मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पोस्टमधून दिला ‘सवतीचे कुंकू’ चित्रपटाच्या आठवणींना
फेशियल पॅरॅलिसिस असताना अनुपम खेर यांनी हा शॉट शूट केला…
“संकटापेक्षा संकटाची चाहूल जास्त भीतीदायक असते”, असं म्हणतात. अगदी खरं आहे. कारण ज्यावेळी खरोखरच संकट समोर उभं राहतं त्यावेळेला आपोआपच माणसाची हिम्मत वाढलेली असते. पण संकट येण्यापूर्वी त्याचं सावटच माणसाला खूप घाबरवत असते. असाच काहीसा प्रकार अभिनेते अनुपम खेर यांच्याबाबत झाला होता. परंतु त्यांनी अतिशय हिमतीने संकटाशी दोन हात केले आणि त्यावर मात केली.
हा किस्सा जितका रोचक आहे तितकाच तो मार्मिक आहे. कारण यातून तुम्हाला एक संदेश मिळतो; तो म्हणजे, संकटाला घाबरून जर तुम्ही तुमचं नित्य कर्म बंद केलं, तर आयुष्यात पुन्हा तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकत नाही. हा किस्सा आहे १९९४ सालचा. ज्यावेळी राजश्री प्रॉडक्शनच्या ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाचे चित्रीकरण चालू होते. या चित्रपटात सलमान खान, माधुरी दीक्षित, रेणुका शहाणे, अनुपम खेर, रिमा लागू, आलोकनाथ यांच्या प्रमुख भूमिका होत्या. चित्रपटाचे दिग्दर्शन सुरज बडजात्या यांनी केले होते, तर संगीत राम लक्ष्मण यांचे होते. या चित्रपटाच्या चित्रीकरण्याच्या दरम्यान अनुपम खेर (Anupam Kher) यांना एका मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता.
एका संध्याकाळी अनुपम खेर अनिल कपूर यांच्या घरी डिनर साठी गेले होते. त्यावेळी अनिल कपूर यांच्या पत्नी सुनीता कपूर यांनी अनुपम यांना सांगितले, “तुमच्या डाव्या डोळ्याची अजिबात उघडझाप होत नाही.” अनुपम यांच्या ही गोष्ट लक्षातच आली नव्हती. त्यांना वाटले की, कदाचित भरपूर जागरण झाल्यामुळे किंवा परिश्रम झाल्यामुळे असे होत असावे. त्यांनी दुर्लक्ष केले. सकाळी उठल्यानंतर ब्रश करताना त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या तोंडातून आपोआप पाणी खाली येत आहे. तसेच आंघोळ करताना डोळ्यात साबण गेला तरी त्यांना डोळा बंद करता आला नाही. हे काहीतरी विचित्र घडते आहे, असं त्यांच्या लक्षात आले.
दुपारी त्यांची यश चोप्रा यांच्यासोबत मीटिंग होती. त्यावेळेला यशजींनीही ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली. यश चोप्रा यांनी ही बाब मोठी गंभीरपणे घेतली आणि त्यांनी ताबडतोब बॉम्बे हॉस्पिटलला जाऊन न्यूरोलॉजिस्ट डॉ. सिंगल यांची भेट घ्यायला सांगितले. त्यांनी ताबडतोब तिथूनच फोन केला आणि त्यांची अपॉइंटमेंट घेतली. अनुपम खेर लगेच बॉम्बे हॉस्पिटलला गेले.
डॉक्टरांनी अनुपम खेर (Anupam Kher) यांना तपासले त्यावेळेला त्यांचा चेहरा गंभीर झाला आणि ते म्हणाले, “तुम्हाला फेशियल पॅरॅलिसिसचा अटॅक आला आहे. त्यामुळे तुमच्या चेहऱ्याची डावी बाजू खेचली जात आहे. या गोळ्या मी सुरू करत आहे. पुढचे दोन वर्ष दोन महिने तुम्ही अजिबात कुठलेही काम करायचे नाही. फक्त आराम करायचा. हा मोठा गंभीर मामला आहे.” अनुपम खेर डॉक्टरांची वार्ता ऐकून थोडे गंभीर झाले.
हॉस्पिटलमधून निघाल्यावर खाली येऊन आपल्या गाडीत बसले. असिस्टंटला सारा प्रकार सांगितला. त्यावेळी त्यांनी आपल्या असिस्टंटकडे पाणी प्यायला मागितले. असिस्टंटने पाण्याच्या ग्लासमध्ये स्ट्रा टाकून त्यांना दिले. हे पाहिल्यावर अनुपम यांनी विचार केला, जर आजाराला घाबरून मी दोन महिने घरी बसलो, तर पुन्हा मी कधीच उभा राहू शकणार नाही. आता हीच वेळ आहे या आजारासोबत दोन हात करण्याची..
त्यावेळी अनुपम यांची कारकीर्द चांगला आकार घेत होती. फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये ‘हम आपके है कौन’ या चित्रपटाचा सेट लागला होता आणि तिथे ‘हसता हुवा नूरानी चेहरा’ असे म्हणत उशी पास करत करत गमतीच्या खेळाचे चित्रीकरण करायचे होते. अनुपम खेर (Anupam Kher) यांनी ठरवले आपण डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या घ्यायच्याच पण काम थांबवायचे नाही. सेटवर गेल्यानंतर त्यांनी सूरज, सलमान, माधुरी दीक्षित या सर्वांना आजाराची कल्पना दिली आणि सांगितले, “मला फेशियल पॅरलेसिस झालेला आहे. त्यामुळे बोलताना माझा चेहरा डाव्या बाजूला खेचला जात आहे आणि त्यामुळे माझे फेशियल एक्सप्रेशन संपूर्णपणे बदललेले आहे. तरी देखील मी आज चित्रीकरण करणार आहे.” अनुपम खेर यांचा आत्मविश्वास पाहून सुरज बडजात्या यांनी त्यांच्या त्यावेळच्या परिस्थितीला साजेसा असा सीन लिहिला ज्यामध्ये अनुपम खेर यांना ‘शोले’ मधील धर्मेंद्रच्या अभिनयाची नक्कल करायची होती.
========
हे देखील वाचा : जेव्हा खुद्द दिलीपकुमार खजील झाले…
========
“गांव वाले मैं जा रहा हूं भगवान आ रहा हूं…. दारू प्यायल्यावर बोलताना चेहऱ्याची जी हालचाल होते तसाच चेहरा अनुपमचा आजाराने होत होता. या प्रसंगात कुठेही अनुपम खेर यांचे क्लोज अप्स त्यांनी घेतले नाहीत आणि फेशियल पॅरलेसिस असताना अनुपम यांनी व्यवस्थित चित्रीकरण केले. नंतर काही दिवसांतच औषधांचा परिणाम दिसू लागला आणि अनुपम खेर पूर्ववत झाले. त्यानंतर सुरजने पुन्हा काही क्लोज अप्स घेऊन हा शॉट ओके केला. अनुपम खेर (Anupam Kher) यांनी मोठ्या हिमतीने त्यांच्या फेशियल पॅरलेसीसवर मात केली. हा किस्सा त्यांनी रजत शर्मा यांच्या आपकी अदालत या कार्यक्रमात सांगितला होता.