
Bollywood movies : मोठे चित्रपट, मोठे यश… छोट्यानाही मिळू देत
पुष्पा, ॲनिमल, पुष्पा २, छावा… पहिल्याच खेळापासून हाऊसफुल्ल गर्दी. भलेही या चित्रपटाच्या (Bollywood movies) गुणवत्तेबाबत (विशेषत: पुष्पा २) काही उलटसुलट मते असतीलही, तिकीट काढून पाहिलेल्या चित्रपटावर “आपले मत” मांडण्याचा अधिकार प्रेक्षकांना आहेच आहे. (ॲनिमल चित्रपटातील क्रूर हिंसा अंगावर येते.), काही वादही झाले (छावाच्या ट्रेलरमधील लेझीम नृत्य) पण सिंगल स्क्रीन थिएटर्स अर्थात एक पडदा चित्रपटगृहापासून मल्टीप्लेक्सपर्यंत हे चित्रपट रसिक प्रेक्षकांनी टाळ्या नि शिट्ट्यांनी एन्जाॅय केले…

या चित्रपटाच्या उत्पन्नाच्या विक्रमी आकड्यात चित्रपटाबाबतची विरोधी मते कुठे वाहून गेली हे समजलेच नाही. यशाची हीच तर गंमत असते, ते लोकप्रियतेवर चांगलेच स्वार होते. पुष्पा २ मध्ये वीस मिनिटे वाढवण्यात आली, छावा तेलगू भाषेत आंध्र प्रदेश, तेलंगणा येथे प्रदर्शित झाला. योगायोगाने या प्रत्येक चित्रपटात रश्मिका मंदन्ना नायिका आहे. तिचा फॅन फाॅलोअर्स भरपूर वाढलाय. ती अनेक कलाकारांप्रमाणेच फक्त सोशल मिडिया, इव्हेन्टस आणि गोडधोड मुलाखतीत दिसत नाही. (Bollywood movies)
हे सगळेच मोठ्ठे चित्रपट. बजेट मोठे. पूर्वप्रसिध्दी भली मोठी. त्यात स्टार मोठे. त्यांचे मार्केटिंग भले मोठे. त्यांचा रिलीजचा तडका केवढा तरी मोठाच. त्यांचे देश विदेशातील शो भरपूर. त्यांचे तिकीट दर चढते. त्यांची मल्टीप्लेक्सवरील कटआऊटस केवढी तरी मोठी. त्यांची समिक्षा मोठी. त्यांना मीडियात सगळीकडेच चार साडेचार स्टार. त्यांच्या भल्या सकाळच्या पहिल्याच खेळापासून पडद्यावर पिक्चर सुरु असतानाच कुठे व्हाॅटस अप मेसेज तर कुठे फेसबुकवर पोस्ट. मग या चित्रपटांवर फेसबुकवर अर्थात एकूणच सोशल मीडियात भरपूर उलटसुलट चर्चा. (Bollywood tadka)

