महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
“आकाशवाणी” एक वेगळे थिएटर
काय म्हणता, मुंबईत तेही चर्चगेट, नरिमन पॉईंट विभागात आकाशवाणी नावाचे सिनेमा थिएटर होते? तुम्ही तेथे चित्रपट पाहिलात? असा प्रश्न करणारे मला अधूनमधून भेटत असतात. त्यात त्यांचे आश्चर्यकारक भाव असतात. गप्पांच्या ओघात मी जेव्हा दक्षिण मुंबईतील फारच पूर्वी पडद्याआड गेलेली, जुनी सिंगल स्क्रीन थिएटर्सची नावे घेतो तेव्हा मला हे आकाशवाणी चित्रपटगृहही (Akashvani Theater) नक्कीच आठवते. विशेष म्हणजे ते नेमके कुठे होते हे सांगायला मेंदूवर जास्त जोर द्यावा लागत नाही..कारण आकाशवाणी इमारतीच्या उजव्या बाजूला म्हणजे आपण मंत्रालयाला जाण्यासाठी मागील बाजूने प्रवेश करतो त्या बाजूला ते होते. बहुतेक सातशे सीटसचे असावे.(याउलट मी अशा अनेक जुन्या सिंगल स्क्रीन थिएटर्सचा शोध घेत असतानाच मला ग्रॅन्ट रोड परिसरात रिप्पाॅन नावाचे मूकपटाच्या काळात एक थिएटर होते हे समजले पण त्याच्या कोणत्याही खाणाखूणा शिल्लक नसल्याने ते नेमके कुठे होते हे अनेक प्रयत्न करुनही समजले नाही.)
मला या आकाशवाणी (Akashvani Theater) नावाच्या चित्रपटगृहाची सर्वप्रथम माहिती झाली ती निर्माते सुरेश जिंदाल यांच्या बासू चटर्जी दिग्दर्शित ‘रजनीगंधा’ ( १९७४) या चित्रपटामुळे! माझे ते शालेय वय होते आणि मराठी प्रसार माध्यमातून दिग्दर्शक ह्रषिकेश मुखर्जी, गुलजार, बासू भट्टाचार्य, बासू चटर्जी यांच्या स्वच्छ मनोरंजक चित्रपटावरील लेखात बासू चटर्जी दिग्दर्शित ‘रजनीगंधा’ हा चित्रपट मुंबईत आकाशवाणी चित्रपटगृहात सुरु असल्याचे समजले. आकाशवाणी (Akashvani Theater) म्हटलं की, रेडिओ आणि गाण्यांपासून कसोटी क्रिकेट सामन्याच्या समालोचनापर्यंत त्याच्याशी संबंध येतो एवढेच माहित होते. पण या नावाचे चक्क चित्रपटगृह? एकिकडे रजनीगंधा फुल तुम्हारे ( लता मंगेशकर), कहीं बार यूंही देखा है (मुकेश) ही गाणी (गीतकार योगेश, संगीतकार सलिल चौधरी) रेडिओवर ऐकताना आकाशवाणी थिएटर कुठे बरे असा प्रश्न पडे. तेव्हाच या चित्रपटात अमोल पालेकर, विद्या सिन्हा, दिनेश ठाकूर यांच्या प्रमुख भूमिका असल्याने या चित्रपटाबाबत उत्सुकता वाढे आणि तेव्हाच्या सामाजिक, सांस्कृतिक, कौटुंबिक जीवनशैलीनुसार अडलेल्या प्रश्नावर पालकांशी संवाद साधण्याची पध्दत होती. त्यातूनच आकाशवाणी नावाचे चित्रपटगृह कुठे आहे हे समजले. यशस्वी चित्रपट एकाद्या गोष्टीबाबत कुतूहल निर्माण करते ते हे असे.
‘रजनीगंधा’ ने याच आकाशवाणी थिएटरमध्ये (Akashvani Theater) खणखणीत रौप्य महोत्सवी म्हणजे पंचवीस आठवडे मुक्काम केला आणि स्वच्छ मनोरंजक अथवा मध्यमवर्गीय चित्रपटांना जणू एक हक्काचे सिनेमा थिएटर मिळाले. चित्रपटाच्या यशाने चित्रपटगृह प्रकाशात आणले असे घडले. यशस्वी चित्रपट असेही काही देत असतोच. जवळपास संपूर्णपणे शासकीय, निम शासकीय, खाजगी कार्यालयांचा परिसर, जोडीला काही काॅलेजेस. म्हणजे युथफुल गर्दीची कमतरताच नाही. अनेक ऑफिसेस शनिवारी अर्धा दिवस असल्याने दुपारी तीनचा खेळ हमखास हाऊसफुल्ल. अधूनमधून इंग्लिश चित्रपट प्रदर्शित होत. मात्र “अरविंद देसाई की अजब दास्तान”कडे ( १९७८) रसिकांनी फर्स्ट शोपासूनच पाठ फिरवल्याने अवघ्या तीनच दिवसात हा चित्रपट उतरवला गेल्याची भरपूर चर्चा रंगली.
