‘दो राहा’ पोस्टरवरचा ‘A’ ठरला चक्क गर्दीचा…
चित्रपटसृष्टीच्या चौफेर वाटचालीतील अनेक छोट्या छोट्या गोष्टीत बरीच रंगत आहे. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, सत्तरच्या दशकात रस्तोरस्ती वीजेच्या खांबावर लागलेली पोस्टर्स आणि मोक्याच्या चौकांवरची ‘फक्त प्रौढांसाठी’ असे प्रमाणपत्र असलेली होर्डींग्स आपल्या पाल्यांनी पाहू नयेत असे पालकांना मनोमन वाटे (आजसाठी ओलांडलेल्या माझ्या पिढीतील कोणी तुमचे परिचित असतील तर “एकदा विचारुन तर बघा”. मध्यमवर्गीयांच्या घरात ग्लाॅसी पेपरवरील गाॅसिप्स मॅगझिनही येत नसत. उगाच ते आशा सचदेव, शीतल, श्यामली, कोमिला विर्क इत्यादींचे बोल्ड फोटो पाहणे नको. संस्कारक्षम वयात असं काही पाहणे नकोच. ) त्या दशकाच्या सुरुवातीपासूनच ” फक्त प्रोढांसाठी ” असे सेन्सॉरचे प्रमाणपत्र असलेला चित्रपट म्हणजे, स्री पुरुष संबंधाची ( कधी विवाहबाह्यसंबंधाची) काहीतरी धाडसी ” स्टोरी “, शारीरिक आकर्षणाची गोष्ट, नायिका, सहनायिका, खलनायिका यांचे शक्य तितके शरीर प्रदर्शन. (Do Raha)
असे पिक्चर त्या काळातील आंबटशौकीन जास्त प्रमाणात पाहत असले तरी त्यांच्यासाठी ती एक स्वस्त करमणूक होती. त्यात एकादा राजेंद्रसिंग बेदी दिग्दर्शित ‘दस्तक’ (१९७२) मुंबईतील राहण्याच्या समस्येत एका नवदाम्पत्याला चक्क रेड लाईट एरियात राहावे लागते आणि त्यात येणारे भयाण अनुभव अशा सामाजिक गोष्टीवरचा विचार करायला लावणारा वेगळाच चित्रपट होता. दुसर्या बाजूलाच नायिका, सहनायिका, खलनायिका यांचे स्वीमिंग सूट, बिकीनी यात त्यांचे वावरणेही फार धाडसी मानले जाई. आजच्या ग्लोबल युगातील सोशल मिडियात आजच्या पिढीतील महाराष्ट्रीय अभिनेत्रीही शाॅर्टसमध्ये वा बिकीनीत सहज वावरताना दिसतात. आणि आपण मागे नाहीत हेच जणू सिध्द करतात. म्हणजेच काळ बराच पुढे गेला आहे आणि अशातच अशा काही फक्त ‘प्रौढांसाठी’ पिक्चर्सच्या पोस्टर्सवर, सिक्स सिटर्सवर (आडवे मोठे पोस्टर), होर्डिग्जवर, अगदी थिएटर डेकोरेशनवरही “A” केवढा तरी मोठा असे. ए अर्थातच ॲडल्स. आणि हा भला मोठा ” ए” चक्क काही पिक्चर्सच्या पथ्यावर पडे. कम्माल असली तरी ही वस्तुस्थिती.
