
Meena Kumari : जेव्हा एका डाकूने चाकूने मीना कुमारीचा ऑटोग्राफ घेतला!
प्रेक्षकांचं कलावंतांवर असलेले प्रेम हा अनादी काळापासून चर्चेचा विषय आहे. कधी कधी मात्र या प्रेमाचा अतिरेक होतो. कडेलोट होतो. हाच रसिक चाहता प्रेक्षक जर कुणी डाकू दरोडेखोर असेल तर? तर मात्र कहानीला वेगळाच रंग येतो. मीना कुमारी (Meena Kumari) या अभिनेत्रीचा एक दरोडेखोर चाहता आणि त्यातून उभा राहिलेला एक बिकट प्रसंग याचं वर्णन मीना कुमारीचे पती आणि दिग्दर्शक कमाल अमरोही यांनी फार पूर्वी एका रेडिओ मुलाखतीत केलं होतं.

हा किस्सा पन्नासच्या दशकाच्या अखेरचा आहे. १९५८ साली Kamal Amrohi मीना कुमारीला (Meena Kumari) घेऊन ‘पाकीजा’ हा चित्रपट बनवत होते. (हा सिनेमा नंतर बंद पडला पुन्हा सुरु झाला आणि शेवटी १९७२ साली प्रदर्शित झाला.) त्यासाठी काही लोकशन पाहण्यासाठी ते राजस्थानला पोहोचले. कोटा इथून त्यांना शिवपुरीला जायचं होतं. दुपारची वेळ होती. त्यावेळी आजच्यासारखे रस्ते नव्हते. गुगल मॅप वगैरे तर काहीच नव्हतं. कमाल अमरोही यांच्याकडे एक नकाशा होता. त्या नकाशात कोटा येथून शिवपुरीला जायचा एक मार्ग दाखवला होता. त्या मार्गाने ते आपल्या कारमधून जाऊ लागले. कमाल सोबत आणखी देखील काही मित्र होते जे वेगळ्या कारमधून त्यांच्यासोबत जात होते. पण त्या सर्वांचा रस्ता चुकला आणि ते एका वेगळ्याच जंगलाकडे गेले!
जेव्हा त्यांच्या लक्षात आले की आपण रस्ता चुकलो; त्यावेळेला आता इथून बाहेर कसे पडायचे हा प्रश्न निर्माण झाला. तोवर संध्याकाळ झाली होती. रस्त्यात चिटपाखरू देखील नव्हते आणि त्यांच्या कारमधील पेट्रोल देखील संपले होते. मोठा कठीण प्रसंग निर्माण झाला होता. त्याच वेळी एक व्यक्ती त्यांना समोरून येताना दिसली. त्यांनी त्या व्यक्तीला विचारले, ”इथे जवळपास कुठे पेट्रोल मिळू शकेल का आमच्या गाडीतील पेट्रोल संपले आहे.” त्यावर ती व्यक्ती म्हणाली, ”पेट्रोल तर तुम्हाला शिवपुरीलाच मिळेल आणि इथून शिवपुरी खूप लांब आहे पण तुम्ही इथेच थांबा इथून एक सरकारी बस या वेळी जात असते. त्या बस ड्रायव्हरला जर विनंती केली तर तो त्याच्या बसमधील काही पेट्रोल तुमच्या कारमध्ये टाकू शकतो.” (Untold stories)