अहो, त्या काळात पिक्चर कितीही फ्लाॅप झाला ( तेव्हाच्या भाषेत आपटला) तरीही ‘किमान एक आठवडा त्याची प्रिन्ट थिएटरवर दाखवली जाई.) तात्पर्य, यावेळी आकाशवाणी थिएटर (Akashvani Theater) वेगळ्या कारणास्तव चर्चेत आले. सईद अख्तर मिर्झा दिग्दर्शित या चित्रपटात दिलीप धवन, अंजली पैंगणकर, ओम पुरी, डाॅ. श्रीराम लागू, सतीश शहा इत्यादींच्या भूमिका होत्या. मी आकाशवाणी थिएटरमध्ये पाहिलेल्या चित्रपटात विधु विनोद चोप्रा दिग्दर्शित ‘सजा ए मौत ‘ ( १९८१) हा रहस्यरंजक चित्रपट विशेष उल्लेखनीय. विधु विनोद चोप्राचा हा पहिलाच चित्रपट आणि तोपर्यंत त्याला इंग्लिश मिडियातून कव्हरेज मिळत होते. या चित्रपटात नसिरुद्दीन शहा, राधा सलुजा, अंजली पैंगणकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. मला आठवतय रसरंग साप्ताहिकात तेव्हा वाचक अथवा प्रेक्षकांची म्हणा, पण त्यातील ‘प्रेक्षकांच्या चष्म्यातून ‘ या सदरात मते प्रसिद्ध केली जात आणि या चित्रपटावर मी थोडे सविस्तर लिहिलेले प्रसिद्ध झाले होते.
======
हे देखील वाचा : डेकोरेशन देते मुव्हीजचा फिल…
======
मी मिडियात आल्यावर १९८४ च्या जानेवारीत मुंबईत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या आयोजनात मेट्रो, न्यू एक्सलसियर, स्ट्रॅन्ड या थिएटरसह आकाशवाणी थिएटरवरही काही चित्रपटांचे खेळ आयोजित करण्यात आले होते. पण त्यानंतर काही वर्षांतच हे थिएटर बंद झाले. दुर्दैवाने या थिएटर बंदची फारशी दखल घेतली नाही. कदाचित सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला ते सुरु होताना तेथे व्यावसायिक चित्रपट प्रदर्शित न होता, अधिक प्रमाणात काहीसे वेगळ्या प्रवाहातील चित्रपट प्रदर्शित झाल्याने हे अतिशय आटोपशीर असलेले थिएटर काहीसे दुर्लक्षित राहिले असावे. बरं तेही इतके आणि असे दुर्लक्षित की दक्षिण मुंबई कल्चर थिएटर परंपरेचा विषय निघतो तेव्हा त्यात आकाशवाणी थिएटरची (Akashvani Theater) क्वचितच आठवण येते. ते सुरु असताना अनेकदा तरी इंग्लिश मिडियात येथे प्रदर्शित झालेल्या चित्रपटावर फोकस टाकला जाई. काॅलेज विद्यार्थ्यांचा या चित्रपटगृहाला असलेल्या रिस्पॉन्समुळे तसे असावे.
आज मात्र अशा नावाचे सिनेमा थिएटर होते हे अनेकांना सांगूनही आश्चर्य वाटते. त्या परिसरात गेल्यावर मला मात्र हे थिएटर आठवते. इतकेच नव्हे तर क्रॉफर्ड मार्केट परिसरात एकेकाळी रेडिओ नावाचे थिएटर होते अशीही अधिक तपशील मी आवर्जून देतो. अर्थात, काळ जस जसा पुढे जात राहिला तशी अनेक सिंगल स्क्रीन थिएटर्स काळाच्या पडद्याआड जात राहिली. या दशकात मात्र त्याचा वेग वाढलाय. माझ्यासाठी मात्र ही सिंगल स्क्रीन थिएटर्स एक मोठाच फ्लॅशबॅक आहे. त्यात अनेक चित्रपट एन्जाॅय केल्याने तिकीट दरासह अनेक आठवणी आहेत.
दिलीप ठाकूर