Dharmaveer Movie Review: असा आनंद दिघे पुन्हा होणे नाही
महाराष्ट्रात राजकारण हा मुद्दा सध्या ऐरणीवर असताना आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला ‘धर्मवीर, मुक्काम पोष्ट ठाणे’ या चित्रपटाबद्दल रसिकांच्या मनात प्रचंड उत्कंठा होती. सहसा बायोपिक म्हटलं की, त्यासाठी प्रचंड अभ्यास करावा लागतो. त्यातही राजकारणी व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित बायोपिक काढायचा, तर तेवढी काळजीही घ्यावी लागते. परंतु, हे आव्हान चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी लीलया पेललं आहे.
चित्रपटाची सुरुवात होते ती बॉलिवूडची पार्टी सोडून नाईलाजाने आनंद दिघेंच्या स्मृतिदिनाच्या कव्हरेजसाठी आलेली वृत्तप्रतिनिधी (श्रुती मराठे) आणि रिक्षावाला (गश्मीर महाजनी) त्यांच्या भेटीपासून. चित्रपट पूर्णपणे फ्लॅशबॅकमध्ये दाखविण्यात आला आहे. (Dharmaveer Movie Review)
आनंद दिघे यांचं सेनेसाठी आणि लोकांसाठीच कार्य दाखवताना दिग्दर्शकाने कुठेही हात आखडता घेतला नाहीये. मुळात हाच या चित्रपटाचा मूळ गाभा आहे. आनंद दिघेंचा एक सामान्य कार्यकर्ता ते जिल्हाध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष ते सर्वसामान्यांच्या मनातला ‘धर्मवीर’ हा प्रवास दाखवतानाच सेनेची ठाणे जिल्हा आणि ठाणे ग्रामीण भागातील जडणघडणही प्रभावीपणे दाखविण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील आदिवासी लोकसुद्धा त्यांना देव मानत असतं. याचं कारण म्हणजे दिघेसाहेबांचं कार्य. ठाणे जिल्ह्यात आदिवासींची संख्या लक्षणीय आहे. या आदिवासींच्या विकासासाठीही दिघेसाहेबांनी भरपूर काम केलं आहे. आदिवासी लोकांच्या मनातही दिघे साहेबांबद्दल आदरयुक्त भीती होती.
हिंदूंसाठी ते देवासमान होते आणि मुसलमानांमध्ये त्यांचा दरारा होता. भिवंडी दंगलीदरम्यान पोलिसांनाही त्यांची मदत घ्यावी लागली होती. दिघेसाहेबांनी, “शस्त्र खाली, दंगल करायची नाही”, म्हटल्यावर दंगलीखोरानी माघार घेतली होती. एवढी वचक, एवढा दरारा असणारा नेता आजकाल अभावानेच आढळतो. (Dharmaveer Movie Review)
सध्या केवळ महाराष्ट्रामध्येच नाही, तर एकूणच भारतामध्ये जे काही राजकारण चालू आहे ते पाहता लोप पावत चाललेली ‘पक्षनिष्ठा’ दिघे साहेबांसाठी मात्र प्राणाहून प्रिय होती. इतकंच नाही तर, पक्षासाठी लग्न न करणारा आनंद दिघेंसारखा नेता एखादाच! राजकारणात एवढी पक्षनिष्ठा असणाऱ्या व्यक्ती आहेत किंवा होत्या हे पाहून थक्क व्हायला होतं.
चित्रपटामध्ये आनंद दिघे यांची भूमिका साकारणारा अभिनेता प्रसाद ओक याने ही भूमिका अक्षरशः जगली आहे. धीरगंभीर चेहरा आणि नजरेतली जरब पाहून साक्षात आनंद दिघे साहेब समोर आहेत की काय, असा भास होतो. याचं श्रेय रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनाही द्यायलाच हवं. एकनाथ शिंदेंच्या भूमिकेत क्षितिज दाते, आणि बाळासाहेबांच्या भूमिकेत मकरंद पाध्ये चपलख बसले आहेत. दोघांनीही आपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. (Dharmaveer Movie Review)
चित्रपटाचे संवाद ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. ठाणे महानगरपालिकेत निवडणुकीनंतर सत्तास्थापनेच्या वेळी झालेल्या फोडाफोडीच्या राजकारणादरम्यान वसंत डावखरेंशी बोलताना जेव्हा दिघेसाहेब म्हणतात, “तू जिंकलास मात्र आनंद दिघे हरले” हे त्यांच वाक्य आणि प्रसंग थेट काळजाला भिडतो.
“गद्दारांना क्षमा नाही”, “आनंद दिघे स्वतःला न्याय मिळवून देणार का?” “कृष्ण होणार की अर्जुन?” “डोक्यावर टोपी घालून फिरणारा प्रत्येक मुसलमान आपला शत्रू नसतो, तर डोक्यात जिहाद घेऊन फिरणारा मुसलमान आपला शत्रू असतो; असे कित्येक संवाद आणि त्या दरम्यानचे प्रसंग थिएटरबाहेर पडल्यावरही प्रेक्षकांच्या दीर्घकाळ लक्षात राहतील. (Dharmaveer Movie Review)
चित्रपटाचं संगीत सुंदर जमून आलं आहे. आई जगदंबे आणि गुरुपौर्णिमेचं गाणं, ही दोन्ही गाणी सुंदर जमून आली आहेत. आई जगदंबे हे गाणं तर श्रावणीयच नाही, तर प्रेक्षणीयही झालं आहे. हे गाणं म्हणजे उत्कृष्ट कोरिओग्राफी, शब्दरचना आणि सादरीकरण याचं उत्तम उदाहरण आहे. केदार गायकवाड यांच्या सिनेमोटोग्राफीने चित्रपटाला ‘चार चांद’ लावले आहेत.
वसंत डावखरे – आनंद दिघे यांची मैत्री, आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे यांचे नाते तसेच दिघेसाहेबांची बाळासाहेबांवरील श्रद्धा पाहून अशीही नाती राजकारणात असतात याची जाणीव होते. मात्र चित्रपटामध्ये सढळ हस्ते ‘सिनेमॅटिक लिबर्टी’ घेण्यात आली आहे आणि हीच चित्रपटाची ‘कमजोर कडी’ आहे. (Dharmaveer Movie Review)
=========
हे देखील वाचा – प्राईम टाइम: अब तेरा क्या होगा चंद्रमुखी?
=========
एकूणच हा चित्रपट बायोपिक असल्याने सबकुछ आनंद दिघे असणार हे उघड होतं आणि तसं आहेच. पण राजकारणाचं वेगळं रूप पाहायचं असेल, तर धर्मवीर बघायला हवा.
चित्रपट: धर्मवीर मुक्काम पोष्ट ठाणे
निर्माते: मंगेश देसाई, झी स्टुडीओज्
कलाकार: प्रसाद ओक, क्षितिज दाते, मकरंद पाध्ये, शुभांगी लाटकर
कथा, पटकथा, लेखन आणि दिग्दर्शन: प्रविण विठ्ठल तरडे
रंगभूषाकार : विद्याधर भट्टे
छायांकन : केदार गायकवाड
दर्जा: ३.५ स्टार