‘आई तुळजाभवानी’च्या पौराणिक गाथेत उलगडणार एक नवा अध्याय; चिंतामणी पाषाणाचा
चिरतरुण मुगल-ए-आजम..
भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात भव्य आणि दिव्य सिनेमा म्हणजे के असिफ चा मुगल-ए-आजम! या सिनेमाने हिंदी सिनेमाची परीभाषाच बदलून टाकली.ज्या काळात सिनेमे दहा-बारा लाखात बनत त्या काळी या सिनेमाचे बजेट होते तब्बल दिड कोटी! के असिफ हा कलंदर दिग्दर्शक भव्यतेचे स्वप्न पाहणारा होता.त्याने या सिनेमात त्याची सारी गुणवत्ता पणास लावली.
पृथ्वीराज कपूर,दिलीप कुमार,मधुबाला,अजित,दुर्गा खोटे या पडद्यावरील मातब्बर दिग्गज कलावंताचा अप्रतिम अभिनय,शकीलची अर्थवाही गाणी,नौशादचं सुरील संगीत आणि याच बरोबर सिनेमाच्या प्रत्येक फ्रेम वर घेतलेली अपार मेहनत या सर्वांचे कष्ट,प्रयत्न यशस्वी झाले, सिनेमा सुपर डुपर हिट ठरला.शुक्रवार ५ ऑगष्ट १९६० रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाला आज ६० वर्षे पुरी होताहेत.या सिनेमाच्या मेकींगचे कथा जबरदस्त आहे.
हा सिनेमा तब्बल ९ वर्षे निर्मिती अवस्थेत होता.या दरम्यान याच कथानकावरचा ’अनारकली’ हा सिनेमा येवूनही गेला.यातील युध्दाच्या चित्रीकरणासाठी तत्कालीन संरक्षण मंत्री कृष्ण मेनन यांची खास परवानगी घेवून खरे खुरे सैनिक जयपूरच्या रणांगणावर वापरले होते. या सिनेमाचे चित्रीकरण अंधेरीच्या मोहन स्टुडीओत झाले होते.
त्या वेळी चित्रीकरण पहायला येणार्या गर्दीत एक चेहरा असा होता जो पुढे पाकीस्तानचा राष्ट्राध्यक्ष बनला ते होते झुल्फिकार अली भुट्टो! सिनेमातील दोन शास्त्रीय रागावर आधारीत गाण्यासाठी उस्ताद बडॆ गुलाम अली खां यांना तब्बल पन्नास हजार बिदागी देवून बोलावले होते.’मोहे पनघट पे नंदलाल छेड गयो रे’ या गाण्याच्या नृत्य दिग्दर्शनासाठी लच्छू महाराज होते.त्या काळातील जे जे उत्तम,उत्कट आणि उदात्त होतं ते सारं या सिनेमात आणण्याचा प्रयत्न झाला होता.’प्यार किया तो डरना क्या’ या गाण्याच्या चित्रीकरणासाठी उभारलेल्या शीशमहल वर पाण्यासारखा पैसा खर्च झाला.
यातील पल्लेदार उर्दू संवादांनी रसिकांवर मोहिनी घातली होती. या संवादाच्या स्वतंत्र ध्वनीमुद्रिका काढल्या होत्या.या संवादाची जादू पहा.यात बहार (निगार सुल्ताना) यातील मूर्तीकाराला (कुमार) म्हणते ” संगतराश, वो तीर हि क्या जो दिल के पार न हो जाए और वो बुतही क्या जिसके आगे मगरूर सर खुदबखुद झुक जाए’.यावर मूर्तीकाराचं उत्तर असतं ” तो फिर मैं ऐसा बुत बनाऊंगा जिसके कदमोमें सिपाही अपनी तलवार, शहेनशहा अपना ताज और इन्सान अपना दिल निकालके रख दे” निर्मितीच्या काळातच रंगीत सिनेमाला सुरूवात झाली होती त्या मुळे असिफने हा सिनेमा पार्टली कलर बनविण्याचा निर्णय घेतला.
चित्रीकरणाच्या वेळी खरं तर दिलीप व मधुबाला यांच्यात तीव्र मतभेद झाल्याने ते परस्परांशी बोलतही नव्हते तरीही या दोघातील प्रणय प्रसंगात कुठेही तो दुरावा जाणवत नाही. हा सिनेमा एकाच वेळी १५० प्रिंटस सह भारतात प्रदर्शित झाला हाही एक विक्रम आहे.मुंबईच्या ’मराठा मंदिर’ (आणि पुण्यात नटराज) मध्ये याचा भव्य प्रीमीयर झाला.हतीवरून याची प्रिंट आणली गेली.तब्बल वीस रिळांचा हा सिनेमा बघायला लोक प्रचंड संख्येने येत असतं.महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण शुभारंभाच्या शोला उपस्थित होते.कित्येक पाकीस्तानी रसिक हा सिनेमा पाहण्यासाठी मुंबईत आले होते!