दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
लगान: चित्रपटाच्या मेकिंग दरम्यानचे ७ भन्नाट किस्से
देशभक्तीवर आधारित चित्रपटांमध्ये अत्यंत वेगळ्या विषयावरचा चित्रपट म्हणजे ‘लगान’. स्वातंत्र्यपूर्व काळातील कथानक असणाऱ्या या चित्रपटाने ऑस्करला नामांकन मिळवून एक नवा इतिहास घडवला. थोडक्याकरता ऑस्कर तर हुकला, पण वेगळ्या विषयांवर आधारित चित्रपटही भारतीय रसिक स्वीकारतात, हा विश्वास या चित्रपटाने दिला. १५ जूनला या चित्रपटाला २१ वर्ष पूर्ण होतील.
लगानच्या कथेबद्दल काय लिहिणार? ही कथा तर सर्वांनाच माहिती आहे. लगान म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांकडून शेतीवर आकारण्यात येणारा कर. दुष्काळामुळे हवालदिल झालेले शेतकरी गोऱ्या अधिकाऱ्याला कर माफ करण्यासाठी विनंती करतात. विनंती तर मान्य होत नाही, पण केलं जातं एक ‘डील’, क्रिकेट खेळण्याचं!
इंग्रजांना क्रिकेटचं प्रचंड वेड. गावातल्या गोऱ्या ऑफिसरला क्रिकेट खेळताना बघणारे गावकरी लगान माफ व्हावा म्हणून चक्क इंग्रजांसोबत ‘लगान’ वाचविण्यासाठी क्रिकेट मॅचचं आव्हान स्वीकारतात. पण यामध्ये एक अट असते. ती म्हणजे जर मॅच हरले तर, “दुगना लगान देना पडेगा..” म्हणजेच दुप्पट कर भरावा लागेल.
चित्रपटामध्ये कथेचा नायक भुवन आणि गौरीची प्रेमकहाणी, फितूर होणारा गावकरी, गोऱ्या अधिकाऱ्याच्या बहिणीचं गावकऱ्यांना मदत करणं आणि भुवनच्या प्रेमात पडणं या सर्व गोष्टी अगदी सहज आणि सुंदर पद्धतीनं दाखवण्यात आल्या आहेत. आमिर खान तर ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’! त्याच्या अभिनयाबद्दल काय बोलणार? ग्रेसी सिंग या चित्रपटात अत्यंत गोड दिसलेय. आवर्जून कौतुक करायला हवं ते मराठमोळा दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर याचं. अत्यंत सुंदर पद्धतीने केलेल्या दिग्दर्शनामुळे चित्रपट कुठेही कंटाळवाणा होत नाही.
लगानबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. तसंच लगान बद्दल माहिती नाही, असं म्हणणारंही क्वचितच कोणी असेल. त्यामुळे आता जे फारसं कोणाला ‘माहिती नाही’ त्याबद्दल लिहिणं आवश्यक आहे. या माहिती नसणाऱ्या गोष्टी म्हणजे ‘लगान’च्या मेकिंग दरम्यान घडलेले किस्से. त्याबद्दलच थोडंसं (Lesser Known facts about Lagaan) –
१. आमिर खान नव्हता पहिली पसंती
‘लगान’ हा चित्रपट आमिर खानच्या कारकिर्दीमधील ‘माईलस्टोन’ समजला जातो. या मिस्टर परफेक्शनिस्टने सुपरहिट ठरलेले अनेक ‘बिग बजेट’ चित्रपट नाकारले होते. अर्थातच यामुळे त्याचं बरंच नुकसानही झालं. पण लगानच्या वेळी मात्र त्याने अजिबात चूक केली नाही. चित्रपट स्वीकारला आणि त्याचा निर्माताही बनला. लगानसाठी चित्रपटाचे लेखक – दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची पहिली पसंती होती ती शाहरुख खानला. पण काही कारणांनी शाहरुखने नकार दिला आणि ती भूमिका आमीरला मिळाली. (Lesser Known facts about Lagaan)
२. रेचेल शेली आणि पॉल ब्लॅकथॉर्न यांचा हिंदीचा क्लास
भूमिकेसाठी कलाकरांना बरीच मेहनत करावी लागते. एलिझाबेथची भूमिका करणारी ब्रिटीश अभिनेत्री ‘रचेल शेली’ आणि कॅप्टन रसेलची भूमिका करणारे ‘पॉल ब्लॅकथॉर्न’ यांचे बहुतेक संवाद हिंदी भाषेमध्ये होते. परंतु त्यांना हिंदी भाषेचा गंधही नव्हता. त्यामुळे आमिर खानने या दोघांना हिंदी शिकवण्यासाठी लंडनमध्ये एक शिक्षक पाठवला. जवळपास सहा महिने दोघांची शिकवणी चालू होती. रचेलला हिंदी भाषा व्यवस्थित आत्मसात करून घ्यायची होती. जेणेकरून तिला सहकलाकारांचे संवाद समजून घेऊन त्यानुसार अभिनय करता येईल. त्यामुळे तिने हिंदी भाषेचा तिच्या भूमिकेच्या गरजेपेक्षाही जास्त अभ्यास केला.
