दादासाहेब फाळके: ‘राजा हरिश्चंद्र’ पहिला चित्रपट नसल्याचा दावा का करण्यात आला होता?
भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवणारे धुंडिराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांचा आज स्मृतीदिन. ३० एप्रिल १८७० साली त्र्यंबकेश्वर नाशिक येथील एका ब्राह्मण कुटुंबात जन्माला आलेल्या दादासाहेबांना कलात्मक गोष्टींची विशेष आवड होती. त्यामुळे मराठा हायस्कूल, मुंबई मधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला. वर्षभरातच फर्स्ट ग्रेडची परिक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यानंतर बडोदा येथे प्राध्यापक गज्जर यांच्या कलाभवनात त्यांनी ड्रॉइंग, पेंटिंग, मॉडेलिंग तसेच फोटोग्राफीचं शिक्षण घेतलं.
दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) हाडाचे कलाकार होते. फोटोग्राफी तर त्यांच्या विशेष आवडीची. त्यावेळी त्यांना मिळत असलेल्या शिष्यवृत्तीच्या पैशांमधून त्यांनी फोटोग्राफीसाठी स्टील कॅमेरा खरेदी केला होता. महाराजा सयाजीराव विद्यापीठाच्या कलाभवनातून त्यांनी तैलरंगचित्रण, जलरंगचित्रण यासोबतच वास्तुकला आणि मॉडेलिंगचेही शिक्षण घेतले. तसेच फोटोग्राफी आणि फोटोलिथोग्राफी या व्यावसायिक कलांचेही शिक्षण घेतले. त्यात विविध प्रयोगही केले. १८९५ मध्ये त्यांनी गुजरातमधील गोध्रा येथे व्यावसायिक छायाचित्रकार म्हणून व्यवसाय सुरू केला.
शिक्षण, व्यवसाय, विवाह असं सरळमार्गी आयुष्य सुरु होतं. व्यवसायानिमित्त गुजरातमधील गोध्रा गावात ते स्थायिक झाले. तिथे ते छायाचित्रकार म्हणून व्यवसाय करत असत. परंतु, आयुष्यात अचानक एक मोठं संकट आलं. गोध्र्यात आलेल्या प्लेगच्या साथीत त्यांची पत्नी आणि मूल दगावले. त्यांनतर मात्र त्यांनी गोध्रा गावाला कायमचा रामराम केला आणि ते बडोद्याला गेले.
दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) म्हणजे अष्टपैलू व्यक्तिमत्व होते. त्यांना सतत काहीतरी नवीन शिकण्याचं जणू व्यसनच जडलं होतं. एका जर्मन जादूगाराकडून त्यांनी जादूची कला शिकून घेतली आणि प्रोफेसर केल्फा या नावाने जादूचे प्रयोग सुरु केले.
१९०३ साली दादासाहेबांना भारतीय पुरातत्त्व खात्यामध्ये नोकरी मिळाली. या नोकरीदरम्यान लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या वंगभंग चळवळीचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांनी नोकरी सोडून दिली. त्यांनतर दरम्यान त्यांनी लोणावळा, दादर अशा अनेक ठिकाणी व्यवसाय केले. याच दरम्यान लाईफ ऑफ जिझस ख्राईस्ट’ हा चित्रपट पाहिला आणि त्यांनी ठरवले आपणही चित्रपट बनवायचा. इथूनच सुरु झाला भारतामधील चित्रपटनिर्मितीचा प्रवास.
चित्रपटनिर्मितीच्या शिक्षणासाठी ते लंडनला गेले आणि येताना सोबत आवश्यक सामग्री घेऊन आले. परत आल्यावर सुरु झाला एका ध्येयाचा प्रवास. त्याकाळी १५००० रुपये गुंतवून त्यांनी ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय चित्रपट बनवला. याची पटकथा, दिग्दर्शन आणि निर्मिती या तिन्ही आघाड्या त्यांनी स्वतः सांभाळल्या होत्या.
चित्रपट निर्मितीच्या कामात त्यांची दुसरी पत्नी सरस्वती यांनी मोलाची साथ दिली. चित्रपट निर्मितीसाठी राबणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची, जेवणा खाण्याची व्यवस्था तर त्यांनी केलीच शिवाय तांत्रिक गोष्टी शिकून प्रत्यक्ष निर्मितीच्या कामातही दादासाहेबांना मदत केली.
तो काळ होता रंगमंचावरच्या नाटकांचा. त्यामुळे पहिल्या वाहिल्या चित्रपटासाठी कलाकारांची टीम जमवणे हे सुद्धा मोठे आव्हान होते. त्यात स्त्री कलाकार उपलब्ध नसल्यामुळे चित्रपटात पुरुषांनीच स्त्री कलाकाराची भूमिका केली. परंतु, सर्व अडथळ्यांवर मात करत दादासाहेबांनी जिद्दीने हा चित्रपट पूर्ण केला. चित्रपट तयार झाल्यावरही थिएटर शोधताना अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली.