असाच एक पिक्चर, ‘दो राहा’. पोस्टरवरचा “ए” इतका व असा मोठा की वाटावे जणू तेच या पिक्चरचे नाव आहे की काय? असा भला मोठा “ए” टाकून एक हेतू स्पष्ट, या चित्रपटात धाडसी थीमनुसार काही बेधडक दृश्य आहेत. ( तरी बरं त्या काळात सेन्सॉरच्या कैचीची धार फार होती. त्यातून जमतील तितकी धाडसी दृश्य सुटली म्हणजे जणू पिक्चरचे पहिले यश. त्या काळात ‘ॲनिमल ‘ निर्मितीचा कोणी विचारच केला नसता. कदाचित त्यावर सेन्सॉरची अशी आणि इतकी कैची चालली असती की, बहुतेक अख्खा पिक्चर रि शूटिंग करावा लागला असता. ‘बाॅम्बे बाय नाईट ‘ या पिक्चरच्या बाबतीत तेच घडल्याचं गाॅसिप्स रंगले.) ‘दो राहा’ मुंबईत रिलीज १८ फेब्रुवारी १९७२. मेन थिएटर शालिमार. (Do Raha)
त्या काळात प्रत्येक चित्रपट दहा वर्षांनंतर पुन्हा सेन्सॉर संमत करण्याचा नियम होता. निर्माता राम दयाल यांनी त्याची फार घाई केली नाही. त्यांनी १९८३ च्या सप्टेंबर महिन्यात तो पुन्हा सेन्सॉर संमत करुन घेतला तरी त्याला ‘ए’ प्रमाणपत्र. नायिकेवर ( राधा सलुजा) खलनायकाने ( रुपेशकुमार) केलेली जबरदस्ती हे याचे मध्यवर्ती कथासूत्र. त्या काळात अनेक मसालेदार मनोरंजक चित्रपटात असे जणू हुकमी दृश्य का असे याला उत्तर नाही. बहुतेक सवंग मनोरंजनाचा तो एक भाग असावा. दिग्दर्शक फिरोझ चिनाॅय याने ‘दो राहा ‘ अधिकाधिक नाट्यमय केला. चित्रपटात नायक अनिल धवन, त्याशिवाय शत्रुघ्न सिन्हा, इफ्तेखार, लीला मिश्रा, दिनेश हिंगू, रणधीर इत्यादी. चित्रपटाची कथा व पटकथा पी. डी. शेणाॅय यांची. छायाचित्रणकार कमलाकर. इंदिवर यांच्या गीताना सपन जगमोहन यांचे संगीत.(Do Raha)
पिक्चर रिलीज होताच ‘ए’ प्रमाणपत्राच्या गणितानुसार पब्लिकची फार गर्दी झाली पण त्या सुमारास अशा पठडीतील अनेक चित्रपट पडद्यावर येत असल्यानेच बहुदा गर्दी वेगाने ओसरली असावी. याची सुरुवात बी. आर. इशारा दिग्दर्शित ‘चेतना ‘ चित्रपटाच्या पोस्टरपासूनच झाली. मग त्यातील अनिल धवन व रेहाना सुल्तान यांच्यावरील एका दृश्यावरुन सांस्कृतिक धक्काच बसला. त्यातून पिक्चर चक्क सुपरहिट झाला आणि जणू धाडसी थीमवरील पिक्चरचा आपला एक ट्रेण्ड निर्माण झाला. ‘चेतना ‘चे गाणी वगळता जवळपास सगळे शूटिंग जुहूच्या एका बंगल्यात झाले आणि आता अनेकांना वाटले आपणही जुहूच्याच एकाद्या बंगल्यात घडणारी ‘स्टोरी ‘ रचूया. ‘चेतना ‘ सत्तावीस दिवसात आणि स्वस्तात बनला. हे तर फारच उपयुक्त ठरले. लो बजेट फिल्म. बी. आर. इशारा, फिरोझ चिनाॅय, राम दयाल, मुकुल दत्त अशांनी अशा पठडीतील चित्रपटाचे सातत्य ठेवले. दो राहा, दो नंबर के अमीर, काॅल गर्ल, एक नारी दो रुप, कश्मकश, हवस, जरुरत, प्रभात वगैरे बरेच. (Do Raha)
==========
हे देखील वाचा : बॉलीवूडची पहिली डान्सिंग क्वीन
==========
सत्तरच्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टीत एकाच वेळेस अनेक ट्रेण्ड निर्माण होत गेले आणि त्यातील काही बराच काळ टिकले, काही लवकर ओसरले. त्यातला हा पोस्टरपासूनच लक्षवेधक ठरलेला ट्रेण्ड. पोस्टरवर एवढा मोठा लाल अक्षरात ‘ए’ आहे म्हणजेच काहीतरी उत्तान असेल असा समज गैरसमज. ओटीटीच्या काळात अनेक वेबसिरीजमध्ये अनेक चुंबन दृश्य, मोकळी ढाकळी प्रणय दृश्य, बेड सीन , बिकीनी अथवा शाॅर्टसमध्ये अभिनेत्री असते ( आणि थीमची गरज म्हणून अशी दृश्य दिली असा ठाम आत्मविश्वासही असतो. ) पन्नास वर्षांपूर्वी मात्र अशा मनोरंजनाला मुख्य प्रवाहातही साईड ट्रॅक केलेले असे…