Subodh Bhave लवकरच आणखी एका बायोपिकमध्ये झळकणार; हिंदीत साकारणार ‘ही’

पं. बिरजू महाराज (Pandit Birju Maharaj): कथ्थकमधील ‘महामेरू’!
आजच्या या डिजिटल युगात संगीत कलेचे स्वरूपही बदलताना दिसत आहे. शास्त्रीय गायनामधील खर्जातल्या धीरगंभीर आलपापेक्षा रसिकांना आवडतात डीजेवाल्या बाबची कर्णकर्कश्य आवाजातली गाणी. जी गोष्ट गायनाची तीच नृत्याची.
नृत्याच्या अनेक ‘रिअॅलिटी शोज्’मध्ये नृत्य आणि सर्कस यांमधील फरक न ओळखू शकणारे कलाकार पाहून खऱ्या अभिजात कलेची व हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत उरलेल्या काही कसलेल्या कलावंतांची आठवण होते. यामधील एक नाव म्हणजे पंडित बिरजू महाराज! पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाने या सच्च्या कलाकारांमधील एक ध्रुवताराच जणू गळून पडला. त्यामुळेच नृत्य आणि जीवन भरभरून जगलेले पंडित बिरजू महाराज यांचे जाणे मनाला चटका लावून गेले.
कथ्थक हा भारतातील एक प्राचीन नृत्यप्रकार आहे. जयपुर, वाराणसी, लखनऊ ही त्यातील मुख्य घराणी. बघायला गेलं तर, भारताच्या इतर नृत्यप्रकारांच्या तुलनेत कथ्थकचा पेहराव एकदम साधा आणि सरळ. या कथ्थक नृत्यप्रकाराला सामान्य माणसाच्या कक्षेत आणलं पंडित बिरजू महाराजांनी. बिरजू महाराजांना आधुनिक कथ्थक नृत्याचे शिल्पकार, प्रसिद्ध कथ्थक सम्राट, पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज अशा विविध उपाधींसह ओळखले जात असे.

बिरजू महाराजांचा जन्म ४ फेब्रुवारी १९३८ रोजी झाला. पंडित बिरजू महाराजांचे वडील म्हणजे लखनऊच्या प्रसिद्ध कालका-बिंदादीन घराण्यातील ‘अच्छन महाराज’. बिरजू महाराजांचे खरे नाव होते ‘ब्रिजमोहन मिश्रा’. बिरजू हे त्यांचे बालपणीचे नाव. वयाच्या चौथ्या वर्षी आपले काका शंभू महाराज, लच्छू महाराज आणि वडील अच्छन महाराज यांच्याकडून बिरजू यांना कथ्थकचे धडे मिळू लागले. त्यांच्या अलाहाबादच्या घरात एक नृत्यखाना होता, जिथे दिवसभर नर्तन चालत असे. त्यामुळे पारंपरिक शिक्षण सुरू होण्यापूर्वीच घरातील या नृत्यखान्यातील घुंगरांचा नाद बिरजूंच्या नसानसात भिनलेला होता. कथ्थक करण्यापूर्वीच बाल बिरजूची बोटे तबल्याच्या ठेक्यावर तालबद्ध नर्तन करू लागली होती.
=====
=====
लहान बिरजूला तबला वादन, गायन अशा सर्वच कलांचे निसर्गदत्त वरदान लाभलेले होते. त्यातून आता एक कथ्थक नर्तक साकारू लागला. वयाच्या अगदी सातव्या वर्षी बिरजूने आपला पहिला नृत्याविष्कार सादर केला आणि तेराव्या वर्षात पदार्पण करतानाच बिरजू नृत्यगुरू बनले ते शेवटच्या श्वासापर्यंत. त्यानंतर बिरजू महाराजांचा लौकिक वाढू लागला. संगीत भारती, भारतीय कला केंद्र, कथ्थक कला केंद्र अशा संस्थामधून कथ्थकचे गुरू म्हणून कलादान करत ते स्वतः स्थापन केलेल्या ‘कलाश्रम’ या संस्थेचे महागुरू झाले.
बिरजू महाराजांनी अनेक नृत्यनाट्यांची रचना केली. त्यातील काही प्रसिद्ध आणि लोकप्रिय नावे म्हणजे- ‘फाग-लीला’, ‘मालती-माधव’, ‘कुमार संभव’, इ. देवदास, देढ इश्किया, उमराव जान आणि बाजीराव मस्तानी यांसारख्या चित्रपटांसाठी बिरजू महाराज यांनी नृत्यदिग्दर्शन देखील केलं आहे. याशिवाय सत्यजित रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या चित्रपटातही त्यांनी नृत्यदिग्दर्शन केलं होतं.

बिरजू महाराज यांना १९८३ मध्ये पद्मविभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. यासोबतच त्यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार’ आणि ‘कालिदास सन्मान’ही मिळाला आहे. बनारस हिंदू विद्यापीठ आणि खैरागड विद्यापीठानेही बिरजू महाराजांना ‘मानद डॉक्टरेट’ बहाल केली होती.
२०१६ साली त्यांना उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनासाठीचे ‘फिल्मफेअर अवॉर्ड’ ’देखील मिळाले होते. परंतु लखनौ घराण्याच्या नृत्यशैलीला कुठल्याही फ्युजनशिवाय नित्यनूतन ठेवत अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवणे, ही महाराजांची खरी कमाई आहे. बिरजू महाराजांची विशेष कौतुकाची गोष्ट म्हणजे त्यांनी इतर नृत्यप्रकारांचा सन्मानही केला. महाराज तबला, पखवाज, हार्मोनिअम अशी कितीतरी वाद्ये उत्कृष्टपणे वाजवत. गायन हे महाराजांचे एक विशेष अंग. त्यांनी गायनाचेदेखील काही कार्यक्रम सादर केले आहेत.
=====
हे देखील वाचा: अग्निपथाचा पांथस्थ….. हरिवंशराय बच्चन
=====
नृत्य, गायन, वादन, नाट्य, चित्रकला यांचा देखणा आविष्कार, बाव्वानकशी सोनं १७ जानेवारी २०२२ रोजी हरपला. आधुनिक कथ्थक नृत्याचे शिल्पकार म्हणून ओळखले गेलेले प्रसिद्ध कथ्थक सम्राट, पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांचे ८३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. लखनऊमधील दरबारी कथ्थक ते जगभरच्या नृत्यमहोत्सवातील नाविन्यपूर्ण कथ्थक नृत्याविष्काराचा चेहरामोहरा असलेले एकमेवाद्वितीय गुरूतुल्य व्यक्तिमत्व शांतवले.