दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
‘अतुल’नीय
काही कलाकार हवेहवेसे असतात. त्यांना पाहताच एक आपलेपणाची भावना निर्माण होते. मराठी नाट्यसृष्टीतील असं नाव म्हणजे अतुल परचुरे.
वासूची सासू, नातीगोती,टिळक आगरकर, अफलातून, बे दुणे पाच, तरुण तुर्क म्हातारे अर्क, व्यक्ती आणि वल्ली, वाह गुरु, ए भाऊ डोकं नको खाऊ, कापूसकोंड्याची गोष्ट यासारख्या नाटकांतून आपलं निखळ मनोरंजन करत आलेल्या अतुल परचुरे यांचा आज वाढदिवस.
मुंबईचं सांस्कृतिक माहेरघर असणा-या दादरसारख्या परिसरात अतुल यांची जडणघडण झाली. सुप्रसिद्ध बालमोहन शाळेतूनच अतुल यांच्यातील अभिनेत्याला वाव मिळाला.
आपल्या अभिनयाचा ठसा उमटवण्यास उत्सुक अतुलना त्यांच्या कमी उंचीमुळे, शरीराच्या ठेवणीमुळे सुरुवातीला अनेकांकडून कुत्सित शेरे ऐकावे लागले. मात्र टिळक आगरकर नाटकातील कामाच्या संपन्न अनुभवाने आपली आवड अभिनयातच आहे. याची अतुल यांना प्रकर्षाने जाणीव झाली आणि त्यांनी सगळ्या टीकाकारांकडे दुर्लक्ष करत याच क्षेत्रात काम करण्याचा निश्चय केला.
‘नातीगोती’ नाटकाने अतुल यांच्या कारकिर्दीला ख-या अर्थाने वळण दिले. जयवंत दळवी लिखित या नाटकात अतुल यांनी मतिमंद मुलाची भूमिका साकारली होती. त्यांना नाटकात एकही संवाद नव्हता पण मतिमंद मुलाचा अभिनय ते इतक्या प्रभावीपणे रंगमंचावर सादर करत की नाटक संपल्यावर अनेक प्रेक्षक जड पाणावलेल्या डोळ्यांनी बॅकस्टेजला अतुल यांना काळजीने पहायला येत. प्रत्यक्ष पुलं देशपांडे नातीगोती पाहून झाल्यावर बॅकस्टेजला अतुल यांना भेटायला आले आणि म्हणाले,” तुला हातीपायी धड पाहिलं. आता मला बरं वाटतंय”. इतकी ती भूमिका उत्तम वाटायची.
नातीगोती सारख्या गंभीर नाटकाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसाच प्रतिसाद अतुल यांच्या ‘तरूण तुर्क म्हातारे अर्क मधल्या” मुकुंद या पात्राला मिळाला. या नाटकात थोड्याशा बायकी तरुणाची अतुल यांची भूमिका प्रेक्षकांना शब्दश: खूर्चीवरुन पडण्याइतपत गडाबडा लोळायला हसायला लावायची. वास्तविक मधुकर तोरडमल यांना या भूमिकेसाठी सडसडीत नाजूक गोरापान तरुण अपेक्षित होता. अतुल यांनी तोरडमल यांना सांगितलं की, आठ दिवस तालमी करून मी पहातो. तुमच्या मनासारखं काम झालं नाही तर मी नाटक सोडेन. पण अतुल यांनी इतक्या बहारीनं काम वठवलं की या नाटकाचे अनेक प्रयोग त्यांच्या नावावर जमा झाले.
नाटका इतकंच मराठी हिंदी सिनेमा, मालिका यातही अतुल यांचा सहज वावर राहिलेला दिसतो. जागो मोहन प्यारे सारख्या मालिकेतील नायक आताच्या काळात इतका साधा भोळा कसा असू शकतो? असा खोचक प्रश्न प्रेक्षकांना पडत नाही नाही कारण अतुल यांचा अभिनय आणि अंगभूत हवेहवेसे पण तो साधेभोळेपणा कनव्हिन्सिंग वाटायला लावतो. ऑल द बेस्ट सारख्या चित्रपटात स्टार कलाकारांच्या मांदियाळीतही अतुल यांचा पांडू आपल्या ठसठशीत लक्षात रहातो.
इतक्या छान भूमिका साकारूनही चर्चा, गॉसिपिंग आणि गटबाजी यापासून चार हात लांब असलेल्या या गुणी अभिनेत्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!