द बर्निंग ट्रेन : रोमहर्षक सवारीची ४१ वर्षे
भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिलीवहिली डीझास्टर फिल्म म्हणून नावाजल्या गेलेल्या ‘द बर्निंग ट्रेन’ला आज ४१ वर्षे पूर्ण झाली आहेत. चित्रपटाची कथा एका वाक्यात सांगायची झाली तर: दिल्लीहून मुंबईला निघालेल्या सुपर एक्स्प्रेसला तिच्या पहिल्याच प्रवासात आग लागते आणि मग सुरु होतो एक जीवघेणा, थरारक खेळ बी. आर. चोप्रा निर्मित आणि रवी चोप्रा दिग्दर्शित ‘द बर्निंग ट्रेन’ (The Burning Train) हा त्यावेळचा ‘काळाच्या पुढचा सिनेमा’ होता असं म्हणायला हरकत नाही. आज हा चित्रपट एक दर्जेदार कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जातो.
या हॉलीवूडपटांची कॉपी आहे ‘द बर्निंग ट्रेन’!
‘द बर्निंग ट्रेन’ची कथा स्वतः दिग्दर्शक रवी चोप्रा यांनी लिहलेली असली तरी चित्रपटावर काही गाजलेल्या हॉलीवूडपटांचा प्रभाव असल्याचे सांगितले जाते. त्यापैकी सर्वाधिक श्रेय जाते ते १९७५ साली आलेल्या ‘द बुलेट ट्रेन’ या जपानी चित्रपटाला. या चित्रपटातील ट्रेन अतिरेक्यांनी बॉम्ब लावून हायजॅक केल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळालं होतं. त्याचसोबत ‘द टॉवरिंग इन्फर्नो’ (१९७४) आणि ‘द कॅसांड्रा क्रॉसिंग’ (१९७६) या चित्रपटांच्या कथानकाचा प्रभावही ‘द बर्निंग ट्रेन’च्या मूळ कथेवर दिसून येतो. या तिन्ही चित्रपटांमधील बॉम्बस्फोट, आप्तस्वकीयांची कट-कारस्थाने अश्या काही महत्त्वाच्या घटनांचा आधार घेऊन ‘द बर्निंग ट्रेन’ची कथा गुंफण्यात आली होती.
शम्मी कपूर आणि अमिताभ होते पहिली पसंती!
‘द बर्निंग ट्रेन’ची अधिकृत घोषणा केली गेली ७ ऑगस्ट १९७६ला! त्यावेळी फिल्मच्या ठरलेल्या स्टारकास्टमध्ये शम्मी कपूर आणि अमिताभ ही दोन मोठी नावेही शामिल होती. या चित्रपटातील विनोद खन्नाच्या मित्राच्या अर्थात अशोकच्या भूमिकेसाठी सर्वप्रथम शम्मी कपूर यांना विचारण्यात आले होते. पण इतकी मोठी स्टारकास्ट घेऊन हा चित्रपट बनवायला किमान पाच वर्षे लागतील, हे समजल्यावर अमिताभ आणि शम्मीने तारखांच्या कारणास्तव या प्रोजेक्टमधून माघार घेतली आणि सुदैवाने शम्मी साकारत असलेली भूमिका धर्मेंद्रला मिळाली. त्याचबरोबर अमिताभच्या वाट्याला आलेली भूमिका जितेंद्रच्या पदरी पडली आणि दोघांनीही आपल्या अभिनयातून त्यांचं स्टारडम सिद्ध केलं. विनोद खन्ना, धर्मेंद्र, जितेंद्र, परवीन बाबी, हेमामालिनी, नीतू सिंग, डॅनी डँग्जोग्पा, नवीन निश्चल, विनोद मेहरा अशी कलाकारांची भलीमोठी फौज असलेला हा चित्रपट ऐंशी-नव्वदीच्या दशकांतील सर्वोत्तम मल्टीस्टारर सिनेमांपैकी एक मानला जातो.
फिल्मच्या बजेटसाठी पाच वर्षांत बनल्या ३ सुपरहिट फिल्म्स!
‘जमीर’ हिट झाल्यानंतर रवी चोप्रा ‘द बर्निंग ट्रेन’च्या दिग्दर्शनाकडे वळले. या चित्रपटासाठी भरपूर खर्च होणार होता. प्रगत तंत्रज्ञान, कलाकारांची फौज, मोठे सेट्स आणि चित्रीकरणाचा प्रदीर्घ कालावधी लक्षात घेता सुरुवातीला ठरवलेल्या बजेटमध्ये हा सिनेमा बनणे अशक्य होते. त्यावेळी या चित्रपटाचे निर्माते बी. आर. चोप्रा यांनी आणखी तीन नव्या चित्रपटांची निर्मिती केली, जे फारच कमी बजेटमध्ये बनूनही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. हे तीन चित्रपट म्हणजे ‘कर्म’, ‘पती पत्नी और वो’ आणि ‘इन्साफ का तराजू’ होय. दस्तुरखुद्द बी. आर. चोप्रा दिग्दर्शित या तिन्ही चित्रपटांनी सुदैवाने तिकीटबारीवर चांगलाच गल्ला जमवला आणि ‘द बर्निंग ट्रेन’च्या बजेटला मोठा हातभार लावला.
असा बनला ‘द बर्निंग ट्रेन’चा टायटल ट्रॅक!