सर्वजण बसची वाट पाहू लागले. पण बस काही आलीच नाही पण थोड्याच वेळा त्यांना घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला आणि शंभर एक घोडेस्वारांचा जमाव त्यांच्या कारभोवती जमा झाला. त्या सर्व लोकांच्या हातात बंदूका होत्या. कमाल अमरोही यांच्या लक्षात आलं हे सर्व डाकू आहेत. त्यातील एकाने कमाल अमरोहीला कारचा दरवाजा उघडायला सांगितले आणि आपल्या सोबत यायला सांगितले. कमाल साहेबांनी त्याला विरोध केला. त्यावर दरोडेखोर चिडले. पण मीना कुमारीने मध्यस्थी करत विचारले, ”तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय पाहिजे आहे?” त्यावर तो दरोडेखोर म्हणाला, ”आम्ही डाकू आहोत तुम्ही आमच्या सरदाराकडे चला.” शंभर लोकांपुढे आपला टिकाऊ लागणार नाही हे लक्षात आल्यावर ते सर्वजण डाकूच्या अड्ड्यावर गेले तिथे मीना कुमारीने (Meena Kumari) त्या व्यक्तीला सांगितले, ”मला तुमच्या सरदारा सोबत बोलायचे आहे.” तितक्यात समोरून त्यांना एक सरदार येताना दिसला.
कमाल अमरोही यांनी त्याला विचारले, ”आम्हाला विनाकारण तुम्ही इथे का आणले आहे तुम्ही कोण आहात? त्यावर तो सरदार म्हणाला, ”मी डाकू अमृतलाल आहे. तुम्ही कोण आहात?” त्यावर कमाल म्हणाले, ”मी एक चित्रपट निर्माता आहे आणि सिनेमाचे लोकेशन पाहण्यासाठी इथे आलो आहे.” डाकू अमृत लाल म्हणाला, ”आजवर तुम्ही कोणत्या चित्रपट काढले आहेत?” त्यावर कमाल म्हणाले, ”मी महल नावाचा चित्रपट काढला होता.” त्यावर डाकूने विचारले, ”आयेगा आनेवाला हे गाणं असलेला का?” त्यावर कमाल अमरोही म्हणाले, ”हो.” सरदारने विचारले, ”तुमच्या सोबतची ही मुलगी कोण आहे?” त्यावर कमाले म्हणाले, ”ये लडकी नही. मेरी बेगम है मीना कुमारी”
मीना कुमारीचे (Meena Kumari) नाव ऐकल्यानंतर सरदार एकदम सटपटला तो म्हणाला, ”मीना कुमारी याने सिनिमा में काम करनेवाली एक्ट्रेस मीना कुमारी?” कमाल म्हणाले, ”हो.” आता मात्र सरदारचा टोन बदलला. तो म्हणाला, ”आज तुम्ही माझे मेहमान आहात. एवढे मोठे कलाकार आमच्या अड्ड्यावर आलेले आहेत. हमारा खुश नसीब है. तुम्ही आज रात्री आमच्याकडे जेवण करा. सकाळी तुमच्या गाड्यांमध्ये पेट्रोल भरून देतो. रात्री आराम करा आणि सकाळी जा. आप हमारे शाही मेहमान हो.” पण मीना कुमारी आणि कमाल अमरोही म्हणाले, ”नाही. आम्हाला आत्ताच गेलं पाहिजे. तुम्ही आम्हाला आत्ताच सोडा.” सरदार पुन्हा पुन्हा विनंती करत होता,” तुम्ही आमचे मेहमान आहात. तुम्हाला काही त्रास होणार नाही. आमच्याकडे जेवण करा आणि सकाळी जा.” पण सर्वजण आत्ताच तिथून बाहेर पडण्याचा आग्रह करत होते. (Bollywood takda)

त्यानंतर सरदार आत गेला आणि बाहेर येताना त्याने त्याच्या हातात एक धारदार सुरा आणला होता. पुन्हा सगळेजण खूप घाबरले. तो म्हणाला, ”घाबरू नका. मी तुम्हाला मारण्यासाठी आणलेलं नाही.” त्याने मीना कुमारीकडे तो सुरा दिला आणि म्हणाला, ”आता तुमच्या हाताने तुम्ही माझ्या हातावर या सुऱ्याने तुमचा ऑटोग्राफ द्या. तुमचे नाव माझ्या हातावर कोरून ठेवा!” मीना कुमारी (Meena Kumari) म्हणाले, ”हे कस कसं शक्य आहे? मला जमणार नाही? रक्त पाहिल्यानंतर मला चक्कर येते.” त्यावर तो म्हणाला, ”तुम्ही माझी कुठली तरी एक गोष्ट ऐकायलाच पाहिजे. तुम्ही इथे थांबायला तयार नाही. जेवण करायला तयार नाही. आराम करायला तयार नाही आणि माझ्यासाठी तुम्ही ऑटोग्राफ देखील देत नाही.”
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
आता सरदारचे ऐकण्याशिवाय पर्याय नव्हता. शेवटी कमाल अमरोहीने मीना कुमारीला सांगितले, ”डोळे घट्ट बंद कर आणि त्याच्या हातावर ऑटोग्राफ दे.” तो हट्टाकट्टा डाकू त्याने हात पुढे केला मीना कुमारीने (Meena Kumari) थरथरत्या हाताने एम इ इ एन ए एवढे लिहिलं आणि ती अक्षरशः चक्कर येऊन पडली. त्या अड्ड्यावरील डाकूनी मीना कुमारीला लगेच गरम चहा आणि खायला दिले. सर्व सिनेमावाल्यांना खायला दिले आणि त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल भरून रात्रीच त्यांची बिदाई केली. जाताना तो डाकू मीना कुमारीच्या पाया पडला आणि माझ्या आयुष्यातील हा सर्वोत्तम दिवस आहे असे सांगितले. काही घोडेस्वार बंदुका घेवून त्यांना शिवपुरीपर्यंत संरक्षण दिले. तिथून बाहेर पडल्यानंतर सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला.
त्यानंतर काही दिवसांनी पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये डाकू अमृतलाल मारला गेला त्यावेळी पेपरमध्ये छापून आले होते की त्याच्या हातावर मीना (Meena Kumari) की अक्षरे होती!