महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
महाराज, चित्रपट आणि आपण!
गेल्या काही दिवसांपासून ऐतिहासिक चित्रपटांबद्दलच वातावरण तापलं आहे. एकिकडे अभिजीत देशपांडे दिग्दर्शित हर हर महादेव चित्रपटगृहात दिवाळीला लागला आहे. तर दुसरीकडे महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा झाली आहे. त्या घोषणेनंतर हे वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. वीर दौडले सात या चित्रपटातली नावं दिग्दर्शकाने पूर्णपणे बदलल्याची आवई उठली आणि त्यानंतर चुकीचा इतिहास लोकांसमोर आणत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. त्यातल्या अनेकांना ‘वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या घोषणेवेळी कलाकारांना दिलेला पोशाख आणि एकूणच त्यांची वेषभूषा, केशभूषा आवडलेली नव्हती असंही एके ठिकाणी वाचनात आलं. एकूणच मांजरेकरांनी सगळा नवा मांडलेला खेळ पाहून लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले. अनेकांना तर अक्षयकुमारने शिवाजी महाराज भूमिका करावी की नाही यावरही चर्चा सुरु केली आहे.
आता आधी ‘वीर दौडले सात’ या चित्रपटाबद्दल बोलूया. मुळात कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी एकूणच ऐतिहासिक चित्रपट करताना चुकीचा इतिहास पसरवला जाऊ नये असा दम भरलाय. त्यात चूक काहीच नाही. जो इतिहास आहे तो योग्य पद्धतीनेच दाखवता यायला हवा. कारण, इतिहासाशी लोकांच्या भावना जोडलेल्या असतात आणि त्यातही तो इतिहास शिवाजी महाराज आणि त्यांच्या शिलेदारांचा असेल तर मग हा इतिहास अत्यंत नीट दाखवला जावा हे योग्य आहे. पण यात दोन बाजू आहेत. आपण एक लक्षात घ्यायला हवं की, हा चित्रपट करणारे दिग्दर्शक आहेत महेश मांजरेकर. त्यांनी यापूर्वी मी शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपट लोकांसमोर आणला होता. त्यात त्यांनी छत्रपतींच काम केलं होतं. आता मांजरेकर हा नवा सिनेमा घेऊन येत आहे. महेश मांजरेकर हे हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतलं मोठं नाव आहे. गेली ३० पेक्षा जास्त वर्षं ते या क्षेत्रात काम करतायत. ते जेव्हा असा निर्णय घेतात तेव्हा त्यामागे काहीतरी विचार असेल हे नक्की. तो विचार जाणून घेणं हे गरजेचं नाही का?
संभाजी राजे यांच म्हणणं अगदीच बरोबर आहे. पण आपली भूमिका मांडण्यापूर्वी त्यांना थेट महेश मांजरेकरांना फोन करून तुम्ही असं का केल, असं विचारणं शक्य होतं. त्यांची भूमिका जर राजेंना कळली असती तर दिलेल्या ताकीदीला कारण मिळालं असतं. सिनेमा करायला घेताना हा सगळा विचार जनरली होतो. शिवाजी महाराजांशी संबंधित इतिहास दाखवताना तो चांगला व्हावा असंच प्रत्येकाला वाटत असतं. अलिकडचे सिनेमे पाहता दिग्पाल लांजेकर, डॉ.अमोल कोल्हे, अभिजीत देशपांडे, प्रवीण तरडे या सर्वांना उत्तम सिनेमाच बनवायचा होता. इतकंच नव्हे, या सर्वांनीच इतिहासाच्या अभ्यासासाठी विशिष्ट माणसांची निवड केली होतीच. इतिहासात नमूद असलेली नावं थेट बदलणं चूक आहेच. पण ती चूक थेट सांगताना, तुम्ही असं का केलं हे नेतेमंडळींंनी विचारायला हवंच. कारण त्यांना ते शक्य आहे. ‘वीर दौडले सात’ या चित्रपटाबद्दल बोलायचं तर सरनोबत प्रतापराव गुजर यांच्यासोबत जे सहा वीर लढायला निघाले त्यांची नावंच अस्तित्वात नाहीेयेत. व्हॉट्स अपवर प्रतापरावांसोबत ज्या सहा जणांची नावं फिरतायत त्या सहा जणांचे संदर्भ प्रतापरावांच्या वीरमरणानंतरही येतात. इतिहास अभ्यासक सौरभ कोर्डे यांनी या गोष्टीला पुष्टी दिली आहे. कदाचित ही नावं काळाच्या पडद्याआड गडप झाल्यामुळे महेश मांजरेकरांनी आपल्या सिनेमात ही काही काल्पनिक नावं घेतली असावीत आणि तसं असेल तर आता तुम्ही काय करणार?
