
Mumbai theatres : पूर्वी महिला प्रेक्षकांसाठी स्वतंत्र रांग असे….
आपणा वाचकांपैकी आज देश विदेशात कुठेही असलेल्या अशा साठ आणि सत्तरच्या दशकात गिरगावातील मॅजेस्टिक सिनेमागृह व सेन्ट्रल थिएटर (Mumbai theatres) येथे “स्टाॅलचा प्रेक्षक” म्हणून चित्रपट पाहणाऱ्यांना नक्कीच आठवत असेल या तिकीटासाठी महिला प्रेक्षकांसाठी पूर्णपणे स्वतंत्र रांग असे…
त्या काळातील सगळीकडील एक पडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये पहिल्या चार रांगा या स्टाॅलच्या म्हणून ओळखल्या जात. पडद्याच्या अगदीच जवळ हो. या स्टाॅलसाठीची तिकीट खिडकी चित्रपटाच्या खेळाच्या वेळेच्या वीस मिनिटे अगोदर उघडली जाई. तर स्टाॅलच्या मागचा अप्पर स्टाॅल आणि त्यावरची बाल्कनी यांची तिकीटे आगाऊ म्हणजे चार दिवस अगोदरपासून विकली जात. त्यात पुरुष अथवा स्त्री असा फरक नसे. मात्र पिक्चर सुपर हिट असेल तर या तिकीटासाठीही बरीच रांग असे आणि ती रांग लावण्यास फार कोणाचीच तक्रार नसे. रांगेत उभे राहून “पिक्चरचं तिकीट” काढणे ही जणू एक जीवनशैली. (Mumbai theatres)

शोच्या वेळेस तिकीट काढणे याला करंट बुकिंग म्हणत. चित्रपट रसिकांच्या मागील किमान तीन पिढ्या सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या युगाच्या फ्लॅशबॅकमध्ये रमल्या असतील. कधी एकदा ते लाल, हिरवा, पिवळ्या गर्द रंगाचे तिकीट आपल्या मुठीत येतेय असेच होवून जात असे आणि एकदा का ते तिकीट हाती आले की आपण आणि रुपेरी पडदा यातील अंतर पार व्हायला आता फारसा वेळ नाही याने मन सुखावून जात असे. अशा आशावादी व स्वप्नाळू वर्गानेच आपल्या देशात चित्रपट रुजवला.
मी गिरगावातील खोताची वाडीत लहानाचा मोठा होताना मॅजेस्टिक व सेन्ट्रल चित्रपटगृहातील (Mumbai theatres) स्टाॅलच्या तिकीटासाठी महिलांसाठी वेगळी रांग असे हे अनुभवलयं (तेव्हा कुठे हो कल्पना होती की अनेक वर्षांनंतर ग्लोबल युगातील डिजिटल पिढीला या आठवणी सांगायची वेळ येईल ते). तो काळ प्रामुख्याने सहकुटुंब सहपरिवार चित्रपट पहायला जाण्याचा होता. मॅजेस्टिकला प्रामुख्याने मराठी चित्रपट प्रदर्शित होत. झेप, अपराध, दाम करी काम, मुंबईचा जावई, अशीच एक रात्र होती असे अनेक मराठी चित्रपट तसेच बलराम श्रीकृष्ण वगैरे पौराणिक चित्रपट मॅजेस्टिकला प्रदर्शित झाले. मॅजेस्टिकवरचे आडवे डेकोरेशन पाहण्यासारखे असे. सेन्ट्रलला कुंकवाचा कंरडा, सतीचं वाण, पिंजरा, दादा कोंडके यांचे चित्रपट असे अनेक मराठी तसेच संजोग, बचपन, पारस, हमजोली असे अनेक हिंदी मनोरंजक चित्रपट प्रदर्शित झाले.
==============
हे देखील वाचा : Prem Kahani : प्रेम कहानी मे एक लडका होता है एक लडकी होती है
==============
मॅजेस्टिकला डाव्या बाजूस स्टाॅलची तिकीट खिडकी होती. त्यात पुरुष रांग लावत. तर महिला प्रेक्षकांना मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश देण्यात येऊन तिकीट दिले जाई. त्या महिला आपला पती व मुले यांची तिकीटे काढत असे. तिकीट हाती येताच सहकुटुंब आनंद व्यक्त होई. सेन्ट्रल चित्रपटगृहात स्टाॅलसाठी पुरुष प्रेक्षकांना गोरेगावकर लेनच्या बाजूने निमुळत्या गेटने रांग लावावी लागे. तर महिला प्रेक्षकांना तिकीट खिडकीच्या उजव्या बाजूने तिकीट मिळे. त्या काळातील महिला सहकुटुंब चित्रपट पहायला जात, साहजिकच त्या तिकीट काढून आपल्या कुटुंबाला दिलासा देत. (Bollywood mix masala)
मला आठवतंय मॅजेस्टिक, सेन्ट्रल (Mumbai theatres) येथे त्या काळात स्टाॅलचे तिकीट एक रुपया तर काही वर्षांनी दीड रुपया होते. आज हे दर किरकोळ वाटतात पण सत्तरच्या दशकाच्या पूर्वार्धात मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबात मासिक सहाशे साडेसहाशे रुपये म्हणजे मोठाच आनंद असे आणि तो पुरेदेखिल. पण महिन्यात एक मराठी व एक हिंदी चित्रपट पाहण्याची सवय होती. मॅजेस्टिक चित्रपटगृह १९७३ साली बंद पडून पाडले गेल्यावर गिरगावातील मराठी चित्रपट प्रेमी हळहळला. ते पुन्हा सुरु होणार अशी बातमी हवेत विरली. सेन्ट्रल त्यानंतर अगदी कोरोनाच्या काळापर्यंत सुरु होते. दरम्यान दोन गोष्टी झाल्या. ऐंशीच्या दशकात महिलांसाठीची रांग मागे पडली, ती गेलीदेखील आणि त्यानंतर या चित्रपटगृहाचे नाव सेन्ट्रल प्लाझा झाले. आता सेन्ट्रलही बंद झालेय.