संगीतक्षेत्रातला ‘बॉस’माणूस पंचमदांची जादू प्रेक्षकांना या गाण्यात मंत्रमुग्ध करते. हे गाणं चित्रपटाची पूर्ण कथा त्याच्या संगीतामधून सूचकपणे प्रेक्षकांसमोर उलगडत जातं. या गाण्यातील ट्रेनच्या आवाजासाठी पंचमदांनी स्वतः रेल्वे स्टेशन गाठून येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेन्सचा आवाज रेकॉर्ड केला. याखेरीज एक खास ‘पंचम’ टच प्रेक्षकांना या गाण्यात अनुभवता येतो, जो पंचमदांच्या आकलनशक्ती आणि सर्जनशीलतेचं दर्शन घडवतो. ट्रेनमध्ये बॉम्ब लावलेला असल्याने त्या बॉम्बची टिकटिक टायटल ट्रॅकमध्ये असावी, ही पंचमदांची मनस्वी इच्छा होती आणि त्यासाठी वाद्यवृंदातील अमृतराव काटकरकाकांसारख्या अनुभवी व्यक्तीच्या हातात ‘वूडब्लॉक’ हे लाकडी वाद्य सोपवलं गेलं, टायटल ट्रॅक संपेपर्यंत या वूडब्लॉकमधून ‘टिकटिक’ हा ध्वनी एकाच लयीत निर्माण करणं गरजेचं होतं, जे अमृतरावांनी करून दाखवलं. सुरुवातीपासून नीट लक्ष देऊन ऐकल्यास इतर वाद्यांच्या भाऊगर्दीतही बॉम्बची टिकटिक तिची लय न बिघडवता कुठेही थांबली नसल्याचं लक्षात येतं.
आशा भोसलेंच्या कारकिर्दीतील एक अवघड गाणं!
आशाजींच्या गाण्यांमधून त्यांनी वर्षानुवर्षे केलेल्या कठोर स्वरसाधनेचा रसिकांना प्रत्यय येतो. वेगवेगळ्या तालस्वरातील बरीचशी अवघड गाणी त्यांनी आजवर गायली आहेत. कोणत्याही कठीण सुरावटीच्या गाण्यांना सहजतेने स्वरबद्ध करण्यात हातखंडा मिळवलेल्या आशाजींच्या वाट्याला ‘द बर्निंग ट्रेन’साठीही अश्याच प्रकारचं एक गाणं आलं होतं. ‘मेरी नजर है तुझपे’ (Meri Nazar Hai Tujh Pe) या गाण्यासाठी आशाजींना भारतीय शास्त्रीय गायनशैली आणि वेस्टर्न कॅब्रे गायनशैली यांचा संगम साधावा लागला. त्यांनी हेमा मालिनी साठी भारतीय आणि परवीन बाबीसाठी पाश्चिमात्य गायनशैलीत आवाज दिला. हे गाणं गाताना आशाजींच्या स्वरसाधनेचा कस लागला. इतकं होऊनही पंचमदांनी या गाण्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी बराच वेळ घेतला. त्याचबरोबर, प्रख्यात अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेने ‘तेरी है जमीं’ या प्रार्थनेला तिचा आवाज दिला होता. आजही ही प्रार्थना तितकीच लोकप्रिय आहे.
भारतीय समाजाचं व्यापक दर्शन!
या ट्रेनमध्ये जे प्रवासी होते, त्या सर्वांना वेगवेगळी पार्श्वभूमी होती. हिंदू, मुस्लीम, शिख असे सर्वधर्मीय प्रवासी या ट्रेनला लाभले होते. यात कुणी अट्टल गुन्हेगार, तस्कर होते तर कुणी पोलीस, डॉक्टर. कुणी पंडित होता तर कुणी मौलवी होता. अपंग स्त्री, गर्भवती स्त्री, शाळकरी मुले, म्युझिक बँड, वेश्या, प्रेमी युगुल अशी कैक पात्रेदेखील होती. याखेरीज गुफी पेंटल आणि केश्तो मुखर्जी यांनी दोन विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची भूमिकादेखील उत्तमरित्या वठवली होती. या ट्रेनमधील संपूर्ण प्रवासीवर्ग हा भारतीय समाजाचा एक आरसाच होता.
बॉब ख्रिस्टोच्या करिअरची सुरुवात!
कुर्बानी, कालिया, मर्द, नमकहलाल मधला गोरा आणि टकला खलनायक आठवतो? तो कलाकार म्हणजे बॉब ख्रिस्टो! बॉलिवूडमध्ये अभिनेता म्हणून प्रवेश करण्याअगोदर हा ऑस्ट्रेलियन सिव्हील इंजिनिअर ‘द बर्निंग ट्रेन’च्या सेटवर खास परवीन बाबीला पाहण्यासाठी येत असे. पुढे परवीननेच त्याला हिंदी शिकण्यात आणि चित्रपटांमध्ये काम मिळवण्यात मदत केली.
हत्ती गेला नि शेपूट राहिलं!
फिल्ममधल्या स्टंट्स आणि सेट्सची जबाबदारी घेण्यासाठी खास हॉलीवूडवरून आलेली तंत्रज्ञांची एक टीम या चित्रपटाच्या निर्मितीप्रक्रियेचा एक अविभाज्य घटक होती. क्लायमॅक्समधील काही भागांच्या चित्रिकरणासाठी मिनिएचर ट्रेन सेटचा वापर केला गेला होता. संपूर्ण चित्रपटात ग्राफिक्स आणि सेट्सचा सुरेख वापर करून ज्या प्रकारे रोमांचक असा थरार तयार केला गेला होता, त्याची मजा या मिनिएचर ट्रेन सेटने क्षणात घालवली आणि त्यामुळे प्रेक्षकांना फिल्मचा क्लायमॅक्स तितका उठावदार वाटला नाही.
त्यावेळी बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू न शकलेला हा चित्रपट आजच्या घडीला एक मल्टीस्टारर कल्ट क्लासिक म्हणून ओळखला जातो. लवकरच याचा रिमेक येणार असून, जॅकी भगनानीने या रिमेकच्या निर्मितीची जबाबदारी स्विकारली आहे.