आता आपण ‘हर हर महादेव’ या चित्रपटाबद्दल बोलूया. खरंतर हा चित्रपट प्रदर्शित होऊन महिन्यापेक्षा जास्त काळ लोटला आहे. गेल्या दिवाळीत हा चित्रपट मोठ्या धामधुमीत रिलीज झाला. तेव्हा त्या चित्रपटाबद्दल कुणीच फार आक्षेप घेतला नाही. आता इतक्या दिवसानंतर या चित्रपटातले आक्षेप समोर येऊ लागले आहेत. अगदी त्यातल्या भाषेपासून मराठी-मराठे आदी अनेक गोष्टी समोर येतात. खरंतर यावर तेव्हाच आक्षेप घ्यायला हवा होता. पण तो घेतला गेला नाही. आता अचानक यावर आक्षेप येऊ लागले आहेत. हा सगळा सोशल मीडियाचा कारनामा आहे. खरंतर या सिनेमावर आक्षेप घ्यायचा तर तो सेन्सॉर बोर्डाकडे घ्यायला हवा. पण तसं झालं नाही. उलट प्रेक्षकांनाच मारहाण झाली. आपण आंदोलन नेमकं का करतोय.. कुणासाठी करतोय.. आणि ते लोकांच्या डोळ्यात यावं म्हणून आपण कुणाला बळीचा बकरा बनवतो आहोत याचा विचार करण्याची गरज आली आहे.
=======
हे देखील वाचा : स्टर्लिंगची पर्सनॅलिटी लयच भारी…
=======
इतिहास योग्य पद्धतीने मांडला गेलाच पाहिजे. पण आपणही त्याच शिवाजी महाराजांच्या राज्यात जन्माला आलेलो आहोत. महाराजांचा पेशन्स.. दूरदृष्टी आणि निष्पक्ष न्याय ही त्रिसूत्री आपल्यात भिनवायची गरजही आपलीच आहे. अर्थात या सगळ्याला केवळ सांस्कृतिक पार्श्वभूमीच कारणीभूत आहे असंही नाही. या दोन्ही सिनेमांवेळी त्याच्या व्यासपीठावर विशिष्ट राजकीय नेते उपस्थित होते हे लक्षात घ्यायला हवं. शिवाय इतकं सगळं होऊन आता हा विषय मागे पडला आहे. पुढे याबद्दल कुणीच फॉलोअप घेतलेला नाही. तो घेतलाही जाणार नाही. अशावेळी आपण काय करायचं हे ठरवायला हवं.
मुद्दा इतकाच आहे, शिवाजी महाराज हे प्रत्येकाचं दैवत आहेत. अगदी मग तो राजकीय नेता असो किवा सामान्य नागरिक. अशावेळी महाराजांचा किंवा त्यांच्या मावळ्यांचा अपमान व्हावा असं कुणाच्यात मनात नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे. अशावेळी बोलून..साकल्याने, विवेकाने प्रश्न सुटु शकतात. त्यासाठी मारहाण करण्याची गरज नाही हे आपण लक्षात घ्यायला हवं.
सौमित्र पोटे