३. टीमसाठी संपूर्ण बिल्डिंग घेतली भाड्याने
लगानचं चित्रीकरण भुजमध्ये झालं आहे. चित्रीकरणाच्या वेळी टीमच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी भुजमध्ये तेव्हा केवळ तीन हॉटेल्स होती आणि ती देखील छोटी. तिथे संपूर्ण टीमच्या राहण्याची व्यवस्था होऊ शकत नव्हती. म्हणून आमिर खानने नवीन बांधलेली एक अपार्टमेंट भाड्याने घेतली. त्यामध्ये अद्ययावत सोई सुविधांसह हाउसकीपिंग टीमचीही व्यवस्था करण्यात आली. दुर्दैवाने शूटिंग संपल्यावर अवघ्या ६ महिन्यात भुजमध्ये झालेल्या भूकंपामध्ये ही बिल्डिंग जमीनदोस्त झाली. (Lesser Known facts about Lagaan)
४. भुज मधील गावकऱ्यांसाठी केलं होतं ‘विशेष शो’चं आयोजन
चित्रपट प्रदर्शित होण्याआधी, आमिर खानने भुजमधील गावकऱ्यांसाठी खास शोचं आयोजन केलं होतं. तिथे लोड शेडींग असल्यामुळे या शो दरम्यान लाईट गेले होते. परंतु मिस्टर पर्फेक्शनिस्टने यासाठी जनरेटची व्यवस्था आधीच करून ठेवली होती.
५. ग्रेसी सिंग होती शेवटची पसंती
‘लगान’ मधील नायिकेच्या भूमिकेसाठी पहिली पसंती प्रीती झिंटा होती हे तर आता ‘ओपन सिक्रेट’ आहे. पण प्रितीने नकार दिल्यावर या भूमिकेसाठी सोनाली बेंद्रेच्या नावाचा विचार करण्यात आला होता. परंतु सोनालीचा चेहरा मॉडर्न वाटत असल्यामुळे ती भूमिकेसाठी योग्य नाही, असं मत आमिरने व्यक्त केलं. यानंतर नम्रता शिरोडकर, नंदिता दास व अमिषा पटेलच्या नावाचाही विचार झाला होता. अखेर टीव्ही कलाकार ग्रेसी सिंगची निवड करण्यात आली आणि अर्थातच तिने ही निवड सार्थ ठरवली. (Lesser Known facts about Lagaan)
६. बेडवर झोपून केलं दिग्दर्शन
चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान लेखक – दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांना स्लिप डिस्कचा त्रास झाला होता. त्यामुळे त्यांना ३० दिवस बेडरेस्ट घ्यावी लागली. मात्र चित्रपट तयार होण्यासाठी आधीच उशीर झाला होता. त्यात अजून एक महिना उशीर परवडण्यासारखा नव्हता. त्यामुळे त्याने या कालावधीत, बेडजवळ मॉनिटर ठेवून आपलं काम चालू ठेवलं. (Lesser Known facts about Lagaan)
===========
हे देखील वाचा – आवर्जून पाहाव्यात अशा मराठीमधील ६ रोमँटिक वेबसीरिज
===========
७. शेवटच्या दृष्यात दिली गावकऱ्यांना संधी
चित्रपटामध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान जल्लोष करणारे गावकरी हे दररोज चित्रीकरण बघण्यासाठी येणारे गावकरी होते. चित्रीकरण सुरू असताना ते दिवसभर उन्हात बसून चित्रीकरण बघत बसायचे. त्यामुळे आमिरने या गावकऱ्यांना क्रिकेट सामन्याच्या दृश्यात प्रेक्षक म्हणून घेतलं.
लगान या चित्रपटाबद्दल आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणारा पहिला भारतीय चित्रपट होता. हा चित्रपट चीनी भाषेत डब करण्यात आला आणि त्यानंतर बीजिंग आणि शांघायमध्ये त्याचे प्रीमियर शो देखील झाले.