
Rajesh Khanna : “जिंदगी एक सफर है सुहाना यहा कल क्या हो किसने जाना….”
या वर्षी ‘शोले’ या चित्रपटाने पन्नास वर्षे पूर्ण केले आहेत. पण तुम्हाला या चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट कोणता होता माहिती आहे कां? ३० एप्रिल १९७१ रोजी एक रोमँटिक ड्रामा फिल्म प्रदर्शित झाली होती ‘अंदाज.’ हाच रमेश सिप्पी यांनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता. ‘अंदाज’ हा चित्रपट आज आठवला जातो तो राजेश खन्ना साठी. खरं तर या चित्रपटात राजेश खन्नाचा गेस्ट अपिअरन्स होता. अगदी काही मिनिटांची भूमिका त्याच्या वाट्याला या चित्रपटात आली होती. पण या छोट्याशा भूमिकेने चित्रपटाला प्रचंड मोठे यश मिळवून दिले.
रमेश सिप्पी दिग्दर्शक म्हणून पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाले. या सिनेमाची कथानक तसे काळाच्या पुढचे होते. एक विधवा आणि एक विधुर यांच्यातील नातेसंबंधावर हा चित्रपट होता. भारतीय प्रेक्षकांना हा विषय कितपत रुचेल याची शंका दिग्दर्शकाला होती. पण त्यांनी या सिनेमाला इतती चांगले ट्रीटमेंट दिली की चित्रपट केवळ यशस्वी च झाला नाही तर आज पन्नास वर्षानंतर देखील हा सिनेमा प्रेक्षकांना अपील होतो. राजेश खन्नाला या सिनेमात गेस्ट अपिअरन्स भूमिका देण्याची त्यांची आयडिया जबरदस्त हिट झाली. खरं तर तेव्हा राजेश खन्ना सुपरस्टार पदावर आरूढ झाला होता. गेस्ट रोलसाठी तो हो म्हणेल की नाही याची शंका दिग्दर्शकाला होती. पण सलीम जावेद आणि सिप्पी यांनी राजेश खन्नाला या भूमिकेचे महत्त्व आणि या सिनेमातील त्याचा इम्पॅक्ट समजावून सांगितला आणि राजेश खन्ना तयार झाला.

रमेश सिप्पी यांना नुसता गेस्ट अपिअरन्स नको होता तर राजेश खन्नावर चित्रित एक गाणं देखील हवं होतं. हसरत जयपुरी यांना त्यांनी गाण्याची सिच्युएशन सांगितले. “ज्या कॅरेक्टर वर हे गाणे चित्रित होणार आहे त्या कॅरेक्टरचा मृत्यू होणार असल्यामुळे थोडेसे फिलॉसॉफिकल वर्ड त्यामध्ये असू द्या” असं त्यांनी सांगितलं. हसरत जयपुरी यांनी दहा दिवसाच्या मेहनतीनंतर हे गाणं लिहिलं. आयुष्याचं सार या गाण्यात फार चांगल्या पद्धतीने मांडलं होतं. आजचा दिवस भरभरून जागून घ्या . जे काही आहे ते आजच आहे. उद्याचा काय भरवसा? हे तत्वज्ञान यात मांडलं गेलं होतं. (दुर्दैव पाहा हे गाणं ज्यांनी संगीतबद्ध केलं होतं ते संगीतकार जय किशन यांचे गाण्याच्या रेकॉर्डिंग नंतर काही महिन्यातच वयाच्या अवघ्या चाळीशीत निधन झाले. यहां कल क्या हो किसने जाना… हे दुर्दैवाने त्यांना लागू पडलं!)