पण दादासाहेबांनी त्याकडे दुर्लक्ष केलं. २१ एप्रिल १९१३ रोजी रात्री ९ वाजता निवडक मान्यवर व्यक्तींसाठी चित्रपटाचा प्रीमिअर शो ऑलिंपिया थिएटर, मुंबई येथे आयोजित करण्यात आला. या प्रिमिअरला त्यावेळच्या केसरी, टाइम्स ऑफ इंडिया आदी वृत्तपत्रांनी जबरदस्त प्रसिद्धी दिली. यानंतर मात्र भारतभर दादासाहेबांच्या चित्रपटाच्या चर्चा रंगल्या.
भारतामधील पहिला चित्रपट (मूकपट) बनविण्याचे श्रेय दादासाहेबांना देण्यात आले असले तरी यावर आक्षेपही नोंदविण्यात आला होता. १९१२ साली दादासाहेब तोरणे यांनी बनवलेला ‘भक्त पुंडलीक’ हा मूकपट पहिला भारतीय चित्रपट असल्याचा दावा केला गेला. मात्र हा चित्रपट म्हणजे ‘भक्त पुंडलीक’ या नाटकाचे चित्रीकरण होते. तसेच चित्रपटाच्या तांत्रिक गोष्टींचे काम लंडनमध्ये करण्यात आले होते.
तसेच या अगोदरही नेत्यांची भाषणे, जादूचे प्रयोग आदी गोष्टींचे चित्रीकरण करून ते पडद्यावर दाखवले जात असे. परंतु, आज आपण ज्या प्रकारचे चित्रपट पाहतो, तशा कथाप्रधान (Feature Film) चित्रपटाची निर्मिती दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांच्या राजा हरिश्चंद्र या चित्रपटापासूनच झाली आहे. तसंच, हा सिनेमा पूर्णपणे भारतात बनवला गेला होता. त्यामुळे ‘राजा हरिश्चंद्र’ हाच भारतामधील पहिला चित्रपट आहे.
यानंतर मात्र दादासाहेबांनी चित्रपट निर्मितीचा प्रवास सुरूच ठेवला. सुरुवातीचे तिन्ही चित्रपट यशस्वी झाल्यावर त्यांना भागीदारीसाठी नामांकित व्यावसायिकांनी ऑफर्स दिल्या. बाळ गंगाधर टिळक, रतनजी टाटा आणि शेठ मनमोहनदास रामजी यांनी भांडवल गोळा केले आणि ‘फाळके फिल्म्स कंपनी’चे एका मर्यादित कंपनीत रूपांतर करण्यासाठी फाळके यांच्याशी संपर्क साधला. परंतु, ही भागीदारी होऊ शकली नाही.
यानंतर अभिनेत्री फातिमा बेगमने दिलेली ऑफरही दादासाहेबांनी नाकारली. अखेर, मुंबईस्थित पाच कापड उद्योगपतींनी (वामन श्रीधर आपटे, लक्ष्मण बळवंत फाटक, मायाशंकर भट्ट, माधवजी जेसिंग आणि गोकुळदास दामोदर) दिलेली ऑफर त्यांनी स्वीकारली. यानंतर १ जानेवारी १९७८ रोजी, ‘फाळके फिल्म्स कंपनी’चे नाव बदलून ‘हिंदुस्थान सिनेमा फिल्म्स कंपनी’ असे ठेवण्यात आले.
====
हे देखील वाचा: राजा परांजपे यांच्या मराठी चित्रपटांवरून प्रेरित होते ‘हे’ हिंदी चित्रपट!
=====
‘हिंदुस्थान सिनेमा फिल्म्स कंपनी’ मार्फत प्रदर्शित झालेल्या चित्रपटांनाही चांगले व्यवसायिक यश मिळाले. परंतु, कालांतराने मतभेद झाल्यामुळे दादासाहेबांनी भागीदारी तोडून निवृत्तीचा निर्णय घेतला.
दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke) यांनी राजा हरिश्चंद्र चित्रपटानंतर त्याच वर्षी म्हणजेच १९१३ साली मोहिनी भस्मासूर या दुसऱ्या पौराणिक चित्रपटाची निर्मिती केली. त्यानंतर सावित्री सत्यवान (१९१४), श्रीकृष्णजन्म (१९१८), कालिया मर्दन (१९१९) सेतुबंधन (१९३२) गंगावतरण (१९३७) अशा अनेक पौराणिक चित्रपटांची निर्मिती केली होती. त्यांनी आयुष्यभरात एकूण ९५ चित्रपट व २६ लघु चित्रपटांची निर्मिती केली. ‘गंगावतरण’ हा फाळकेंनी निर्मित केलेला पहिला आणि शेवटचा बोलपट. यानंतर त्यांनी निवृत्ती स्वीकारली.
====
हे देखील वाचा: या कारणामुळे रावांचा रंक झाले होते भगवान दादा!
====
भारतात अब्जावधी रुपयांची उलाढाल असणारी चित्रपटसृष्टी ज्या व्यक्तीमुळे सुरु झाली ती व्यक्ती म्हणजे दादासाहेब फाळके (Dadasaheb Phalke). १६ फेब्रुवारी १९४४ रोजी वयाच्या ७३ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. आज त्यांच्या स्मृदिनानिमित्त त्यांच्या कारकिर्दीचा थोडक्यात घेतलेला हा आढावा!