
ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित Amitabh-Jaya Bachchan यांचा हा सिनेमा अर्धवट का राहिला?
‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमांच्या बाराव्या सिझन मध्ये अमिताभ बच्चन यांनी एका अलाहाबादून आलेल्या स्पर्धक मुलीला एक प्रश्न विचारला होता. लेखक धर्मवीर भारती यांच्या कोणत्या कलाकृतीवर एक था चंदर एक थी सुधा ही टीव्ही सिरीयल बनवली गेली? तिला याचे उत्तर आले नाही पण याचे उत्तर होते ‘गुनाहो का देवता’. १९४९ साली भारती यांनी लिहिलेल्या या कादंबरीला देशभर प्रचंड लोकप्रियता लाभली होती. धर्मवीर भारती नंतर धर्मयुग या टाइम्स ग्रुपच्या साप्ताहिकेचे संपादक बनले. या ‘कौन बनेगा करोडपती’ एपिसोड मध्ये अमिताभ बच्चन यांनी सांगितले की ,” याच नावाचा एक चित्रपट देखील सत्तर च्या दशकात तयार होत होता ज्यात मी आणि जया भादुरी एकत्र काम करत होतो परंतु हा चित्रपट पूर्ण झाला नाही!”.

अमिताभ बच्चन यांनी मध्यंतरी त्यांच्या ब्लॉगमध्ये देखील या चित्रपटाबद्दल लिहिले होते. या चित्रपटाची कथा त्यांना प्रचंड आवडली होती. अमिताभ बच्चन यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांचे तर धर्मवीर भारतीय खास मित्र होते. त्यांना देखील हे कथानक खूप आवडले होते. त्यांनीच अमिताभला हा चित्रपट करायला सांगितले होते. पण दुर्दैवाने हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. अमिताभला हा सिनेमा अपूर्ण राहिल्याची खंत त्याने व्यक्त केली होती. हा सिनेमा निम्म्याहून अधिक तयार होऊन अर्धवट का राहिला ? या चित्रपटात आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली होती. कोणती होती ती गोष्ट आणि काय होता नेमका किस्सा?

अमिताभ बच्चन १९६९ सालापासून हिंदी सिनेमाच्या दुनियेत आले ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून सुरुवातीला ओळीने अर्धा डझन सिनेमे फ्लॉप झाल्यावर (आनंदचा अपवाद वगळता) हरिवंशराय बच्चन यांच्या असे लक्षात आले की आपला मुलगा अभिनय तर चांगला करतोय पण त्याला सशक्त कथानक असलेले सिनेमे मिळत नाहीत. या काळात अमिताभ अनेक नायिकांसोबत काम करत होता पण कोणत्याच चित्रपटाला यश मिळत नव्हते. त्यावेळी बच्चन यांनी अमिताभला ‘गुनाहो का देवता’ या कादंबरीवरील चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिला. कारण हि कादंबरी सशक्त कथा असलेली तर होती शिवाय मागच्या वीस बावीस वर्षे साहित्य वर्तुळात खूप गाजत होती.
================================
हे देखील वाचा: Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?
=================================
या चित्रपटाचे कथानक खूप वेगळे होते. या सिनेमाचा संपूर्ण प्लॉट हा अलाहाबाद या शहरातला होता. एका तरुणाचे आपल्या प्राध्यापकाच्या मुलीवर प्रेम असते. हे प्राध्यापक त्याला पित्यासमान असतात. त्यांच्या उपकाराची त्याला जान असते. परंतु त्यांच्या निधनानंतर कर्तव्य म्हणून त्या मुलीचे लग्न तो स्वत: दुसऱ्या मुलासोबत लावून देतो. भावनेच्या भरात घेतलेल्या निर्णयाने दोघांची भावस्वप्ने उध्वस्त होतात. तिकडे तो तरुण सैरभैर होतो लग्न झाल्यानंतर ती मुलगी देखील आनंदात राहत नाही आणि तिचा देखील मृत्यू होतो. अशी ही ट्रॅजिक कथा होती. या कथानकाला पडद्यावर आणायला दिग्दर्शक घाबरत होते कारण अशा दुःखी चित्रपटांना भले पारितोषिक मिळतील पण व्यावसायिक यश मिळणार नाही याची त्यांना खात्री होती! पण अशा या अवस्थेत ऋषिकेश मुखर्जी या चित्रपटाचे दिग्दर्शन करायला तयार झाले . त्यांनी धर्मवीर भारतीय सोबत या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार केली.

धर्मवीर भारती आपल्या कथानका बाबत प्रचंड आग्रही होते त्यांना त्यात अजिबात त्यात बदल नको होता. या सिनेमाचे शूटिंग अलाहाबाद मध्ये सुरू झाले. चाळीसच्या दशकाचा प्लॉट होता. सायकलवर अमिताभ जातो आहे असा मुहूर्ताचा शॉट घेण्यात आला. सिनेमात कमर्शियल आस्पेक्ट वाढविण्यासाठी त्यात काही बदल करा असा फायनान्सरचा आग्रह होता. भारती याला अजिबात तयार नव्हते. आता वितरक देखील दबाव टाकू लागले. कारण सिनेमाचा ट्रेंड बदलला होता. हे असले सिनेमे अवार्ड मिळवतील पण पैसा मिळवून देणार नाहो याची त्यांना खात्री पटली. त्यांचा सिनेमातील इंटरेस्ट कमी झाला. अमिताभ देखील आता अलाहाबाद सोडून ‘जंजीर’च्या शूटसाठी मुंबईत आला. हळू हळू सर्वांची आस्था या सिनेमाबाबत कमी होऊ लागली आणि हा सिनेमा बंद पडला.
================================
=================================
या चित्रपटात आणखी एक पात्र पप्पी नावाचे होते जी भूमिका रेखाला देण्यात येणार होती. म्हणजे अमिताभ जया रेखा हा भविष्यात तयार झालेला ट्रँगल या चित्रपटात पहिल्यांदा दिसणार होता. परंतु कथानकात बदल करण्यासाठी लेखक अनुकूल नसल्याने सिनेमाची शूट थांबले आणि सिनेमा डब्यात गेला. याच काळात अमिताभ बच्चन यांचा जंजीर हा चित्रपट सुपरहिट झाला आणि त्याची इमेज बदलली. यानंतर मात्र ऋषिकेश मुखर्जी यांनी या चित्रपटाचा नाद सोडून दिला कारण आता अमिताभ बच्चन यांना अशा दुःखी भूमिकेत प्रेक्षक स्वीकारणार नाहीत याची त्यांना खात्री होती. अमिताभ बच्चन यांना मात्र हे कथानक आणि भूमिका खूप आवडले होते.