आज प्रत्येक प्रेक्षक हा समिक्षक झाला आहे (फार पूर्वी प्रत्येक प्रेक्षक शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची त्याच दिवशीच्या घरी येत असलेल्या समिक्षेची आवर्जून वाट पहायचे. त्या काळात समिक्षेला स्टार द्यायची मराठीत तरी पध्दत नव्हती. शीर्षक वाचून चित्रपट कसा आहे ते समजे) आणि या सगळ्यातून हे चित्रपट सतत हाऊसफुल्ल गर्दीत. तेच तर महत्वाचे असते. (Bollywood movies)
मोठ्या चित्रपटांसारखेच यश मध्यम व छोट्या चित्रपटांनाही मिळायला हवे. अनेक चित्रपट देश विदेशातील अनेक चित्रपट महोत्सवात दाखल होतात, त्यांना मानाचे पुरस्कार प्राप्त होतात, त्यावर लिहिले जाते, पण त्यातील बरेच चित्रपट प्रदर्शितच होत नाहीत. त्यातील काही चित्रपट ओटीटीवर पाहता येत असले तरी मल्टीप्लेक्सच्या मोठ्याच पडद्यावर ते प्रदर्शित होवून त्यांची सोशल मीडियावर चर्चा होत राहिली तर त्यांचा प्रेक्षकवर्ग नक्कीच वाढेल. मध्यम व छोट्या चित्रपटांना लोकाश्रय वाढला तर त्याच्या निर्माता, दिग्दर्शक, कलाकार, तंत्रज्ञ व कामगार यांचाही हुरुप वाढेल. (Bollywood mix masala)
============
हे देखील वाचा : Rajendra Kumar : दिग्दर्शकाच्या नावा शिवाय “लव्ह स्टोरी” सुपरहिट
============
वर्षभरात मोठ्या बजेटच्या चित्रपटापेक्षा मध्यम व छोट्या चित्रपटांच्या निर्मितीची संख्या बरीच असते. अर्थात त्यातही कमी जास्त गुणवत्ता हा घटक महत्वाचा. काही छोटे चित्रपट म्हणजे त्या निर्मात्याने आपलीच पूर्ण केलेली हौस मौज असते. चित्रपटाच्या वलयाने ते निर्माते या क्षेत्रात आल्याचे जाणवते. एकाच चित्रपटात ते बाद होतात. खरं तर, अभिनय प्रशिक्षण शिबीराप्रमाणेच चित्रपट माध्यम व व्यवसाय याची ओळख करुन देणारी शिबीरे अत्यावश्यक आहेत. भरपूर पैसा आहे म्हणून चित्रपट निर्माण करता येतो हे अर्धसत्य आहे.
चित्रपट (Bollywood movies) निर्मितीत पैसा महत्वाचाच. पण त्याच वेळेस पटकथेपासून संकलनापर्यंत आणि चित्रपटाच्या नावापासून पोस्टर डिझाईनपर्यंत अनेक घटक महत्वाचे. मोठ्या चित्रपटांच्या नियोजन, आखणी, मांडणी, बांधणीत ते जास्त जाणवते. मध्यम व छोटे चित्रपटही त्याबाबत त्यांना फाॅलो करतील तर उत्तम. पण अनेक मध्यम व छोट्या चित्रपटांचा दर्जा उत्तम असूनही त्यांना प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद का मिळत नाही? मोठेच चित्रपट पहायला महागडे तिकीट काढावे असे प्रेक्षकांनी ठरवले आहे की काय?

रमेश सिप्पी दिग्दर्शित “शोले” (१९७५) च्या लोकप्रियतेच्या अक्राळविक्राळ लाटेतही अनेक मध्यम व छोटे चित्रपट तरले. यशस्वी झाले. ‘जय संतोषी मां” (मुंबईत रिलीज ३० मे १९७५) हे उत्तम उदाहरण. “शोले”च्या खणखणीत यशाचा त्याला जराही धक्का बसला नाही आणि आज या चित्रपटांच्या पन्नास वर्षांतही त्यांची चर्चा होतेय. हेदेखील एक प्रकारचे मोजता न येणारे यशच.
१९७५ सालीच गुलजार दिग्दर्शित आंधी (त्यावर आणीबाणीत बंदी आली), सोहनलाल कंवर दिग्दर्शित संन्यासी, फिरोज खान दिग्दर्शित धर्मात्मा, ब्रीज दिग्दर्शित चोरी मेरा काम, रवि टंडन दिग्दर्शित खेल खेल मे, रणधीर कपूर दिग्दर्शित धरम करम, दुलाल गुहा दिग्दर्शित प्रतिज्ञा यांनी अतिशय उत्तम तर ए. सुब्बाराव दिग्दर्शित सुनहरा संसार, गुलजार दिग्दर्शित खुशबू व मौसम, एस. व्ही. राजेंद्रन दिग्दर्शित दुल्हन यांनी साधारण यश प्राप्त केले. (Bollywood movies)
============
हे देखील वाचा : shahenshah : पडद्यावर पोलीस, थिएटरवर बंदोबस्त
============
त्याकाळात सिंगल स्क्रीन थिएटर्स हाच चित्रपट पाहण्याचा मोठाच आधार असला तरी प्रेक्षक अनेक प्रकारचे चित्रपट पाहण्याच्या मानसिकतेत होते. आज तसे चित्र नाही. आताही “छावा” पाहिल्यावर प्रेक्षक “सिकंदर”ची वाट पाहताहेत की काय असाच प्रश्न पडलाय. सलमान खानने “सिकंदर”च्या पूर्वप्रसिध्दीत आपल्या इतकेच महत्व व फूटेज रश्मिका मंदन्नालाही द्यावे.. सध्या तिच्या यशाच्या प्रगती पुस्तकात जास्त गुण आहेत.
असो. चांगल्या मध्यम व छोट्या चित्रपटांनाही व्यावसायिक यशाचे टाॅनिक हवे असते आणि ते देणे प्रेक्षकांच्या मनात आणि हातात आहे.