढची पिढी.
नवीन शतकात देशात मल्टीप्लेक्स युग आले. ते हळूहळू फोफावत गेले. अंधेरी, ओशिवरा परिसरात तीन मल्टीप्लेक्स उभी राहिली. अशातच चंदनच्या अगदी शेजारीच पाच स्क्रीनचे मल्टीप्लेक्स आले. नवीन चित्रपटांचे टीझर व ट्रेलर लाॅन्च, प्रीमियर, काही चित्रपट महोत्सव अशा अनेक कलरफुल गोष्टी तेथे विलक्षण रुजल्या. लहान मोठे स्टार त्यासाठी सतत येथे आले.
या झगमगाटात चंदन (Chandan Cinema) दुर्लक्षित होत गेले. तेथील गर्दीला ओहोटी लागली. ते शांत शांत सुस्त दिसू लागले. हा बदलत्या काळाचा परिणाम होता.आणि अशातच मे २०१९ ला तेथे चित्रपट प्रदर्शित होणेच थांबले. मुंबईसह देशभरातील अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एकपडदा चित्रपटगृहे अशीच एकेक करत करत बंद झाली, काहींच्या जागी माॅल आले नि त्यात दोन तीन स्क्रीन आले.
चंदनची निस्तेज इमारत पाहताना मला कसेसेच व्हायचे. ते मनात ठेवूनच शेजारच्या मल्टीप्लेक्सच्या लिफ्टकडे जावू लागलो. अखेर २०२४ च्या वर्षअखेरीस बातमी आली, चंदन चित्रपटगृहावर हातोडा पडला.
==============
हे देखील वाचा : लांबलचक चित्रपट “पैसा वसूल” की ‘टाईम फूकट’ची खात्री?
==============
मल्टीप्लेक्स, ओटीटी युगात अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स पडद्याआड झाली. त्यात हे एक. खुद्द फिल्मवाल्यांच्या वस्तीत चंदन चित्रपटगृह (Chandan Cinema) होते. तेथील नवीन चकाचक इमारतीत सत्तर सीटसचे थिएटर सुरु होणार असे सांगण्यात येते. तरी मूळ चंदन चित्रपटगृहात कायमच डोळ्यासमोर राहिल, आठवणीत राहिल. चंदन चित्रपटगृहाला स्वतःचे व्यक्तिमत्व होते ते कायमच आठवणीत राहिल. एकपडदा चित्रपटगृहांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य, प्रत्येक चित्रपटगृह दुसर्यापेक्षा वेगळे. जी काही असेल ती स्वतःची ओळख असलेले. म्हणूनच तर ती काळाच्या पडद्याआड जावूनही अनेक चित्रपट रसिकांच्या कायमच आठवणीत आहेत. चंदन चित्रपटगृहही अगदी तसेच.