या चित्रपटातील अन्य सर्व गाण्यात (सुनलो सुनाता हूं तुमको कहानी, दिल उसे दो जो जान दे दे, है ना बोलो बोलो ) रफी यांचा स्वर होता. कारण या चित्रपटाचा नायक तसा शम्मी कपूर होता आणि हि सर्व गाणी त्यांच्यावर चित्रित होणार होती. पण जेव्हा राजेश खन्नासठी गाणं लिहिलं गेलं तेव्हा हे गाणं किशोर कुमार यांच्या आवाजात रेकॉर्ड करायचे ठरले. संगीतकार शंकर जयकिशन यांनी किशोर कुमारला रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये बोलावले आणि त्यांना गाण्याची ट्यून ऐकवली. किशोरला ही ट्यून खूप आवडली. तो म्हणाला ,”या गाण्यात तर साऱ्या जीवनाचे तत्त्वज्ञान मांडले आहे!”

डोळे मिटून त्यांनी गाण्यातील सर्व भाव आपल्या स्वरात कशा पद्धतीने आणता येतील याचा विचार केला. आणि मोठ्या मस्तीमध्ये त्याच्या टिपिकल याडेलिंग स्टाईल चा उपयोग करून हे गाणं गायलं. या गाण्याला एक मस्त नैसर्गिक वेग होता. मुंबईच्या मरीन ड्राइव्ह वर मोटरसायकलवर हेमामालिनी सोबत हे गाणं चित्रीत झालं. नंतर दिग्दर्शकांनी याच गाण्याच्या आणखी दोन वर्जन तयार केले. एक आशा भोसले च्या आवाजात जे चित्रपटात हेमामालिनी वर चित्रित झालं होतं आणि याच गाण्याचे सॅड व्हर्जन मोहम्मद रफी यांच्या आवाजात रेकॉर्ड केलं गेलं ते चित्रपटात शम्मी कपूरवर चित्रित झालं. रफीच्या आवाजातील हे गाणं ऐकणं हा देखील एक खूप सुंदर अनुभव आहे या तिन्ही गाण्याच्या लिंक मी खाली दिलेल्या आहेत. तुम्ही जरूर ऐका.
================================
हे देखील वाचा : Rajesh Khanna यांनी ‘आराधना’त काम करायला का नकार दिला होता?
================================
‘अंदाज’ या चित्रपटाचा प्रीमियर बेंगलोरला झाला होता. तिथे थियेटरला जाताना तब्बल दहा किलोमीटर पर्यंत राजेश खन्नाच्या फॅन्स नी त्याला पाहण्यासाठी दुतर्फा रस्त्यावर गर्दी केली होती आणि सर्व जण राजेश खन्नाच्या नावाने ते जल्लोष करत होते. राजेश खन्ना न एका मुलाखतीत सांगितले,” हे सर्व पाहून मला असे वाटले की मी परमेश्वराच्या जवळ पोहोचलो आहे. पण फॅन्सी एवढे प्रेम कधी कधी खूप घाबरल्यासारखे होते. जवाबदारीचे दडपण येते“. राजेश खन्नाने या मुलाखतीत पुढं सांगितलं,” त्या रात्री माझ्या डोळ्यातून अखंड अश्रूंच्या धारा वाहत होत्या. प्रेक्षकांचे एवढे प्रेम मी कमवू शकलो. याचं माझं मलाच आश्चर्य वाटत होतं.” ‘अंदाज’ हा चित्रपट 1971 सालचा चा सुपरहिट सिनेमा होता. त्या वर्षीच्या फिल्म फेअर पुरस्कारामध्ये किशोर आणि आशा या दोघांना ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ या गाण्यांसाठी नॉमिनेशन मिळाले होते. हसरत जयपुरी यांना मात्र या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गीतकार पुरस्कार मिळाला. शंकर जयकिशन यांना देखील नामंकन मिअले होते. त्यावर्षीच्या बिनाका गेला गीत मला मध्ये मात्र वर्षातील सर्वोत्कृष्ट गीत म्हणून ‘जिंदगी एक सफर है सुहाना’ या गाण्याला सन्मान मिळाला.