पद्मिनी कोल्हापूरेच्या थोबाडीत मारण्यासाठी वापरला न्यूटनचा नियम!
कधीकधी छोट्याशा गोष्टीतून देखील विज्ञान समजावून सांगता येतं, समजून घ्यावं लागतं. याचा प्रत्यय राज खोसला यांना त्यांच्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान आला. १९८२ साली राज खोसला त्यांच्या ‘तेरी मांग सितारो से भर दू’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. या चित्रपटात नूतन, पद्मिनी कोल्हापुरे, राजकिरण, अमजद खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. यात नूतन आणि पद्मिनी कोल्हापूरे (Padmini Kolhapure) या आई आणि मुलीच्या भूमिकेत होत्या.
चित्रपटातील एका प्रसंगात नूतन, पद्मिनी कोल्हापूरेच्या (Padmini Kolhapure) श्रीमुखात थप्पड लगावते. असा शॉट चित्रित करायचा होता. या प्रसंगात त्यांच्यासोबत अमजद खान देखील उपस्थित होते. त्यामुळे एका फ्रेममध्ये एका बाजूला पद्मिनी कोल्हापुरे मध्ये अमजद खान आणि त्यांच्या बाजूला नूतन अशी सेटींग लावली होती. अत्यंत रागारागात आई मुलीच्या तोंडात मारते अशी सिच्युएशन होती.
‘लाईट कॅमेरा ॲक्शन’ असं म्हटल्यानंतर नूतनने पद्मिनीच्या (Padmini Kolhapure) तोंडावर थप्पड मारली. राज खोसला यांनी लगेच ‘कट’ म्हटलं. तो शॉट काही बरोबर झाला नाही. पुन्हा रिटेक केला. नंतरदेखील राज खोसला पुन्हा ‘कट, म्हणाले. त्यांच्या मनाप्रमाणे शॉट काही झाला नाही. असं तब्बल आठ वेळा झालं.
आता मात्र पद्मिनी कोल्हापुरेच्या (Padmini Kolhapure) डोळ्यातून धारा वाहू लागल्या. आठ थपडा खाल्ल्यानंतर देखील शॉट ओके होत नाही म्हणून राज खोसला यांनादेखील आश्चर्य वाटलं. नूतनसारखी अभिनेत्री असून देखील तिला आठ आठ रिटेक कसे घ्यावे लागत आहेत, हा प्रश्न त्यांना पडला. या विचारात असतानाच त्यांचे कॅमेरामन प्रताप सिन्हा राज खोसला यांच्या जवळ आले आणि त्यांना म्हणाले “हा शॉट बरोबर न येण्याचे कारण या दोघींमध्ये उभा असलेला अमजद खान.”
राज खोसला यांना आश्चर्य वाटले. त्यांनी कारण विचारले असता त्यांनी सांगितले “अमजद खान खूप जाडजूड आणि लठ्ठ असल्यामुळे नूतनला पद्मिनीला थप्पड मारता येत नाही. तिच्या हातात फोर्सच येत नाही. कारण नूतनला हात खूप लांब करून पद्मिनीला थप्पड मारावी लागते.”
राज खोसला तरी गप्पच होते. त्यांना काही समजत नव्हतं. तेव्हा कॅमेरामन प्रताप सिन्हा यांनी, “मी फिजिक्सच्या भाषेत सांगतो. न्यूटन यांचा गतिविषयक दुसरा नियम असा आहे संवेग परिवर्तनाचा दर हा त्याच्यावर लावलेल्या बलाशी समानुपाती असतो. याचा अर्थ गती आणि बल यांना जर व्यवस्थित दिशा मिळाली तरच कृती घडू शकते.”
=============
हे देखील वाचा – जेव्हा चारचौघात अमिताभ बच्चन यांच्या श्रीमुखात थप्पड लगावली जाते….
=============
राज खोसला यांना सुरुवातीला काहीच कळलं नाही. त्यावर कॅमेरामन प्रताप सिन्हा यांनी सांगितलं, “आता सोप्या भाषेत सांगतो. तुम्ही अमजद खान यांची शॉट मधली जागा बदला.” आता पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) आणि नूतन या शेजारी शेजारी उभ्या राहिल्या आणि पलीकडे अमजद खान उभे राहीले. आता नूतनच्या हाताच्या आवाक्यात पद्मिनी आली आणि तिला थप्पड व्यवस्थित बसली. शॉट ओके झाला. अशाप्रकारे न्युटनचा गतीविषयक दुसरा नियम इथे कामी आला.