डाॅ. भडकमकर मार्गावरील स्वस्तिक चित्रपटगृहातही अनेक वर्ष स्टाॅलसाठी महिला प्रेक्षकांना स्वतंत्र रांग असे. महिला प्रेक्षकांसाठीचा आदर हीच त्यामागे भावना असे. धोबीतलाव येथील एडवर्ड या चित्रपटगृहात दोन बाल्कनी होत्या. पायर्या चढून वर जावे लागे. विशेष उल्लेखनीय गोष्ट अनेक वर्ष अगदी वरच्या बाल्कनीचे तिकीट महिला प्रेक्षकांना दिले जात नसे. याच कारण, तेथे जाताना त्या पायर्यांत महिला प्रेक्षकांची साडी अथवा अन्य पोशाख अडकू नये अशीच त्यामागे भावना असे. ही सगळीच इंग्रजकालीन चित्रपटगृह. त्यांनीच या प्रथा आणल्या आणि मग त्या रुजल्या. कालांतराने त्या कालबाह्य झाल्या हा भाग वेगळा.
फार पूर्वी एखाद्या नायिकाप्रधान चित्रपटाचा शनिवारी दुपारी तीन वाजताचा वा संध्याकाळी सहा वाजताचा खेळ खास फक्त महिला प्रेक्षकांसाठी असे. स्टाॅल, अप्पर स्टाॅल व बाल्कनी महिला प्रेक्षक आणि दोन तीन चाळीतील महिला प्रेक्षक त्याला हमखास गर्दी करत. त्या काळात जवळपास प्रत्येक कुटुंबात तीन चार मुले मुली असत. हे सगळेच घरच्या खावूचा डबा आणि प्लॅस्टिकच्या बाटलीत पाणी भरुन नेत. पिक्चर सुरु होताच बच्चे कंपनी एकच कल्ला करत. आपल्या देशात चित्रपट पाहणे म्हणजे एक प्रकारचे सेलिब्रेशन असते ते अशा गोष्टीतून अधोरेखित होते. (Mumbai theatres)

नाझ चित्रपटगृहात (Mumbai theatres) बाल्कनीच्या खाली अप्पर स्टाॅलच्या मधोमध मागे एक क्राय रुम होती. चित्रपट सुरु असतानाच तान्हुलं बाळ रडलं तर आई त्याला त्यात घेऊन जात असे. त्यामुळे अन्य प्रेक्षकांना त्याच्या रडण्याचा त्रास होत नसे. (त्या काळात लहान मुलांना बेबी सिटींगमध्ये ठेवण्याचे फॅड आले नव्हते. कोणत्याच चित्रपटगृहात लहान बाळासाठी तिकीट नसे.)
राजश्री प्राॅडक्सन्सच्या वतीने महिला प्रेक्षकांना आकृष्ट करण्यासाठी विविध गोष्टी करे. त्यात त्यांनी राखी गुलजारची प्रमुख भूमिका असलेल्या “तपस्या” या चित्रपटाच्या गंगा चित्रपटगृहात प्रत्येक महिला प्रेक्षकांसाठी राखीचा पोस्ट कार्ड साईज फोटो भेट दिला जाई. दोन आठवडे असे करताना चित्रपटाची गर्दी वाढली आणि चित्रपटाची चर्चा देखील. विजय कोंडके निर्मित, दिग्दर्शित व वितरीत “माहेरची साडी” ग्रामीण भागात दूरवर पोहचला. त्यात काही ठिकाणी तिकीटाच्या लकी ड्राॅवर एक साडी भेट दिली जाई. आपण तो नशीबवान प्रेक्षक ठरु अशी अनेक प्रेक्षकांना नक्कीच आशा असे. या सगळ्यातून प्रेक्षक चित्रपटगृह व त्यातील चित्रपटाशी जोडला जात असे. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. (Untold stories)

चित्रपट आणि महिला प्रेक्षक यांचे नाते असे बहुस्तरीय आणि वेगळे. अगदी पूर्वापार चालत आलेले. महिला दिनानिमित्त हा एक वेगळा फ्लॅशबॅक. आपल्याकडील चित्रपट रसिक संस्कृती अशी अनेक गोष्टींसह वाटचाल करतेय. चित्रपट माध्यम व व्यवसाय प्रगती करत असतानाच या गोष्टीवर फोकस हवाच. (Mumbai theatres)